उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी चंद्रपुर जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी, ानागरिकांनी काय करावे ? नागरिकांनी काय करू नये? Chandrapur district administration issues guidelines to protect against heat waves, what should citizens do? What should citizens not do?


उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी
चंद्रपुर जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी,

नागरिकांनी काय करावे ?

नागरिकांनी काय करू नये?

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर दि. 30 मार्च: प्रादेशिक हवामान विभाग नागपूर यांनी दिलेल्या हवामान विषयक पूर्वसूचना मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 31 मार्च 2022 रोजी तापमानात वाढ होणार असून उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी उष्माघाताच्या स्थितीत नागरिकांनी काय करावे व काय करू नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आल्या आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी, उष्णतेच्या लाटेची माहिती देण्याकरिता रेडिओ, टीव्ही, सोशल मीडिया व स्थानिक वृत्तपत्रे प्रसार माध्यमांचा वापर करण्यात यावा. चंद्रपुर जिल्हा नियंत्रण कक्ष महानगरपालिका नियंत्रण कक्ष विभागीय स्तरावरील नियंत्रण कक्ष व स्थानिक संस्था आणि आरोग्य विभागांनी एकत्रित कार्य करावे. सर्व संबंधित विभाग स्थानिक पुढारी व सामाजिक संस्थांनी सदर कार्यात सामील व्हावे.

काय करावे :
तहान लागलेली नसेल तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सुतीकपडे वापरावेत. घराबाहेर पडताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलाचा वापर करावा. प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करतांना डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्याने डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, लस्सी, लिंबूपाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावेत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पुरेसे पाणी द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे , शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करीत असतांना मध्ये-मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा. गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.

काय करू नये:
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालने टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हाळ्याच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावी.

चंद्रपुर जिल्ह्यातील नागरिकांनी उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी केले आहे.

Chandrapur district administration issues guidelines to protect against heat waves, what should citizens do?  What should citizens not do?