कोरोना महामारीतही लाचखोरी सुसाट, लाचलुचपत विभागाचे तब्बल 469 सापळे, शेकडो भ्रष्टाचारी गजाआड #CoronaPandemic #MaharashtraACB #ACB #महाराष्ट्र

कोरोना महामारीतही लाचखोरी सुसाट, 

लाचलुचपत विभागाचे तब्बल 469 सापळे, 

शेकडो भ्रष्टाचारी गजाआड

#Loktantrakiawaaz
#ACBNews

नागपूर, 11 ऑगस्ट : महाराष्ट्राने भयावह कोरोना संकट बघितलं. कोरोना अजूनही संपलेला नाही. उलट तो पुन्हा डोकंवर काढताना दिसतोय. कोरोना संकटात अनेकांना औषधं मिळत नव्हते. काहींना बेड मिळणं कठीण झालेलं. तर अनेक हतबल रुग्णांचे प्राण गेले. या भयावह संकट काळात देखील राज्यात भ्रष्टाचाराच्या घटना घडल्या. लाचखोर अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे यावर्षी 1 जानेवारीपासून ते 8 ऑगस्टपर्यंत तब्बल 648 पेक्षाही जास्त लाचखोरीच्या घटना समोर आल्या आहेत.

➡️  कोरोनाच्या महामारीतही लाचखोरी सुसाट
महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रिपोर्टनुसार, कोरोनाच्या महामारीतही लाचखोरी सुसाट सुरु असल्याचं चित्र आहे. गेल्या सात महिन्यात 648 लाचखोरांना पकडण्यात एसीबीला यश आलं आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षापेक्षा हे प्रमाण 31 टक्क्यांनी वाढलं आहे. कोरोना काळात लाचखोरीत महसूल विभाग अव्वल आहे, तर पोलीस दुसऱ्या क्रमांकावर आहे. विभागांचा विचार केल्यास, पुणे विभागात सर्वाधिक 132 लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले. तर औरंगाबाद विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. औरंगाबाद विभागात 127 लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले. त्यापाठोपाठ नाशिक विभागात 111 तर नागपूर विभागात 57 आरोपी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.

➡️ सात महिन्यात तब्बल 469 ठिकाणी सापळे
महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी गेल्या सात महिन्यात तब्बल 469 ठिकाणी सापळे रचले. या सापळ्यांमधून एकूण 648 आरोपींना लाचलुचत विभागाने बेड्या ठोकल्या. एसबीने मार्च महिन्यात सर्वाधिक सापळे रचत 119 भ्रष्ट अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यापाठोपाठ जून महिन्यात 77 ठिकाणी सापळे रचण्यात आले होते. त्यातून 103 जण रंगेहात पकडले गेले होते. तर जुलैमध्ये 71 सापळ्यांमधून 100 आरोपी रंगेहात पकडण्यात आले होते.

➡️ एसीबीने गेल्यावर्षी किती जणांना पकडलं?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या काळात 359 सापळे रचले होते. त्यातून 501 आरोपी एसीबीच्या जाळ्यात अडकले होते. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक 72 सापळे रचण्यात आले होते. त्यातून 96 आरोपी पकडण्यात आले होते. पण जानेवारी महिन्यात 68 सापळ्यांमधून 96 आरोपींना पकडण्यात आलं होतं.

साभार- TV9