म्युकरमायकोसिस आजाराच्या नियंत्रणासाठी टास्क फोर्स गठित करा: आयुक्त संजीव कुमार #TaskForce


म्युकरमायकोसिस आजाराच्या नियंत्रणासाठी टास्क फोर्स गठित करा: आयुक्त संजीव कुमार

म्युकरमायकोसिस आजाराबाबत व्यापक जनजागृती करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

चंद्रपूर दि. 21 मे: म्युकरमायकोसिस या आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात टास्क फोर्स समिती गठित करा, प्रत्येक शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये नाक-कान-घसा व दंतरोग तज्ञांची टीम तयार करून घ्यावी
व जिल्हाभरात सोशल मीडिया, माहिती पत्रकाच्या आधारे या रोगावर आळा घालण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करावी अशा सूचना नागपूर विभागाचे आयुक्त संजीव कुमार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. विभागातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर विभागाचे आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना, रेती घाट लिलाव सद्यस्थिती, सातबारा संगणीकरण प्रगती अहवाल, नैसर्गिक आपत्ती पूर्वतयारी व खरीप हंगाम पूर्वतयारी आधी विशाल बर संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यासमवेत आढावा घेतला.

महिला व बाल विकास विभागाचा आढावा घेताना कोविड आजारामुळे अनेक बालकांनी पालकत्व गमावलेल्या बालकांची काळजी व संरक्षण व त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देत त्यांच्या संगोपनासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर पाहणी करावी. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची  माहिती हॉस्पिटलकडून वेळोवेळी मागवून घ्यावी, जे बालक अनाथ आहे आणि नातेवाईकांकडे आहे अशा बालकांची माहिती घेऊन त्यांना मदत व  पुरेपूर लाभ देण्याची कार्यवाही करावी. अशा सूचना नागपूर विभागाचे आयुक्त संजीव कुमार यांनी दिल्या.
तसेच ज्या बालकाला अठरा वर्षे पूर्ण झाले व जॉब लागला नाही त्यांना आधार केंद्रात ठेवून शासकीय संस्थेमार्फत स्वयं रोजगाराचे प्रशिक्षण द्यावे असेही ते म्हणाले.

जम्बो कोविड हॉस्पिटल : जम्बो हॉस्पिटल उभारणीसाठी चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे दिशानिर्देशा नुसारच सुधारित प्रस्ताव सादर करावे.

जम्बो रुग्णालयाचे जिल्ह्यांनी सादर केलेले प्रस्ताव आहे ते प्रस्ताव तिसऱ्या लाटेसाठी कामी येतील. तसेच अत्यावश्यक बाबींचा वेगळा प्रस्ताव तयार करून पाठवावा तो समितीकडे पाठविण्यात येईल असे ते म्हणाले.

म्युकरमायकोसिस या आजारावर हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे जनजागृतीसाठी दिलेल्या सूचनेप्रमाणे हिंदी इंग्रजी व मराठी मध्ये पत्रके, सोशल मीडियाच्या माध्यमातून
प्रसिद्धी करून घ्यावी. जिल्हा स्तरावर या आजारासंदर्भात काही कार्यवाही केली असल्यास तशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयाकडे पाठवावी.
 
म्युकरमायकोसिस या आजारावर व्यापक जनजागृती साठी रुग्णालयाबाहेर माहिती देणारी पत्रके, बॅनर च्या माध्यमातून जनजागृती करावी.
या आजारावरील उपचारासाठी खाजगी तसेच  शासकीय  रुग्णालयात कान,नाक,घसा व दंतरोग तज्ज्ञांची टीम तयार करून घ्यावी.
मधुमेहींच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमी असणं, हे संसर्गाचं प्रमुख कारण आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्या ज्या रुग्णांना मधुमेह आहे अशा रुग्णांची यादी तयार करून घ्यावी. व त्या रुग्णांची नाक,कान,घसा तसेच दंत तज्ञाकडून तपासणी करून घ्यावी.

कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देताना त्या रुग्णांची मधुमेहाची तपासणी करावी, रुग्ण घरी गेल्यानंतर कंट्रोल रूमच्या माध्यमातून रुग्णांच्या लक्षणांची फोनद्वारे माहिती घ्यावी. व लक्षणे दिसून आल्यास त्या रुग्णावर त्वरित उपचार करावा अशा सूचना आयुक्त संजीव कुमार यांनी दिल्या.

तसेच एक एप्रिल पासून कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्या रुग्णांना  कंट्रोल रूम च्या माध्यमातून, व्हिडिओ कॉल, फोनद्वारे लक्षणांची माहिती जाणून घेण्याचे निर्देश दिले.

यासोबतच रेती घाट लिलाव, महिला बाल विकास विभाग, आदी विषयांवर जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.