रहवासी परिसरात उघड्यावर जाळण्यात पीपीई किट PPE Kit

रहवासी परिसरात उघड्यावर जाळण्यात पीपीई किट

चंद्रपुरातील माडूरवार सिटीस्कॅन सेंटर मधील प्रकार

चंद्रपूर, 8 मे: कोरोना आजारामुळे बेजार झालेल्या चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या दुःखात भर घालणारा आणखी एक प्रताप उघड झाला आहे. कोरोना हा संसर्गजन्य असतानाही खुद्द डॉक्टरकडून रहदारी मार्गावर पीपीई किट जाळण्यात आल्या. हा प्रकार लक्षात येताच कानउघडणी केल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरकडे बोट दाखविले. हा प्रकार डॉ. माडूरवार यांच्याकडून सिटीस्कॅन समोरच घडला आहे.
डॉ. अनिल माडूरवार यांचे मूल रोड येथे सिटी स्कॅन सेंटर आहे. कोरोनातील वापरलेले पीपीई किट सर्रासपणे रस्त्यावर फेकता येत नाही. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. पीपीई किट उघड्यावर फेकणाऱ्या नर्सिंग होम तसेच रूग्णालयांवर कडक कारवाईची तरतूद आहे. सिटी स्कॅन सेंटरमध्ये अनेक पॉझिटिव्ह रुग्ण तपासणीला येतात. त्यामुळे येथील यंत्रणा पीपीई कीट, हातमोजे, मास्कचा वापर करते. कोरोना काळात शासन काळजी घेण्याचे सांगत असतांना डॉ. अनिल माडूरवार यांचे मूल रोड येथे सिटी स्कॅन सेंटरमधील पीपीई कीट रहिवाश्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशा रहदारीच्या मार्गावर उघड्यावर जाळण्यात आले. शुक्रवार 7 मे ला रात्री 11.30 च्या जवळपास हा प्रकार काही जागृत नागरिकांनी बघितला व आपल्या कैमेऱ्यात कैद केला.या बाबत आज डॉ. अनिल माडूरवार यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी कर्मचारी नवीन असल्याने हा प्रकार घडला, अशी प्रतिक्रिया दिली . मागील आठवड्यातच याच माडूरवार सिटी स्कॅन सेंटर येथे शासनाने नेमून दिलेल्या दरानुसार दर आकारत नाही आहे, अशी तक्रार होती. याची माहिती मिळताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरला ताकीद दिली होती . डॉ. अनिल माडूरवार यांनी आतातरी समजदारीने घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.