वाहनांवरील कर वर्षभरासाठी माफ करावा
केंद्र सरकारशी संबंधित मागण्यांबाबत केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी परिवहन आयुक्तांसह घेतली ऑनलाईन बैठक
चंद्रपुर: गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन लावण्यात आला. त्यानंतर डिसेंबर, जानेवारी महिन्यात ठप्प झालेला व्यावसायीक प्रवासी वाहन चालक व मालकांचा व्यवसाय सुरू झाला व यावर्षी पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आल्यामुळे हा व्यवसाय ठप्प पडला. वर्षभरापासून हा व्यवसाय बंद असल्यामुळे वाहनांवरील कर्ज, इश्युरंस, रोड टॅक्स यांचा भरणा कसा करायचा हा प्रश्न व्यावसायीक प्रवासी वाहन चालक, मालकांना पडला आहे. त्यामुळे या घटकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने वाहनांवरील कर किमान एक वर्षासाठी माफ करावा, स्कुल बस, स्कुल व्हॅन यांच्यावरील कर माफ करावा व सर्व चालक मालकांना अर्थसहाय्य देण्यात यावे, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
दिनांक १९ मे रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यावसायीक प्रवासी वाहन चालक व मालकांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, व्यावसायीक प्रवासी वाहन चालक व मालक संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रविण चिमूरकर आदींची उपस्थिती होती.
गेल्या वर्षभरापासून व्यवसाय बंद असल्यामुळे चालकांचे कंबरडे आर्थिकदृष्टया मोडले आहे. या व्यवसायाच्या माध्यमातुन स्वयंरोजगार हा घटक करीत आहे. घरातल्या वस्तु विकुन या व्यावसायिकांनी जेमतेम उदरनिर्वाह चालविला. मात्र आता या घटकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. बॅंकांचे हफ्त्यांना एका वर्षासाठी मुदतवाढ देणे त्याचप्रमाणे वाहने वर्षभरापासून उभी असल्यामुळे एका वर्षाचे इंश्युरंस घेवून नये यासाठी आपण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. सर्व वाहनांवरील टॅक्स एक वर्षासाठी माफ करावा तसेच स्कुल बस आणि स्कुल व्हॅन यांच्यावरील टॅक्स देखील माफ करावा आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या या घटकांना अर्थसहाय्य देण्यात यावे, यासंदर्भात परिवहन आयुक्तांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, असेही आ. मुनगंटीवार या बैठकीत म्हणाले.
गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू झाल्यानंतर सहा महिन्यांचा वाहनांवरील कर राज्य शासनाने माफ केला असून पूर्ण वर्षाचा कर माफ करण्याबाबत आपण त्वरीत शासनाला प्रस्ताव सादर करू, असे आश्वासन परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी यावेळी दिले. शाळा सुरूच न झाल्यामुळे स्कुल बस आणि स्कुल व्हॅन यांच्यावरील कर माफ करण्याबाबत आपण प्रस्ताव पाठविला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. बॅंकांचे हफ्ते प्रदानासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याची बाब तसेच इश्युरंस संबंधिची बाब देखील केंद्र शासनाशी संबंधित आहे, तथापि इंश्युरंस बाबत आपण इंश्युरंस रेग्युलरीटी डेव्हलपमेंट अथॉरिटी यांच्याकडे प्रस्ताव पाठवू, असेही परिवहन आयुक्तांनी यावेळी सांगीतले. परिवहन आयुक्तांनी पाठविलेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करू व केंद्र सरकारशी संबंधित मागण्यांबाबत आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.