मुंबईसह कोण-कोणत्या शहरातील शाळा बंद करण्याचा निर्णय?
#Loktantrakiawaaz
मुंबई,03 जानेवारी 2022 :महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Maharashtra Corona Outbreak) पुन्हा एकदा वाढलाय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज महाराष्ट्र राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजार पार गेलाय. ओमिक्रॉन विषाणूची (Omicron Variant) लागण झालेल्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. अशावेळी राज्यातील कोरोना प्रादुर्भाव वाढलेल्या शहरातील शाळा बंद (School Closed) करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आदी शहरांचा समावेश आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय ठरु लागला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगितलं जातंय. पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत अखेर निर्णय घेतलाय. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत. मात्र शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद राहणार आहेत.
➡️ ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील
ओमिक्रोन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार संसर्ग रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्गासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाठी दिनांक 31 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवून ऑनलाईन पध्दतीने वर्ग सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली आहे.
नवी मुंबईतील शाळा बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. नवी मुंबईतील पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग बंद राहणार आहेत. तसंच 11वीचे वर्गही बंद ठेवण्यात येणार आहेत फक्त 10वी आणि 12वीचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय 31 जानेवारीपर्यंत लागू असणार आहे.
➡️ पालघर जिल्ह्यातील शाळा
आजपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार
पालघर जिल्ह्यातील बालवाड्या, इंग्रजी माध्यमाच्या नर्सरी, ज्यूनियर केजी, सिनियर केजीच्या शाळा बंद राहणार आहेत. लहान मुलांना कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. तसे आदेश पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. या आदेशानुसार जिल्हातील वर नमूद केलेल्या शाळा आजपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत.
➡️ पुण्यात तूर्तास तरी शाळा बंदचा निर्णय नसल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं
महापौर मुरलीधर मोहोळ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आज पार पडली. पुण्यात तूर्तास तरी शाळा बंदचा निर्णय नसल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर नव्या निर्बंधांबाबत निर्णय होईल, असं महापौर म्हणाले. लसीकरणाबाबत पुणे राज्यात सर्वात पुढे आहे. 10 जानेवारीपासून बुस्टर डोस सुरु करत आहोत. तसंच नवीन निर्बंधांसंदर्भात पालकमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. यात शाळा, उद्यानं आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत विचार केला जाईल, असं महापौरांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.