गणेश व दूर्गा मूर्ती विसर्जन रामाळा तलाव मध्ये कायमचे बंद
चंद्रपूर,दि.3 जून : शहरातील रामाळा तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरणाचा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. जांभुळे, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. काळे, ईको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे, स्टेशन मास्टर श्री. मूर्ती आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, नागरी वस्तीचे सांडपाणी तलावात येणार नाही, यासाठी दक्षता घ्यावी. तलावात येणार मच्छीनाल्याचा प्रवाह वळता करावा. तसेच मच्छीनाला जेथे तलावास येऊन मिळतो, तेथे वॉटर ट्रिटमेंट प्लाँट बसविणे आवश्यक आहे. पावसाळ्यामध्ये खोलीकरण करणे शक्य नसल्यामुळे या कालावधीत निविदा प्रक्रिया, कार्यारंभ आदेश आदी कामे निकाली काढा. जेणेकरून पावसाळा संपल्यानंतर त्वरीत खोलीकरणाच्या कामाला लगेच सुरवात करता येईल. याशिवाय तलावाच्या पश्चिम दिशेला संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, गणेश व दूर्गा मूर्ती विसर्जन कायमचे बंद करून त्याची व्यवस्था इरई नदी पात्रालगत करणे आदी सुचना त्यांनी केल्या.
बैठकीला वेस्टर्न कोल्ड फिल्ड, वनविभाग, पाटबंधारे, भुमी-अभिलेख व रोजगार हमी योजनेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.