महाराष्ट्र शासनचे सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ मार्गदर्शक सूचना जाहिर Maharashtra Ganesh Utsav

महाराष्ट्र शासनचे
सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ मार्गदर्शक सूचना जाहिर
LOKTANTRAKIAWAAZ
#GANESHUTSAV2021SUCHANA
मुंबई : कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

⏩  त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहेत : 

▶️ १. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका / स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. 

▶️ २. कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत . या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी. 

▶️ ३. श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरिता २ फूटांच्या मर्यादेत असावी.

▶️ ४. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे . मुर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे , विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे . 

▶️ ५. उत्सवाकरिता वर्गणी / देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे . तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. 

▶️ ६. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम / शिबीरे ( उदा . रक्तदान ) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना , मलेरिया , डेंग्यू इ . आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. 

▶️ ७. लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बध कायम राहतील . त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही . 

▶️ ८. आरती , भजन , किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी . तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे . 

▶️ ९ . श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन , केबल नेटवर्क , वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी . 

▶️ १०. गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी . प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरिरीक अंतराचे ( फिजिकल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम ( मास्क , सॅनीटायझर इत्यादी ) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे .

▶️ ११. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत . विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे . लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे . संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत . 

▶️ १२. महापालिका , विविध मंडळे , गृहनिर्माण संस्था , लोक प्रतिनिधी , स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमुर्तीच्या विसर्जनाकरिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी . 

▶️ १३. कोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन , आरोग्य , पर्यावरण , वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका , पोलीस , स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील . तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे . सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आली असून त्याचा सांकेतांक २०२१०६२ ९ १३०८३६४७२ ९ असा आहे.