-विनापरवानगी सभागृहात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई
-विनापरवानगी जबरदस्तीने सभागृहात प्रवेश करणार्या नागरिकांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना
चंद्रपूर, ता. २९ जुलै : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी (२९ जुलै) दुपारी एक वाजता सर्वसाधारण आमसभा सुरु असताना विना परवानगी प्रवेश करत सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी नगरसेवक नंदू नागरकर यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम महापालिकेचे कामकाज चे प्रकरण मधील २ (१) नुसार निलंबित करण्यात येत आहे, असे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले.
मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात सर्वसाधारण आमसभा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास खात्याने दिलेल्या कोविड-१९ च्या निर्देशान्वये सदर आमसभा पदाधिकारी आणि गटनेते वगळता उर्वरित सर्व नगरसेवकांसाठी आभासी माध्यमातून घेण्यात आली.
यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल, उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे यांच्यासह सभागृह नेता, विरोधी पक्षनेते, सर्व गटनेते यांची उपस्थिती होती.
सभागृहात कामकाजाला सुरुवात होत असताना नगरसेवक सचिन भोयर यांनी आपल्या २० ते २५ कार्यकर्त्यासह कोणतीही पूर्वसूचना न देता सभागृहात प्रवेश केला. तसेच त्यानंतर नगरसेवक नंदू नागरकर यांनीही काॅग्रेसचे नगरसेवक सुनिता लोढिया, संगीता भोयर, विना खनके, ललिता रेवेल्लीवार, अली अमजद मंसूर, निलेश खोब्रागङे, सकिना अंसारी व इतर कार्यकर्त्यासमवेत सभागृहात प्रवेश करत घोषणाबाजी करून गदारोळ केला. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम महानगरपालिकेचे कामकाजाचे प्रकरण मधील २ (१) नुसार नगरसेवक नंदू नागरकर यांची वर्तणूक गैरशिस्तीची असल्यामुळे सभेतून ताबडतोब निघून जाण्यासाठी निर्देश दिले. परंतु, त्यांनी त्याचे पालन केले नाही. त्यांची सभागृहांमध्ये गैरवर्तणूक सुरूच होती. तसेच त्यांनी महापौरांच्या व्यासपीठावर जोराने हात आपटले. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा महासभेमधून निघून जाण्याकरिता आदेश देण्यात आले. परंतु नंदू नागरकर महानगरपालिका सदस्य हे सभागृहाबाहेर न जाता तिथेच गोंधळ घालत होते. सबब महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम महानगरपालिकेचे कामकाजाचे प्रकरण २(२) नुसार निलंबित करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन नगर विकास यांचे पत्र दिनांक ३/७/२०२० नुसार ऑनलाइन सर्वसाधारण सभा घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार महानगरपालिका महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभा सुरू असतानाच सुनिता लोढिया, संगीता भोयर, विना खनके, ललिता रेवेल्लीवार, अली अमजद मंसूर, निलेश खोब्रागङे, सकिना अंसारी आदी नगरसेवक विनापरवानगी उपस्थित झाले. त्यामुळे आयुक्त यांनी या सदस्यांवर कोविड नियमानुसार शिस्तभंग केल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी सूचना महापौरांनी दिली आहे.
महानगरपालिका सभेमध्ये नगरसेवक सचिन भोयर यांनी महानगरपालिका सभागृहात विनापरवानगी आणलेल्या नागरिकांवर विनापरवानगी जबरदस्ती प्रवेश करणे व कोविड नियमांचा भंग केल्याप्रकरणी आयुक्त यांनी संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, असेही निर्देश महापौरांनी दिले आहेत.
यावेळी झालेल्या गोंधळामुळे महापौरांनी आमसभा ३० मिनिटासाठी तहकूब केली. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतर आमसभेपुढे ठेवलेल्या विषयांना सभागृहाने मंजुरी दिली. मनपाच्या सभागृहात कोविड 19 च्या नियमानुसार बाहेरील व्यक्ती येणार नाही, यासाठी सुरक्षा वाढविण्यात यावी आणि यापुढे अशा प्रकारचे गोंधळ सभागृहात होता कामा नये, अशी सक्त ताकीद महापौरांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली.