नागरिकांची तक्रार येणार नाही, अशा पद्धतीने नाल्यांची स्वच्छता करा, महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले निर्देश : मान्सूनपूर्व कामाचा घेतला आढावा #CMCChandrapur

नागरिकांची तक्रार येणार नाही, अशा पद्धतीने नाल्यांची स्वच्छता करा 

महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले निर्देश : मान्सूनपूर्व कामाचा घेतला आढावा

चंद्रपूर, ता. ९ जून : मान्सूनपूर्व नाले स्वच्छतेची कामे अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी, याची काळजी घ्या. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता करून पावसाळ्यात एकाही नागरिकांची तक्रार येणार नाही, अशा पद्धतीने नाल्यांची स्वच्छता करण्याचे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

चंद्रपूर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत महापौर कक्षात बुधवारी (ता. ९) झोन अधिकाऱ्यांची मान्सूनपूर्व कामे व इतर कामाची आढावा बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, झोन १चे सभापती राहुल घोटेकर, झोन २च्या सभापती संगीता खांडेकर, उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, सहायक आयुक्त विद्या पाटील, प्र.क्षेत्रिय अधिकारी भाऊराव सोनटक्के, मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी आदी उपस्थित होते.  

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची मोहीम एप्रिलपासून हाती घेण्यात आली होती. येत्या काही दिवसात मान्सूनची शक्यता असल्याने पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, नाल्यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरु नये, नागरिकांची कोणत्याही स्वरुपाची जीवित वा वित्त हानी होऊ नये, यासाठी शहरातील मोठ्या नाल्यांची उर्वरित सफाई लवकरात लवकर करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. 

तसेच रामाळा तलावाच्या काठावर महानगरपालिकेमार्फत सौदर्यीकरण करण्यात आले होते, काही ठिकाणी बसण्यासाठी आसने लावण्यात आली होती. ज्या ठिकाणी तुटफूट झाली, त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याच्या सूचनाही महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिल्या. मोकळ्या भूखंडावर, डबके आणि कुलरच्या साचलेल्या स्वच्छ पाण्यात मलेरिया-​डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी फवारणी करण्यासह नागरिकांमध्ये जनजागृती करा, अशाही सूचना देण्यात आल्या. 

यावेळी उपमहापौर राहुल पावडे यांनी पावसाळ्यात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा पुरेसा साठा उपलब्ध करण्याचे सूचित केले, तर स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी झोन अधिकाऱ्यांनी वॉर्डा-वॉर्डात भेटी देऊन नाले सफाईकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले.