गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असणाऱ्या तालुक्यांसाठी पोलीस विभागाने खास पथक निर्माण करावे -पालकमंत्री विजय वडेट्टीवारचंद्रपुर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन सीसीटीव्हीने जोडणारपोलीसांना जिल्हा नियोजन मधून वाहने देणारअमली पदार्थ व गुटख्यावर कारवाईचा पाश आवळण्याचे निर्देश Chandrapur Police Station CCTV palakmantri

गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असणाऱ्या तालुक्यांसाठी पोलीस विभागाने खास पथक निर्माण करावे -पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन सीसीटीव्हीने जोडणार

पोलीसांना  जिल्हा नियोजन मधून वाहने देणार

अमली पदार्थ व गुटख्यावर कारवाईचा पाश आवळण्याचे निर्देश

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर दि. 30 ऑक्टोबर: चंद्रपुर जिल्हयातील दोषसिध्दीचा दर समाधानकारक आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे पोलीसांचे काम उत्तम असून गुन्हयांचे प्रमाण व वारंवारता जास्त असणाऱ्या तालुक्यांसाठी पोलीस विभागाने  खास पथक निर्माण करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिले. 

मंथन सभागृहात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,  पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलिस उपअधीक्षक (गृह) शेखर देशमुख, चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. नंदनवार तसेच सर्व तालुक्यांचे पोलीस निरीक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.
गुन्ह्यांची उकल तातडीने करण्यासाठी गठीत पथकाला आवश्यक तो निधी,मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. गुन्हेगारांना वचक बसण्यासाठी व गुन्हे दर कमी होण्यासाठी या पथकाची निर्मिती करण्याचा उदेदश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस विभागाच्या  गेल्या वर्षभरातील कामकाजाचे सादरीकरण या बैठकीत पोलीस अधिक्षक श्री.साळवे यांनी केले.
कोरोना काळात देशात गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत खुन, खुनाचा प्रयत्न, बलात्कार  यासारख्या गुन्हयांचे प्रमाण तुलनेने कमी आहे.वर्ष 2019 मध्ये 43 टक्के ,2020 मध्ये 42.52 तर सप्टेंबर 2021 अखेर 35 टक्के दोषसिध्दीचा दर असून तो समाधानकारक असल्याची भावना पालकमंत्री श्री.वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

महिला संदर्भातील सायबरचे गुन्हयाबाबत कडक व कायदेशीर कारवाई करण्याची भुमीका ठेवावी. पोलिसांची भूमिकेबाबत योग्य संदेश जावा, या गुन्ह्यांकडे शासन बारकाईने बघत आहे, ही वस्तूस्थिती जावी, नागरिकांच्या मनात पोलिसांबद्दलचा  सन्मानपूर्वक आदर निर्माण व्हावा,अश्या पध्दतीची कार्यशैली पोलीसांची असावी असे पालकमंत्री म्हणाले.

पोलिसांनी गुन्हे दाखल करतांना घटनेचा सांगोपांग विचार करून दोष सिद्धीचे अंतिम लक्ष डोक्यात ठेवावे. एकदा गुन्हा दाखल झाला तर कायद्याच्या कचाट्यातून आपण सुटणार नाही, अशी भीती गुन्हे करणाऱ्यांना वाटली पाहिजे. असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
तसेच गुन्हास्थळावर तातडीने पोहोचण्यासाठी पोलीसांनी दुचाकी व चारचाकी वाहन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याचे त्यांनी निर्देश दिले.

अमंलीपदार्थ व गुटख्याबाबत पोलीसांनी पाठपुरावा करून त्या गुन्हयांची पाळेमुळे शोधून काढावीत. आर्म्स ॲक्टचे काटेकोरपणे पालन करावे. कोळशाचा काळाबाजार , बायोडिझेलच्या नावाखाली भेसळयुक्त डिझेल विक्री करणा-यांवर  कारवाई करावी. कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे कायदयाची बूज राखून  पोलीसांनी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अवैध वाहतूक रोखण्यासाठी व महसूल वाढीसाठी प्रादेशिक परिवहन व पोलीस  यंत्रणांनी चोखपणे काम करावे. जिल्हा पोलीस दलाच्या जादुटोणा प्रतिबंधक कायदयाची प्रचार व प्रसिध्दी  व अन्य उपक्रमांना आवश्यक तो निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी पोलीस अधिक्षकांना निर्देशीत केले.

डायल 112 प्रकल्प नियंत्रण कक्षाला भेट
 बैठकीनंतर  पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पोलीस विभागाच्या डायल 112 प्रकल्प नियंत्रण कक्षाला भेट देत पाहणी केली. नियंत्रण कक्ष अत्याधुनिक करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात येईल ,असे त्यांनी सांगितले.

बैठकीनंतर स्थानिक माध्यम प्रतिनीधींशी पालकमंत्रयांनी संवाद साधला.