चंद्रपुर जिल्ह्यातील कोविड-19 विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नवे निर्बंध लागू Corona strict restraining order issued in Chandrapur district

चंद्रपुर जिल्ह्यातील कोविड-19 विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नवे निर्बंध लागू

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 9 जानेवारी: चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड-19 विषाणूचा नजीकच्या काळात फैलाव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निर्बंध लागू करण्यात आले आहे. सदर निर्बंध चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दिनांक 10 जानेवारी 2022 च्या रात्री 12 वाजेपासून  लागू राहील. असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.
(Chandrapur District), (Chandrapur Collector)
(Corona strict restraining order issued in Chandrapur District).

नागरिकांच्या पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला बाहेर फिरण्यासाठी पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत बंदी राहील. तसेच अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना बाहेर फिरण्यासाठी रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी राहील.

शासकीय कार्यालयामध्ये महत्त्वाच्या कामासाठी कार्यालय प्रमुखाच्या लेखी परवानगीविना अागंतुकांवर बंदी राहील.

कार्यालय प्रमुखांनी नागरिकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेची व्यवस्था करावी. कार्यालय प्रमुखाच्या गरजेनुसार वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे तसेच गरजेनुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करणे याकरिता कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या वेळामध्ये बदलाचा विचार करू शकतील.
खाजगी कार्यालय व्यवस्थापनाने वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कामकाजाच्या वेळा कमी कराव्यात. कार्यालयात 50 टक्क्यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कर्मचाऱ्यांसाठी वेळांमध्ये बदल करण्याचा विचार करावा. तसेच कार्यालय 24 तास सुरू ठेवून टप्प्याटप्प्याने काम करण्याबाबत विचार करावा. कार्यालयीन कामकाजाच्या वेळा सामान्य असतील आणि त्यासाठी प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर अत्यावश्यक कामासाठी ओळखपत्र दाखवून परवानगी मिळवता येऊ शकेल.अशाप्रकारचा निर्णय घेतांना महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सोयीचा विचार करणे बंधनकारक राहील. लसीकरण पूर्ण केलेले कर्मचारीच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. कार्यालय व्यवस्थापन आणि सर्व कर्मचारी कोविडरोधी वागणुकीचे तंतोतंत पालन करतील याची दक्षता घ्यावी. कार्यालय व्यवस्थापनाने थर्मल स्कॅनर्स, हॅंड सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत.

लग्न समारंभासाठी कमाल 50 व्यक्ती उपस्थित राहू शकतील, अंत्यविधीसाठी कमाल 20 व्यक्ती तर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व  राजकीय कार्यक्रमास कमाल 50 व्यक्तींनाच परवानगी असेल.

शाळा आणि कॉलेज कोचिंग क्लासेस, विविध शैक्षणिक बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचे उपक्रम, प्रशासकीय कामकाज आणि शिक्षकांनी आस्थापना व्यतिरिक्त करायचे कामकाज, शालेय शिक्षण विभाग, कौशल्य आणि उद्योजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग आणि अन्य वैधानिक प्राधिकरणांकडून राबविण्यात येणार  किंवा परवानगी दिलेले उपक्रम आदी बाबी वगळता 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.

तसेच या निर्बंधांना अपवादाच्या स्थितीत हे विभाग आणि प्राधिकरणांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागेल.
स्विमिंग पूल, स्पा, वेलनेस सेंटर  पूर्णतः बंद राहतील.

हेअर कटिंग सलुन, ब्युटी सलून 50 टक्के क्षमतेने सुरु तर रोज रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील. हेअर कटिंग सलून व्यवसायिकांनी कोविड विरोधी वागणुकीचे काटेकोर पालन करावे. तसेच ग्राहक व केस  कापणाऱ्या सर्वांचे पूर्ण लसीकरण झालेले असणे बंधनकारक आहे.

 सर्व खेळांच्या स्पर्धा पुढे ढकलण्यात येतात फक्त आधीच जाहीर केलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा कोरोना वर्तणूक नियमांचे पालन करून सुरू राहतील. यामध्ये, प्रेक्षकांना बंदी, सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी बायो-बबल, सहभागी होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडूंसाठी भारत सरकारचे नियम लागू राहतील. सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी दर तिसऱ्या दिवशी आरटीपिसीआर व अॅंटीजन टेस्ट करणे बंधनकारक राहील. शहर किंवा जिल्हा पातळीवर खेळांचे शिबिर स्पर्धा आणि कार्यक्रमाच्या आयोजनाला बंदी राहील.

इंटरटेनमेंट पार्क, प्राणिसंग्रहालये, वस्तुसंग्रहालये, किल्ले आणि अन्य सशुल्क ठिकाणी नागरिकांसाठीचे कार्यक्रम, स्थानिक पर्यटन स्थळे बंद राहतील. तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प या पर्यटन स्थळाबाबत सदर आदेश 11जानेवारी 2022 च्या रात्री 12 वाजेपासून लागू राहील.

शॉपिंग मॉल्स, मार्केट,  कॉम्प्लेक्स, रेस्टॉरंट्स व उपहार गृह,  नाट्यगृह, सिनेमा थिएटर्स 50 टक्के क्षमतेने सुरू राहील, सर्व आगंतुकाच्या माहितीसाठी आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकांची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक राहील.

सर्व आगंतुक आणि कर्मचारी कोविडरोधी वागणुकीचे तंतोतंत पालन करतील याची दक्षता घेण्यासाठी आस्थापनांनी मार्शल नेमावेत.
 
अॅंटीजन चाचणीसाठी बुथ व किआॅक्स, तर फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात येईल. सर्व शॉपिंग मॉल्स व मार्केट दररोज रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत बंद राहतील. रेस्टॉरंट्स उपहारगृहास दररोज होम डिलिव्हरीला परवानगी राहील.

आंतरराष्ट्रीय प्रवास भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करता येईल तर देशांतर्गत प्रवास कोविडरोधी दोन लसी किंवा राज्यात प्रवेश करण्याआधी 72 तासापूर्वी, पर्यंत आरटीपिसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल ग्राह्य धरण्यात येईल. हवाई, रेल्वे आणि रस्ते या तिन्ही मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लागू राहील.

कार्गो ट्रान्सपोर्ट, औद्योगिक कामकाज व इमारतीचे बांधकाम  पूर्ण लसीकरण केलेल्या व्यक्तीकडूनच सुरू राहील. तसेच सार्वजनिक वाहतूक पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी, नियमित वेळेनुसार राहील.

युपीएससी, एमपीएससी, वैधानिक प्राधिकरणे, सार्वजनिक संस्था इत्यादीद्वारे राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षा भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पार पाडल्या जातील. अशा परीक्षासाठीचे प्रवेशपत्र प्रवासाची अत्यावश्यकता सिद्ध करण्यास पुरेसे असेल. राज्याच्या पातळीवर घेण्यात येणाऱ्या परीक्षा ज्यांच्यासाठीची प्रवेशपत्रे आधीच निर्गमित झाली आहेत किंवा ज्यांच्या तारखा आधीच निश्चित करण्यात आल्या आहेत, त्या परीक्षा अधिसूचनेनुसार पार पडतील. अन्य सर्व परीक्षा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतरच पार पाडल्या जातील. तसेच परीक्षांचे संचालन करताना कोविडरोधी नियमांचे काटेकोर पालन केले जाईल.

व्यायामशाळा 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील, व्यायाम शाळेमध्ये कुठलाही प्रकारचा व्यायाम अॅक्टिव्हिटी करतांना मास्क काढण्याची परवानगी नसेल. पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल. व्यायाम शाळेमध्ये कार्यरत असलेले सर्व कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण झालेले असावे.

प्रवासासाठी वैद्यकीय इमर्जन्सी, अत्यावश्यक सेवा, विमानतळ रेल्वे स्थानक बस स्थानक येथे जाणे किंवा येण्याआधी वैध तिकिटे तसेच 24 तास सुरू राहणाऱ्या कार्यालयांसाठी, विविध पाळी मध्ये काम करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांच्या प्रवास अत्यावश्यक मानला जाईल.

दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल तसेच इ-कॉमर्स किंवा होम डिलिव्हरी करणाऱ्या आस्थापनेतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. यासाठी व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात येईल. तसेच आवश्यक बाबींची पूर्तता न केल्याचे आढळल्यास सदर आस्थापना बंद करण्यात येईल.या कामात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची नियमित वेळानंतर सदर आस्थापनेने अॅटींजेन चाचणी करून घेणे गरजेचे आहे.

कोविड व्यवस्थापनाच्या कामासाठी राज्य सरकारची कार्यालये किंवा राज्य सरकारद्वारे अर्थसहाय्यीत अन्य संस्थांचे कर्मचारी आणि संसाधने यांची मागणी करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला राहतील.

सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 10 जानेवारी 2022 चे रात्री 12 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील. असे  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.