ठाणे प्रथम, नवी मुंबई द्वितीय, बृन्हमुंबई तृतीय
चंद्रपूर, ता. ०६ जून : शासन निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले. त्यानुसार चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत सन 2020-21 मध्ये अभियान राबविण्यात आले. यामध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिकेने यशस्वीरित्या उपक्रम पूर्ण केले. यात अमृत गटातून चंद्रपूर मनपाला आठवा क्रमांक प्राप्त झाला.
“माझी वसुंधरा अभियानांतर्गत” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आंतरराष्ट्रिय पर्यावरण दिनी ५ जुन रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन, राजशिष्टाचार, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे पार पडला.
“माझी वसुंधरा अभियानांतर्गत” भूमी, जल, वायू, अग्नी, व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती. चंद्रपूर शहर महानगर पालिकेने महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहरातील हरित आच्छादन वाढविण्याच्या दृष्टीने दहा हजार स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्यात आले. शहरामध्ये मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करून उद्याने विकसित करण्यात आलेली आहेत. नव्याने तयार करण्यात आलेल्या व जुन्या असलेल्या हरित क्षेत्रांचे संगोपन देखील करण्यात येत आहे. शहरातील धूळ कमी करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला वृक्षलागवड करून विविध ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे. शहरात विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी गो ग्रीन चंद्रपूर अंतर्गत जनजागृती करण्यात आली. चंद्रपूर शहर महानगरपालिका स्वतः सौर ऊर्जेचा वापर करीत आहे. अपारंपरिक ऊर्जेचा तसेच विद्युत वाहनांच्या जनजागृती आणि प्रोत्साहनाकरिता महानगरपालिका व विविध सर्विस प्रोव्हायडर यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना प्रसार रोखण्याच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून विद्युत वाहनांची टेस्ट ड्राईव्ह व सौर ऊर्जा उपकरणांची प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. वायु गुणवत्ता तपासणी करीता चंद्रपूर शहरामध्ये Ambient Air Quality monitoring stations उपलब्ध असून 24 तासात तीन वेळा वायू गुणवत्ता तपासणी करण्यात येत आहे. एक पाऊल प्रदुषणमुक्त चंद्रपूर शहराकडे या संकल्पनेला चालना देऊन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विविध शाळा महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, एसएचजी ग्रुप, तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला शहरातील नागरिकांतर्फे देखील सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत चंद्रपूर शहर पाणीपुरवठा योजनेचे कामांमध्ये तुकुम जलशुद्धीकरण केंद्र येथे हे रिसर्कुलेशन संप (क्षमता पाच लाख लिटर्स)चे बांधकाम करण्यात आले आहे. तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्र 40MLD क्षमतेचे असून, सदर क्षमतेच्या दोन टक्के म्हणजे जवळपास आठ लाख लिट बेङ वाॅशच्या वेळेस पाणी वाया जात असे. परंतु, रिसर्कुलेशन संपाच्या बांधकामामुळे 8 लाख लिटर्स पैकी अंदाजे सात लाख लिटर्स वाया जाणारे पाणी आपण पुन्हा वापरू शकणार आहोत. सदर रिसर्कुलेशन संपावर दोन पंप लावण्यात येणार आहोत. शुद्ध पाणी पुन्हा क्वालिफायरला देण्यात येणार असून, अशुद्ध पाणी (Silt) गाळ नाल्यांमध्ये सोडण्यात येणार आहे.
जलसंवर्धनाकरता चंद्रपूर शहर महानगरपालिके अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्रातील निस्सारण होणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर प्रकल्प प्रगतीपथावर आहे. त्यामुळे दररोज 13 लक्ष लिटर पाण्याची बचत होणार आहे.
जल संवर्धनाकरिता चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या नागरिकांना पाच हजार रुपये अनुदान तसेच मालमत्ता करामध्ये दोन टक्के सूट देण्यात येत आहे.
“माझी वसुंधरा अभियानांतर्गत” घेण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्पर्धेत चंद्रपूर शहर महानगर पालिकेने सहभाग घेऊन अमृत गटात ७८८ गुणसंह राज्यात आठवा क्रमांक प्राप्त केला आहे. या स्पर्धेत ठाणे महानगरपालिका प्रथम, नवी मुंबई महानगरपालिका द्वितीय, बृन्हमुंबई महानगरपालिकेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. तसेच त्यापाठोपाठ पुणे, नाशिक, बारशी, पिंपरी चिंचवड आदी स्थानिक स्वराज्य संस्था स्पर्धेत होत्या.