मोठी बातमी: महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित Maharashtra State Election of ZP and Panchayat Samiti Postpone

मोठी बातमी: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

#Loktantrakiawaaz
मुंबई, 09 जुलै : कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भिती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. Maharashtra state Election of ZP and Panchayat Samiti  Postpone.

मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु 7 जुलै 2021 रोजी राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै 2021 रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-19 बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही मदान यांनी सांगितले.

ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द करणारा सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं  पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. राज्य सरकारनं कोरोनाचं कारण देत पोटनिवडणुकांना स्थगिती देण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टात यासंदर्भात 6 जुलै रोजी सुनावणी झाली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं पोटनिवडणुका स्थगित केल्याची माहिती दिली आहे.