दाताळा येथे ड्रोनद्वारे गावठाणची मोजणी, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत, चंद्रपुर जिल्हयात 1274 गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण होणार, गावठाणातील मिळकतधारकांना अद्ययावत नकाशा व मिळकत पत्रिका पुरविण्याच्या सुचना Chandrapur Datala Measument

दाताळा येथे ड्रोनद्वारे गावठाणची मोजणी

◾जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत 

चंद्रपुर जिल्हयात 1274 गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण होणार 

◾गावठाणातील मिळकतधारकांना अद्ययावत नकाशा व मिळकत पत्रिका पुरविण्याच्या सुचना

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि.21 जानेवारी : जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, पुणे यांच्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्हयातील 69 गावांचे गावठाणातील सर्वेक्षण ड्रोनव्दारे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.  दाताळा गावातील गावठाणाची ड्रोनद्वारे सर्वेक्षण मोजणी करतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित होते. ड्रोन सर्वेक्षणाचे काम अचूकतेने करुन जिल्हयातील गावठाणातील मिळकत धारकांना अद्ययावत नकाशा आणि मिळकत पत्रिका पुरविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी भूमि अभिलेख विभागाला दिल्या. Chandrapur Measurement
यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, सर्व्हे ऑफ इंडीयाचे इलू मलाई प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रामविकास विभागाच्या दि. 22 फेब्रुवारी 2019 च्या शासन परिपत्रकान्वये राज्यातील गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व गावांच्या गावठाणातील जमीनींचे जीआयएस आधारीत सर्वेक्षण व भुमापन करण्याचा शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे.

चंद्रपुर जिल्हयात 1274 गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण होणार आहे. ड्रोन सर्वेक्षणाबाबत सर्व्हे ऑफ इंडीयाचे इलू मलाई यांनी ड्रोनव्दारे सर्वेक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखविले, तसेच ड्रोनव्दारे गावाचे इमेज कशाप्रकारे घेतल्या जातात त्याबाबत माहिती दिली. जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख प्रमोद घाडगे यांनी ड्रोन सर्वेक्षण पूर्वीची पुर्वतयारी जसे, गावठाणातील मिळकतीचे चुना मार्कींग करणे, के.एम.एल तयार करणे आदीबाबत अवगत केले.

सदर ड्रोनव्दारे मोजणी करतेवेळी भूमि अभिलेख विभागाचे उपअधिक्षक मिलींद राऊत, दाताळाचे सरपंच रविंद्र लोनगाडगे, ग्रामसेवक गणेश कोकोडे, गावातील नागरिक तसेच भूमि अभिलेख विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.