वृक्षगणनेत चंद्रपूर शहरात ९ लाखांपेक्षा अधिक झाडांची नोंद, पर्यावरणीय समृद्धीसाठी चंद्रपुर मनपाच्या प्रयत्नांना यश;एकूण २९२ झाडांच्या प्रजाती 9 Lakh Tree In Chandrapur City CMC

वृक्षगणनेत चंद्रपूर शहरात ९ लाखांपेक्षा अधिक झाडांची नोंद

पर्यावरणीय समृद्धीसाठी चंद्रपुर मनपाच्या प्रयत्नांना यश;
एकूण २९२ झाडांच्या प्रजाती

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, ता. ३१ ऑक्टोबर : चंद्रपूर शहराला (Chandrapur City) पर्यावरणीयदृष्ट्या (Environment) समृद्ध करण्यासाठी शहर महानगरपालिकेद्वारे (Chandrapur CMC) विविध उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षलागवड व संवर्धन करण्यावर सातत्याने भर देण्यात आला. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात हरित आच्छादन (ग्रीन कव्हर) निर्माण झाले आहे. एका संस्थेच्या माध्यमातून नुकत्याच करण्यात आलेल्या वृक्ष गणनेमध्ये शहरामधील एकूण वृक्षसंख्या ९,२६,१६९ इतकी आढळून आली. शिवाय १९,४८७ इतकी झाडे नव्याने रोपलेली आहेत. या गणनेत एकूण २९२ झाडांच्या प्रजातींची नोंद झाली, हे विशेष.
महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व संवर्धन (शहरी विभाग) कायदा, १९७५ नुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि तेथील वृक्ष विभागाद्वारे (उद्यान विभाग) वृक्षगणना प्रत्येक ५ वर्षांनी करणे क्रमप्राप्त आहे. यापूर्वी डिसेंबर १९९६ पर्यंत वृक्ष गणना दरवर्षी केली जायची. वृक्षगणनेमुळे भविष्यातील पर्यावरण आराखडा तयार करण्यासाठी तसेच वृक्ष संवर्धन, छाटणी वृक्षतोड आणि हरित आच्छादन वाढविण्यासंदर्भात सामाजिक जनजागृती करण्यासाठी वृक्षगणना आवश्यक आहे. एक वयस्क झाड किंवा ३ ते ४ लहान झाडे एका व्यक्तीसाठी आवश्यक ऑक्सिजन निर्माण करतात. जितके मोठे व जुने झाड (Tree) असेल तेवढा अधिक ऑक्सिजन (Oxygen) मिळतो.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेने सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्ष गणना केली. यात वृक्षांची संख्या, प्रजाती तसेच झाडाचे नाव, घेर, उंची, वय, स्थिती, मालकी या बाबींची नोंद करण्यात आली. त्यानुसार शासकीय जागा, खासगी जागा, उद्याने, खुली जागा आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची गणना करण्यात आली. गणना पूर्ण झाल्यानंतर सादर करण्यात अहवालात एकूण वृक्षसंख्या ९,२६,१६९ इतकी आढळून आली. त्यात सर्वाधिक १,८८,५५८ वृक्ष सुबाभूळ या प्रजातीचे, विलायती किकर या प्रजातीचे १,४६,३८९ वृक्ष तर साग प्रजातीचे ४७,८९७ वृक्ष आहेत. त्याखालोखाल इतर प्रजातींची झाडे आहेत. शहरातील वॉर्ड क्र. १ - देगो तुकूम येथे सर्वाधिक १,२६,३९५ इतकी वृक्षसंख्या आहे. यामध्ये सुबाभूळ (८२,३९०), विलायती किकर (३७,८१४) आणि खैर (६,२५४) या वृक्षांची संख्या सर्वाधिक आहे. तर वारसा वृक्ष (हेरिटेज ट्री) व ऑक्सिजन ट्री म्हणून परिचित असलेली  प्रमुख झाडे म्हणजेच वड (८९७), कडुनिंब (२३,०८१) व पिंपळ (१८००) यांची संख्या लघु-मध्यम प्रमाणात आहे.  

सदर वृक्षगणना महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात, शहर अभियंता महेश बारई, वृक्ष अधिकारी रवींद्र हजारे, उद्यान निरीक्षक अनुप ताटेवार, बंडू धोत्रे (सल्लागार / वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य) यांच्या समन्वयातून एका संस्थेच्या स्वयंसेवक चमूद्वारे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.