समृद्धी महामार्ग विशेष लेख, आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग : समृद्धी महामार्ग #Samriddhi-Highway #Special -Articles #Development -Road-of -Modern-Maharashtra #Samriddhi-Mahamarg #Highway

✍🏻 समृद्धी महामार्ग विशेष लेख : 1

🛣️ आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग : समृद्धी महामार्ग

कोणत्याही भागाचा विकास हा स्थानिक ठिकाणी दळण- वळणाची साधने किती चांगल्या दर्जाची आहेत, यावर ठरतो. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी रस्ते विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्यातील रस्त्यांचे जाळे विकसित झाले, तर आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे, हे ओळखून महाराष्ट्र शासनाच्या अथक प्रयत्नानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 11 डिसेंबर रोजी ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे...यानिमित्त हा विशेष लेख.

‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या  पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी (कोकमठाण) या 520 किलोमीटर रस्त्याचे  काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित शिर्डी ते मुंबई हा रस्ता जुलै 2023 पर्यंत खुला करण्यात येणार आहे.  या महामार्गामध्ये राज्यातील दहा जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांचा समावेश असून, सहापदरी असलेल्या या महामार्गाची लांबी 701 किलोमीटर आहे. या महामार्गामुळे 18 तासांचा नागपूर ते मुंबई हा प्रवास आता फक्त 8 तासांत करता येणार आहे.  नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी १३ तास लागत होते;  आता हे अंतर पाच तासांत पार करणे शक्य होणार आहे. तर मुंबई ते औरंगाबाद या प्रवासाचाही वेळ कमी होणार आहे.

📣 घोषणा ते पूर्तता

नागपूर व मुंबई  प्रवास सोयीचा व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 31 ऑगस्ट 2015 रोजी नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग  तयार  करणार, अशी घोषणा केली होती.  दि. 30 नोव्हेंबर 2015 रोजीच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीमध्ये हा महामार्ग तयार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री तथा तत्कालीन नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाही सुरू झाली. या यंत्रणेने या कालावधीत गतिमान पद्धतीने केलेले काम निश्चितच गौरवास्पद आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 55 हजार 335 कोटी रुपये आहे.  या महामार्गांतर्गत एकूण 1901 कामांपैकी 1787 कामे पूर्ण  झाली असून, 114 कामे प्रगतीपथावर आहेत.

वेळेची बचत आणि विकासाचा राजमार्ग

या महामार्गाच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या जनतेच्या जीवनात यामुळे मोठे परिवर्तन घडणार आहे.  या प्रकल्पासाठी भूसंपादन एक वर्षाच्या विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले.  या रस्त्यामुळे रोजगाराची संधी निर्माण होऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा राजमार्ग निर्माण होण्यास मदत होईल.  प्रवाश्यांच्या आरामासाठी द्रुतगती महामार्गालगत 20 ठिकाणी सुविधा केंद्रे तयार करण्यात आली आहेत.  या रस्त्यांमुळे प्रादेशिक बाजारपेठेत वाढ होऊन शेतमालाची जलद वाहतूक होण्यास मदत होईल.  या भागातील उद्योग आणि उत्पादन केंद्रांची क्षमता वाढेल.

🌿 हरित महामार्ग

या परिसरातील वन्यजीवांना हानी पोहोचू नये यासाठी 100 वन्यजीव मार्ग तयार करण्यात आले आहेत. वन्यजीवांच्या वावरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ठिकाणी ध्वनिरोधकाची सोय करण्यात आली आहे. एक हजारांहून अधिक कृत्रिम शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.  या रस्त्यालगत 11 लाखांहून अधिक झाडे आणि जवळपास 22 लाखांहून अधिक झुडुपे व वेलींचे रोपण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होईल.  प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये तसेच अपघात झाला, तर तात्काळ मदत मिळावी यासाठी 15 वाहतूक साहाय्य केंद्रे, बचाव व दुर्घटना नियंत्रणासाठी 21 जलद प्रतिसाद वाहने आणि लाईफ सपोर्ट सिस्टिमसह 21 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जातील.

वाहनांना तत्काळ इंधन मिळावे यासाठी देखील खबरदारी घेण्यात आली आहे. 138.47 मेगावॅट सौर ऊर्जा तयार केली जाईल, 22 जिल्ह्यांना गॅस उपलब्धतेची निश्चिती, वाहन चार्जिंग स्टेशनमुळे ऊर्जा बचत होण्यास मदत होईल. वाहनांना टोल आकारणीसाठी ‘फास्ट टॅग’ प्लाझा निर्माण करण्यात येणार आहे. या प्रवासी वाहतुकीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणींशिवाय सुरक्षित व सुखकर प्रवास व्हावा यासाठी सर्व सोयी सुविधा निर्माण केलेल्या आहेत.  दक्षिण कोरिया सरकारशी झालेल्या करारानुसार या मार्गावर अत्याधुनिक इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम पुढील दोन वर्षात द्विपक्षीय निधीद्वारे स्थापित करण्याची योजना आहे. ज्यामुळे या महामार्गावरील वाहतुकीला देखील शिस्त लावता येईल.

पाच लाख लोकांना रोजगार

 'कृषी समृद्धी केंद्र' म्हणून ओळखल्या जाणा-या नवीन शहरांची उभारणी या मार्गावर केली जात आहे.  अशा नवीन शहरांच्या विकासासाठी 18 स्थळे ठरवलेली आहेत. या ठिकाणी कौशल्य विकास केंद्रे, अत्याधुनिक आरोग्य सुविधा, शैक्षणिक संस्था आणि आयटी पार्क उभारण्यात येणार आहेत. या शहरांमध्ये उभारण्यात आलेले कृषी आधारित उद्योग शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार आणि इतर संधी उपलब्ध करून देतील. या महामार्गामुळे सुमारे 5 लाख लोकांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षा आहे.

🔹पर्यटनाला मिळणार चालन

हा  महामार्ग शिर्डी, वेरुळ, लोणार सरोवर, अजिंठा, औरंगाबाद, त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग आणि घृष्णेश्वर, नाशिक, इगतपुरी इत्यादी विविध पर्यटन स्थळांना जोडत असल्याने पर्यटनाला चालना मिळेल. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातूनही  मालाची जलद वाहतूक  करण्यास सुलभ  होईल.

भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या कार्यकाळात सुवर्ण चतुष्कोनची भूमिका मांडली. त्यानुसार मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकोता ही शहरे चौपदरी महामार्गानी जोडली गेली आहेत. त्याचेच दृश्य परिणाम आज पहावयास मिळत आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही जिल्हे जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ हा त्याचाच एक भाग.

राज्यात कार्यक्षम, सुरक्षित, वेळेची बचत करणारी, सर्वांना परवडणारी व सर्वांसाठीची अशी उत्तम दर्जाची वाहतूक व्यवस्था असणे ही काळाची गरज आहे. बदलत्या काळात महाराष्ट्राला वेगवान प्रगतीसाठी राज्यातील जिल्हे  जोडणारी, उत्कृष्ट दर्जाची वेगवान वाहतूक व्यवस्था करण्यासाठी ‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ मोलाची कामगिरी बजावेल.  गतिमान रस्ते विकासातून राज्याच्या विकासाचे शासनाने उचललेले हे पाऊल खूपच आश्वासक आहे.

हा महामार्ग  विकासाचा मार्ग  ठरेल, या महामार्गालगत राहणाऱ्या जनतेच्या जीवनात थेट परिवर्तन घडून येईल, हे मात्र नक्की !

सहायक संचालक
संध्या गरवारे खंडारे   

०००००

🛣️ समृद्धी महामार्ग विशेष लेख : 2

🪙 जितका प्रवास तितकाच पथकर !

➡️  इंट्रो

नागपूर ते मुंबई ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या मार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार 11 डिसेंबर रोजी नागपुरात होत आहे. त्यानिमित्ताने या मार्गावरील पथकराविषयीच्या माहितीपर हा लेख...

समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाताना सर्वसामान्य नागरिकांना अधिकचा पथकर लागेल, असा गैरसमज निर्माण होऊ शकतो. मात्र, यातील वस्तुस्थिती अशी आहे की, जेवढा तुम्ही प्रवास कराल, तेवढाच तुम्हाला पथकर भरावा लागणार आहे.

🔹निर्गमन पथकर

समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे निर्गमन पथकर (एक्झिट टोल).  निर्गमन पथकर म्हणजे काय?, तर निर्गमन पथकर म्हणजे बाहेर पडताना देता येणारा कर... याचाच अर्थ तुम्ही जितके अंतर या मार्गावरुन कापले, तितकेच पैसे तुम्हाला द्यावे लागतील. समृद्धी महामार्गाने नागपूर ते मलकापूर असा प्रवास केला, तर मलकापूरपर्यंत जितके अंतर होईल, तितकाच पथकर तुम्हाला द्यावा लागेल, तुमच्याकडून मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा पथकर वसूल केला जाणार नाही.

पहिल्या टप्प्यात (नागपूर ते शिर्डी)  मुख्य मार्गिकेवर फक्त वायफळ येथे पथकर नाका असणार आहे. इतर इंटरचेंजेस धरून एकूण 19 नाके आहेत. निर्गमन पथकर पद्धतीनुसार समृद्धी महामार्गावर जेवढ्या अंतराचा प्रवास होईल, तेवढाच पथकर आकारण्यात येणार असल्याने सद्य:स्थितीत नागपूर ते शिर्डी हलक्या वाहनांकरिता सुमारे 900 रुपये एवढा पथकर असेल.  पथकर हा फास्ट टॅग, कार्ड, वॅालेट, रोख अथवा ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.

🚨 आपत्कालीन व्यवस्था

महामार्गावर अपघात किंवा बिघाड झाल्यास हेल्पलाईन 1800-2332233, 8181818155 या  क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधता येईल. महामार्गावर ठिकठिकाणी हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित करण्यात येतील. आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी रुग्णवाहिकेकरीता 108 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. १५ रुग्णवाहिका, १५ शीघ्र प्रतिसाद वाहने, १२२ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.

उद्घाटनानंतर समृद्धी महामार्ग सर्वांसाठी खुला होईल.  सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रवास करावा, द्रुतगती महामार्गावर कुठेही वाहने उभी करू नयेत, सीट बेल्टचा वापर करावा, वेग मर्यादेचे पालन करुन वाहनधारकांनी सुरक्षित व गतिमान प्रवासाचा आनंद घ्यावा.

-जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर

00000

🛣️ समृद्धी महामार्ग विशेष लेख : 3

🔹महाराष्ट्राची भाग्यरेखा

➡️ इंट्रो

संपर्क, सातत्य व संवाद हा विकासाचा मूलमंत्र आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उर्वरित प्रदेश यांच्यातील संपर्क, सातत्य, संवाद अधिक बळकट व गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने योजनाबद्ध पावले उचलली आहेत. ‘समृद्धी महामार्ग’ हा त्याचाच एक भाग. समृद्धी महामार्ग हा विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी, सामान्य जनता, नव उद्यमी, लहान उद्योजक, व्यापाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षांना पूर्ततेकडे नेणारा राजमार्ग आहे. हा प्रकल्प आता लवकरच लोकार्पित होणार असून विदर्भ, मराठवाड्यापासून मुंबईचे अंतर यामुळे लक्षणीयरित्या कमी होणार आहे. यानिमित्त हा विशेष लेख...

महाराष्ट्राचा औद्योगिक विकास प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक या भागात अधिक झाला आहे. कारण या ठिकाणी मिळणाऱ्या प्राथमिक सुविधा, चांगल्या रस्त्यांचे जाळे. गुंतवणुकदारांनी मराठवाडा- विदर्भाकडे आगेकूच करण्यासाठी सुसाट वेगाची गरज असल्याचे लक्षात आले. त्यातून सातशे किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचा जन्म झाला. चार डिसेंबरला जेव्हा या रस्त्याची पाहणी करायला विद्यमान मुख्यमंत्री व तत्कालीन नगरविकास मंत्री व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष समृद्धी महामार्गावर उतरले, त्यावेळी दोघांच्या आनंदाला पारावार नव्हता. हा आनंद कर्तव्यपूर्तीचा होता, मनातली स्वप्न प्रत्यक्ष पूर्ण होताना पाहण्याचा होता.

❇️ वेदनेची कोंडी फोडणारा मार्ग

नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या भागांतून मुंबईला पोहोचण्यासाठी दोन-दोन दिवसांचा कालावधी लागल्याच्या आठवणी आता जुन्या झाल्या आहेत. नागपूरवरून दिल्ली काय आणि मुंबई काय, सारखेच. पण राज्य कारभार चालणारे स्थळ मात्र मुंबई...

विदर्भात कापूस, सोयाबीन, कडधान्य, तेलबियांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते. मात्र, सर्व कारखानदारी मुंबई, पुण्याकडे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त खनिज संपदा असणारा प्रदेश चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व आसपासचा परिसर. मात्र, खनिजावर आधारित कारखानदारी एक हजार किलोमीटरवर. पूर्व विदर्भात मोठमोठ्या नद्या, हजारो मामा तलाव. त्यातून गोड्या पाण्यातील मासळीचे मध्य भारतातील सर्वात अधिक उत्पन्न विदर्भात. मात्र, ताज्या मासळीच्या निर्यातीला जवळचे रस्ते नाहीत. विदर्भातील तरुणाईचे, सुशिक्षितांचे, शेतकऱ्यांचे हे दुःख समजून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दूरदृष्टीच्या नेत्याने या महामार्गाची कल्पना मांडली व विद्यमान द्रष्ट्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्ण पाठबळ दिले. अशा कितीतरी दुःखांवर फुंकर घालण्याची ताकद या समृद्धी मार्गात आहे.

👁️ डोळ्यात भरणारी समृद्धी

समृद्धी महामार्गाच्या वैशिष्ट्यातच विकासाचा मूलमंत्र आहे. 14 ते 16 तास मुंबईपर्यंत पोहोचण्याला लागणाऱ्या काळामध्ये या सर्वात जवळच्या मार्गाने ७ ते ८ तासांत मुंबईला पोहोचता येणार आहे. कच्चा माल, खनिज, दूध, मासळी, शेतमाल या मार्गाने मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत लवकरात लवकर पोहचणार आहे. त्यामुळे समृद्धी मार्ग महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने भाग्यरेखा ठरणार आहे.

701 किलोमीटरची विस्तीर्ण लांबी, 6 मार्गिकांसह  120 मीटरची डोळ्यात भरणारी रुंदी, वाहन गतीने चालवण्यासाठी प्रत्येक मार्गिकेची आखणी, कुणी मध्येच येणार नाही याची शाश्वती देणारे सुरक्षा कठडे, त्यामुळे काही क्षणात डोळ्यासमोरून गतीने वाहन दिसेनासे होणे ही आता समृद्धी महामार्गाची ओळख होईल. समृद्धी महामार्गाच्या पाहणीच्या निमित्ताने नुकतेच हे दृश्य बघायला मिळाले. प्रत्यक्षात जेव्हा ताफ्यामध्ये वाहने धावायला लागली, तेव्हा स्पीडोमीटरच रस्त्याच्या प्रेमात पडते की काय, असे वाटायला लागले. रस्त्यांची रुंदी, प्रत्येक मार्गिकेची आखणी, दर्जा, सजावट, दिशादर्शक फलके, सुरक्षा मानके , नजरेत भरत होती.

नागपूर आणि विदर्भला राजधानी मुंबईच्या जवळ नेणारा हा महामार्ग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या स्वप्नांना मूर्तरुप देणारा ठरणार आहे. आता प्रतीक्षा आहे,  या स्वप्नपूर्तीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकार्पणाची मोहोर उमटविण्याची….

-श्री. प्रवीण टाके,
जिल्हा माहिती अधिकारी,
नागपूर.

०००००

✍🏻 समृद्धी महामार्ग विशेष लेख : 4

🛤️ ‘समृद्धी’चा महामार्ग!

➡️ इंट्रो

नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटर लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गापैकी नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण 11 डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यानिमित्त संपूर्ण राज्यासाठी ‘समृद्धी’चा महामार्ग ठरणा-या मार्गाविषयी हा लेख …

कुठल्याही देशाचा दर्जेदार विकास साधण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणा-या गोष्टी म्हणजे रस्ते आणि शिक्षण आहेत हे जाणून राज्य शासनाने रस्ते आणि शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. ‘गतिमान रस्ते, गतिमान विकास’ हे विकाससूत्र ठरवून समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे.  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प होय. संपूर्ण राज्याच्या विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याचा कायापालट करण्यास हा महामार्ग सक्षम ठरणार आहे. 

रोजगाराच्या अमर्याद संधी

महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि विकासापासून दूर राहिलेल्या भागाला समृद्धीच्या मार्गावर आणण्यासाठी समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबई – विदर्भ- मराठवाडा भूभागातील अंतर दूर करणारा हा सर्वात जवळचा मार्ग ठरणार आहे. विदर्भ- मराठवाड्यातील शेतक-यांना, व्यापा-यांना मुंबई व मुंबईमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर आरामदायी व सुरक्षित पद्धतीने पार व्हावे, यासाठी प्रवेश नियंत्रण (Access controlled) असलेल्या शीघ्रसंचार द्रुतगती मार्गाची आखणी करण्यात आली आहे. या महामार्गावर निर्माण होणारी शहरे, लॅाजिस्टिक हब यातून नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

विदर्भातील पाच जिल्ह्यांचा या समृद्धी महामार्गात समावेश करण्यात आला आहे. त्यात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम आणि बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे.  विदर्भातील अनेक तालुक्यांतून हा महामार्ग जाणार असून त्यामुळे हे तालुके या महामार्गाशी जोडले जाणार आहेत.           

🛒 मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार

शेतक-यांना आपल्या शेतातील मालासाठी आता मुंबईची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे आणि तीही अवघ्या दहा तासांच्या आत. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बागवाडी या गावातील शेतक-याला आपला शेतातील संत्रा विकायचा असेल, तर तो आता थेट कारंजा मार्गे मुंबईला व तेथील बंदरामार्गे परदेशी सुद्धा पाठवू शकणार आहे. पूर्वी त्याला नागपूरशिवाय पर्याय नसायचा व तेवढा रास्त भावही मिळायचा नाही. शेतक-यांना आता समृद्धीमुळे हक्काचा बाजारभाव आणि बाजारपेठ मिळण्याची अडचण दूर होणार आहे. 

विदर्भ आणि मराठवाड्यातील भाग देशाच्या, जगाच्या नकाशावर येणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतमालाची वाहतूक थेट बंदरापर्यंत करता येणार आहे.  अनेक पर्यटनस्थळे परस्परांना जोडली जाणार आहेत. त्यामुळे पर्यटनवाढीला चालना मिळेल. लोणार, अजिंठा, वेरूळ लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, दौलताबादचा किल्ला, बिबी का मकबरा इत्यादी जगप्रसिद्ध पर्यटन स्थळे देशाच्या व जगाच्या नकाशावर येतील.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ख-या अर्थाने संपूर्ण राज्यासाठी ‘समृद्धी’चा महामार्ग ठरणारा आहे, एवढे निश्चित.
-अतुल पांडे,
माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर

🛣️ ‘समृद्धी’ची वैशिष्ट्ये

🛤️ एकूण 701 किलोमिटर लांबी  व 120 मीटर रुंदीचा सहा पदरी द्रुतगती मार्ग

✳️ 10 जिल्हे, 26 तालुके आणि आसपासच्या 392 गावांना जोडणार

⏰ नागपूर ते मुंबई हे अंतर फक्त ८ तासांत पार करणे शक्य.

🕕 प्रस्तावित वाहन वेग (डिझाईन स्पीड) ताशी 150 किमी

🪴 महामार्गालगत होणार 19 कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती

🌳 भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड असलेल्या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूने सुमारे ११ लाख ३१ हजार वृक्षांची होणार लागवड

📹 महामार्गाच्या प्रत्येकी पाच किमी अंतरावर असणार सीसीटीव्ही कॅमेरे

☎️ विनामूल्य दूरध्वनी सेवा

🚦महामार्गावरील बोगद्यात विद्युत रोषणाई, पूल सुशोभिकऱण, पथदिवे आणि डिजीटल संकेत (सिग्नल) यांचा वापर

🔌 ठराविक ठिकाणी वीजेवर चालणा-या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स

💡138.47 मेगावॅट उर्जा निर्मिती करणारे सौर उर्जा प्रकल्प
 
समृद्धी महामार्ग विशेष लेख : 5

महाराष्ट्राची स्वप्नपूर्ती

नागपूरला मुंबईशी थेट जोडणाऱ्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या महामार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार 11 डिसेंबर रोजी नागपूरात होत आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...

२५ वर्षांपूर्वी, चार वर्षांसाठी महाराष्ट्राचे आणि आता गेली आठ वर्षे देशाचे रस्ते मंत्रालय समर्थपणे सांभाळणारे देशाचे लोकप्रिय वाहतूक मंत्री नितीन गडकरी नेहमी सांगत असतात- "अमेरिका श्रीमंत आहे म्हणून त्यांच्याकडील रस्ते चांगले आहेत, असे नाही. तर, त्यांचे रस्ते चांगले असल्यामुळे तो देश श्रीमंत झाला आहे. कारण, रस्ते या रक्तवाहिन्या आहेत आणि प्रगतीचा मार्ग त्यातूनच जात असतो."

हे खरेही आहे. रस्ते जेवढे चांगले, तेवढी वाहतूक सुकर आणि त्यातून सर्वच गोष्टी कमी वेळात होऊन प्रगतीचा वेग वाढण्याला मदत होते. अमेरिकेतील रस्ते चांगले तर आहेतच; पण मैलोगणती सरळही आहेत. त्यामुळे आवागमन खूपच सोयीचे होते, हे उघड आहे. आपल्या देशाची भौगोलिक रचना मात्र इतकी 'सरळ' नाही. उलट, वळणदार रस्ते, ही आपली बहुतांश ठिकाणी  गरज आहे. पण, ते रस्तेसुद्धा चांगले असणे आवश्यक आहेच.

🛣️ रस्ते विकास प्राधान्य

राष्ट्रीय स्तरावर याचा विचार गंभीरपणे पहिल्यांदा केला गेला प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी (1999-2004) यांच्या काळात. त्यानंतरच सुवर्ण चतुष्कोन योजना, राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग प्रकल्प, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आदींमुळे रस्त्यांचे भाग्य उजळण्याला मोठ्या प्रमाणावर गती मिळाली.

तेव्हापासून आजपर्यंतच्या वीस-बावीस वर्षांमध्ये देशभरात चांगल्या रस्त्यांचे फार मोठे जाळे तयार झाल्याचे आपण पाहतो. त्याचा लाभ कोरोनाच्या संकटकाळात खूप मोठ्या प्रमाणावर झाला, हेही आपण अनुभवले आहे. 2014 ते 2019 याकाळात केंद्रात गडकरी आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे दोन वैदर्भीय नेते प्रमुख स्थानी असल्यामुळे विदर्भातील रस्त्यांचे भाग्यच फळफळले, हेही नाकारता येणार नाही. त्याचाच लाभ म्हणजे नागपूर-मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्ग होय, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

तत्कालीन फडणवीस सरकारने रस्ते विकासाला प्राधान्य देऊन अनेक योजना आखल्या. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी घेतली. त्यातीलच सर्वाधिक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे समृद्धी महामार्ग होय. 701 किलोमीटर लांबीचा हा सलग महामार्ग 10 जिल्ह्यांमधील 26 तहसिलींमधून जाताना 392 गावांना स्पर्श करणार आहे. या महामार्गावरून होणाऱ्या प्रवासाला पूर्वीपेक्षा सात ते आठ तास (म्हणजे जवळजवळ अर्धा वेळ) कमी लागतील, असा हिशेब मांडण्यात आला आहे. यामुळे सर्वच व्यवहारांमध्ये कितीतरी मोठा फरक पडेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुख्य म्हणजे वेळेची मोठी बचत होणार आहे. श्रम आणि खर्च यातही काही प्रमाणात कपात होईल.

❇️ विकासाचा मूलमंत्र

कोरोना आडवा आला नसता तर आतापर्यंत हा महामार्ग सुरू होऊन त्याचे लाभ मिळायला लागले असते. 2020 अखेरीला काम पूर्ण करण्याचे मूळ नियोजन होते. कोरोनामुळे ते दोन-अडीच वर्षे पुढे ढकलावे लागले. उशीर झाला असला तरी ‘देर आए, दुरस्त आए’ असे म्हणता येईल.

पहिल्या टप्प्यातील नागपूर ते सेलूबाजार (वाशीम) हे 210 कि. मी. चे काम यावर्षीच्या प्रारंभी पूर्ण झाले. त्यांनतर वाशिम ते शिर्डी (292 कि. मी.) हा दुसरा टप्पासुद्धा पूर्ण झाला. त्यामुळेच आता दोन्ही टप्प्यांचे एकत्रित उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते केले जात आहे. तिसरा टप्पा शिर्डी ते मुंबई (प्रत्यक्षात शहापूर) 2023 च्या मध्यापर्यंत, फारतर त्या वर्षाच्या अखेरीपर्य़त पूर्ण होऊन हा संपूर्ण महामार्ग धावायला लागेल ! याचा अर्थ, संकल्पनेपासून (2016) अवघ्या सात वर्षात महाराष्ट्राचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प पूर्णत्वास जाईल, ही अभिमान बाळगण्यासारखीच कामगिरी म्हणावी लागेल. या महामार्गामुळे समृद्धीचे मोठे दालनच खुले होणार आहे. त्याचा थेट लाभ 10 जिल्ह्यांना, तर अप्रत्यक्ष लाभ आणखी 14 जिल्ह्यांना होणार आहे. म्हणजे, दोनतृतीयांश महाराष्ट्र यामुळे समृद्धीच्या मार्गावर धावू लागेल. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा हे पाच जिल्हे, मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर हे दोन जिल्हे, खानदेशातील नाशिक, अहमदनगर हे दोन जिल्हे आणि कोकणचा ठाणे जिल्हा यांच्या बहुआयामी विकासात महामार्गाचे प्रत्यक्ष योगदान राहणार आहे.

महामार्ग आणि त्याच्या आजूबाजूला होणारे बांधकाम लक्षात घेऊन संपूर्ण परिसराच्या हरितीकरणावर भर देणे आवश्यकच होते. त्यानुसार रस्त्याच्या दुतर्फा बारा-तेरा लाख मोठी झाडे आणि रस्त्याच्या मधोमधही तेवढीच लहान झाडे-झुडपे लावून समृद्धी ई-वे ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्याचे ठरले आहे. यावर एक हजार कोटींचा खर्च करून पर्यावरणाचे संरक्षण केले जाईल.

मुख्य म्हणजे, 120 मीटर रुंद, सहा पदरी असा हा महामार्ग निर्वेध वाहतुकीला मोठी मदत करणारा ठरेल. 150 कि. मी. वेगाने वाहन हाकणे त्यावरून शक्य होईल. त्याचा खूप मोठा लाभ सर्व अंगांनी होऊ शकतो. कृषी समृद्धी नगरे परिसरातील शेतीला पूरक ठरतील. यानिमित्ताने 24 जिल्ह्यांमधील इतरही व्यवसायांना आपोआपच बरकत येईल. असा हा सर्वांगीण विकासाचा प्रकल्प आहे. त्यासाठी शेतजमीन देणारे शेतकरी, रस्ता बांधणारे तंत्रज्ञ-कामगार, देखरेख ठेवणारे अधिकारी-कर्मचारी या सर्वांनीच आपापली भूमिका इमाने-इतबारे निभावली तर दोनतृतीयांश महाराष्ट्रातील जनतेचे भविष्यात भले होऊ शकते. हा आपल्या सर्वांच्या समृद्धीचा महामार्ग आहे, ही भावना बाळगण्याची गरज आहे.

🛣️ आता नागपूर-गोवा महामार्ग

समृद्धी महामार्ग सुरू होत असतानाच, नागपूर-संभाजीनगर-पुणे-गोवा या नवीन महामार्गाची कल्पना पुढे आली आहे. यात पश्चिम महाराष्ट्रही येणार असल्याने संपूर्ण राज्यच येत्या काही वर्षात वाहतुकीच्या दृष्टीने एकजिनसी होऊ शकते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलताना या नव्या महामार्गाचे सूतोवाच केले. ते म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या तीन विभागांना जोडत हा महामार्ग गोव्यात जाईल. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे महत्त्वाच्या महामार्गांशी आणि उर्वरित राज्याशी जोडले जातील. परिणामी संपूर्ण महाराष्ट्रच महामार्गमय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
    विनोद देशमुख (मो.- 9850587622)

Samriddhi Highway Special Articles : 1

 🛣️ Development Road of Modern Maharashtra: Samriddhi Highway

#Dream-Project                      #Devendra-Fadanvis #Nagour-Mumbai
#Chief-Minister-Eknath-Shinde #Deputy-Chief-Minister-Devendra-Fadnavis                                          #Prime-Minister-Narendra-Modi  #Hindu-Heart-Emperor-Balasaheb -Thackeray                           #Maharashtra-Samriddhi-Highway #DIO-Nagpur  #CM-Maharashtra