चंद्रपुरातील फेरीवाले, दुकानदार व सेवा दारांना कोविड लसीकरण अनिवार्य, चंद्रपुर महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते यांचे निर्देश : लसीकरणासाठी मनपा ॲक्शन मोडवर #ChandrapurHockersVaccinationCompulsary #CMC #चंद्रपुर

चंद्रपुरातील फेरीवाले, दुकानदार व सेवा दारांना कोविड लसीकरण अनिवार्य 

चंद्रपुर महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते यांचे निर्देश : लसीकरणासाठी मनपा ॲक्शन मोडवर  

#Loktantrakiawaaz
#Vaccination News
चंद्रपूर, ता. ३० सेप्टेंबर: मागील दोन-तीन महिन्यात झालेल्या लसीकरणामुळे तिसरी लाट रोखून धरण्यात यश येत आहे. मात्र, कोरोना समूळ नष्ट करण्यासाठी १०० टक्के लसीकरण आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांशी थेट आणि सतत संपर्कात राहणाऱ्या फेरीवाले, दुकानदार व इतर सेवादार यांनी कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक आहे. येत्या दोन दिवसात लसीकरण करून घ्या, अन्यथा कडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक गुरुवारी दुपारी घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विपिन पालिवाल, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अमोल शेळके आदींसह शहरी नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक उपस्थिती होती. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी आढावा घेतला.

चंद्रपूर शहरात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला प्रारंभ झाला. तेव्हापासून सप्टेंबर अखेरपर्यंत सुमारे दीड लाख पात्र नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली. यातील सुमारे ७० हजार नागरिकांची दुसरी मात्रा देखील पूर्ण झाली आहे. सध्यस्थितीत १८ हजार व्यक्तीची लसीच्या दुसऱ्या मात्रेची तारीख निघून गेल्यानंतर देखील लस घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोविड लसीकरणाची वार्डनिहाय आकडेवारी तसेच लसीकरणाची टक्केवारी कमी असलेले भाग व विशिष्ट समुदाय यांची ओळख पटवण्याचे आदेश देखील आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित दिले. 

कोरोनाची संभाव्य लाट टाळण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. फेरीवाले, व्यापारी आणि विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावेत, लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र अथवा मागील १५ दिवसांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. लसीकरणाचे प्रमाणपत्र अथवा आरटीपीसीआर अहवाल तपासणीचे आदेश देण्यात आले असून, प्रमाणपत्र न दाखविणाऱ्यास दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे.