खासदार बाळू धानोरकर यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना
चंद्रपूर : कोरोनाची पहिली व दुसरी लाट ओसरून तिसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन अँक्शन प्लॅन राबवित आहे. या करीता नियोजन करणे गरजेचे आहे. कोरोनाची मानवी साखळी तोडण्यासाठी तसेच प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १५ जून पर्यंत मुदतवाढ केलेली आहे. या काळात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत निर्बंधांमध्ये व्यापारी बांधवांना सौजन्याची वागणूक द्या अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.
मार्च २०२० पासून सततच्या लॉकडाउन मुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्ग हवालदिल झालेला आहे. व्यापारी वर्गा कडून हि कोरोनावर नियंत्रणासाठी सहकार्य मिळतच आहे. तथापि निर्बंधाच्या आदेशाची अमलबजावणी करतांना प्रशासनाचे अधिकारी तसेच पोलीस विभागाने संयम बाळगून काम करण्याची गरज आहे. आर्थिकदृष्टया व्यापारी वर्ग तुटला असून ते शासनाने निर्धारित केलेल्या वेळेत आपली दुकाने सुरु ठेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. त्यांचेवर मोठे आर्थिक दंड किंवा गुन्हे दाखल न करता अशा परिस्थितीत पोलीस विभाग, मनपा अधिकारी यांनी संयम बाळगून कठोरतेने न वागता सौजन्याने वागावे अशा सूचना त्वरीत जारी करून सहकार्य करावे अशी मागणी खासदार बाळू यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे