गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश; दोषींवर कठोर कारवाईचेही निर्देश
मुंबई ,12 नवंबर : त्रिपुरात घडलेल्या घटनेचे तीव्र पडसाद आज महाराष्ट्रात उमटले. महाराष्ट्रातील मुस्लिम बहुल शहरांमध्ये काही मुस्लिम संघटनांकडून आज बंद पुकारण्यात आला होता. यामध्ये अमरावती, नांदेड, परभणी, मालेगाव, भिवंडी शहरांचा समावेश आहे. त्रिपुरा घटनेविरोधात काही ठिकाणी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला हिंसक वळण लागले आणि दंगलीची परिस्थिती निर्माण झाली. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. परिस्थिती नियंत्रणात असून पोलिस प्रशासनाने दक्ष राहावे असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
(Home minister of maharashtra Dilip Walse Patil reaction on muslim violence in state)
🎙️काय म्हणाले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील?
त्रिपुरात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आज निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही ठिकाणी नांदेड, अमरावती, मालेगावमध्ये थोडंसं हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझी सर्व मुस्लिम समाजाला विनंती आहे की आपण शांतता राखावी. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. मी स्वतः या संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्फत मॉनिटरींग करण्याचं काम करतो आहे. याच्यामध्ये जे दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. परंतु आज आपण सर्वांनी एक सामाजिक ऐक्य राखणं अतिशय आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनात आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे. माझ्या पोलीस बांधवांनाही माझी हीच विनंती आहे ही परिस्थिती आपण संयमाने हाताळावी आणि राज्यात शांतता कशी राहिल यासाठी कार्य करावं, असे वळसे पाटील म्हणाले.