चंद्रपुर जिल्हा प्रशासनाकडून नवीन नियमावली जारी
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 1 डिसेंबर : कोविड-19 या संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका लक्षात घेता, विषाणूच्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठी व निर्बंध लावण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने नवीन नियमावली (Covid-19 New Guideline) जारी केली आहे. चंद्रपुर जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता (Vaccination), कोविड अनुरुप वर्तन, कार्यक्रमावरील निर्बंध, कोविड अनुरूप वर्तन विषयक नियम व दंड, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
कोविड अनुरूप वर्तनाचे पालन :
महाराष्ट्र राज्य शासन, केंद्र सरकार व या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्धारित केलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे, सेवा प्रदाते, परिवास्तूंचे मालक, परवानाधारक, आयोजक इत्यादीसह सर्वांनी तसेच सर्व अभ्यांगत, सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी इत्यादींनी काटेकोर पालन केले पाहिजे.
संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता :
तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या, कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती जसे की, खेळाडू अभिनेते इत्यादी, अभ्यागंत, पाहुणे, ग्राहक यांचे, यापुढे दिलेल्या व्याख्येनुसार, संपूर्ण लसीकरण केले असावे. जनतेतील कोणत्याही व्यक्तींना येण्याचा आणि सेवा घेण्याचा हक्क आहे असे कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन,मेळावे, इत्यादी ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे. अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण केलेले असावे.
सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल. राज्य शासनाने तयार केलेला युनिवर्सल पास हा संपूर्ण लसीकरण झाल्याचा स्थितीचा वैध पुरावा असेल. अन्यथा छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले कोविन प्रमाणपत्र देखील त्यासाठी वैध पुरावा मानला जाईल. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी, इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती लस घेऊ शकत नाही. त्या व्यक्तींसाठी प्रमाणित वैद्यकीय व्यवसायिकाकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल. येथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा त्यांच्यासाठी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी खुल्या असण्याची शर्त नसली तरी त्यांनादेखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्यात प्रवास :
कोणत्याही आंतरराष्ट्रीय ठिकाणावरून चंद्रपूर (Chandrapur District) जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे, या बाबतीतील भारत सरकारच्या निर्देशांद्वारे विनिमय करण्यात येईल. जिल्ह्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा 72 तासासाठी वैध असलेले आरटीपीसीआर (RT-PCR Test) चाचणी प्रमाणपत्र बाळगणे आवश्यक राहील.
कोणतेही कार्यक्रम, समारंभ उपस्थितीवर निर्बंध :
चित्रपटगृह, नाट्यगृह, मंगल कार्यालय, सभागृह इत्यादी बंदिस्त, बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या, उपक्रमाच्या बाबतीत जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना परवानगी असेल.
संपूर्ण खुल्या असलेल्या जागांच्या बाबतीत, कोणत्याही समारंभासाठी किंवा संमेलनासाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांना परवानगी असेल.
कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम व दंड :
कोविड-19 विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि ज्यामुळे त्याच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व संस्थेने पालन करण्याची गरज असलेले दैनंदिन सामान्य वर्तन अशी कोविड अनुरूप वर्तन या संज्ञेची व्याख्या करता येऊ शकेल. ज्यांचे कोविड अनुरूप वर्तन म्हणून वर्णन केले जाते अशा वर्तनाच्या पैलूंमध्ये, नमूद केलेल्या वर्तनांचा समावेश होतो. आणि कोविड-19 विषाणूचा प्रसार होण्यास जे अडथळा निर्माण करून शकतील, अशा सर्व तर्कसंगत पैलूचा देखील समावेश होतो. मूलभूत कोविड अनुरूप वर्तनाचे काही पैलू असून त्यांचे प्रत्येकाने सदैव पालन केले पाहिजे. सर्व संस्थांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की, त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांच्या परिसरांत भेट देणारे अभ्यागत, ग्राहक किंवा संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, सहभागी होणारी कोणतीही व्यक्ती, त्याचे पालन करतील आणि त्यांच्या परिसरांमध्ये आणि, किंवा व्यवसायाशी संबंधित व्यवहार करतांना किंवा संबंधित संस्थेशी संबंधित असलेली अन्य कार्य करताना, त्यांची अंमलबजावणी करण्याकरीता संस्था उत्तरदायी असतील.
संस्था, त्यांच्या नियंत्रणाखाली किंवा जेथे ती संस्था आपला व्यवहार किंवा इतर कार्य करत असेल, अशा सर्व ठिकाणी, अशा सर्व कर्मचा-यांनी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या हॅन्ड सॅनिटायझर, साबण व पाणी, तापमापक इ.गोष्टी उपलब्ध करण्यासाठी देखील जबाबदार आहेत. नेहमी योग्य पध्दतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. (रूमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असेल), जेथे शक्य असेल तेथे, नेहमी सामाजिक अंतर (6 फूट अंतर) राखा. साबणाने किंवा सैनिटायझरने वारंवार व हात स्वच्छ धुवा. साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक,डोळे,तोंड यांना स्पर्श करणे टाळा. योग्य श्वसन स्वच्छता (आरोग्य) राखा. पृष्ठभाग नियमितपणे आणि वारंवार स्वच्छ व निर्जंतुक करा. खोकतांना किंवा शिंकताना, टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाका आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करा. जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर, त्याने स्वत:चा हात नव्हे तर, हाताचा वाकलेला कोपरा नाका तोंडावर ठेवून खोकावे व शिंकावे. सार्वजनिक ठिकाणी धुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित 6 फूट अंतर राखा.
या नियमानुसार अपेक्षित असलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, याप्रसंगी रु. 500 इतका दंड आकारण्यात येईल. ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक इत्यादीवर कोविड अनुरूप वर्तन लादणे अपेक्षित आहे, अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही परीवास्तूत, जागेत, जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त अशा संस्थांना किंवा आस्थापनांवर रु. 10 हजार इतका दंड आकारण्यात येईल. जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच कोविड अनूरूप वर्तनाचे किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपद्धतीचे पालन न केल्यास प्रत्येक प्रसंगी रु. 50 हजार इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन्स काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.
कोविड अनुरुप वर्तणूक संबंधीच्यावर नमूद केलेल्या नियमांचे, अनिवार्यपणे पालन करण्यात यावे. त्याचे उल्लंघन केल्यास, नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे, उल्लंघन करणाऱ्यांवर इतर कोणताही दंड किंवा शास्ती करण्यात येईल. कोविड अनुरुप वर्तनाचे नियम व धोरणे दिलेल्या नमूद आदेशाप्रमाणे असतील, आणि विशेषरित्या नमूद न केलेले कोविड अनुरुप वर्तनाशी संबंधित असणारे इतर कोणतेही विषय, मुद्दे राज्य शासनाच्या अंमलात असलेल्या प्रचलित नियम व आदेशानुसार असतील.
सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 29 नोव्हेंबर 2021 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे.