आम्ही धावलो अन् जिंकलोही…!
#Loktantrakiawaaz
नागपूर, दि. 13 मार्च : ‘ब्रेक द बायस’ म्हणजेच ‘भेदभाव सोडा…’ हे घोषवाक्य घेऊन नागपूरकर नारीशक्ती आज सकाळी 7 वाजता कस्तुरचंद पार्क –जीपीओ चौक- लेडीज क्लब चौक- जपानी गार्डन- ते पुन्हा कस्तुरचंद पार्क अशा पाच, तीन आणि दोन किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाली…, धावली आणि जिंकलीही….!
सकाळी सात वाजता सुरु झालेली पाच किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा “भेदभाव सोडा 'महिला सुरक्षेला महत्त्व द्या', रस्ते अपघात टाळा, रस्ता सुरक्षेला महत्त्व द्या, अनावश्यक हॉर्नचा वापर टाळा, ध्वनी प्रदूषणाला घाला आळा, ‘वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळा’ असे अनेक संदेश देत रविवारची पहाट उजाडली. या महिला मॅरेथॉन आयोजनाची तयारी नागपूर जिल्हा प्रशासनाने केली होती.
वनामतीच्या संचालक एस. भुवनेश्वरी, उपविभागीय अधिकारी वंदना सरंगपते यांनीही स्पर्धेत सहभागी होत उत्साह वाढविला. नीता गडेकर या शिक्षिकेने त्यांच्या शाळेतील विद्यार्थिनींसोबत धावत मुलींना प्रोत्साहित केले. कविता खोब्रागडे या महिलेने राज्य शासनामार्फत कर्णबधिरांना सर्जरीकरिता अर्थसहाय योजनेचे फलक हाती घेत योजनांच्या जनजागृतीकडे लक्ष वेधले होते.
राज्य शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कामही या महामॅरेथॉन स्पर्धेतून करण्यात आले. अनेक छोट्या मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांनीही या स्पर्धेमध्ये सहभागी होते, मॅरेथॉन स्पर्धेचा मूळ उद्देश पूर्ण केला. ‘मुलगी आहे, लढू शकते’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देत ही नागपूरकर नारीशक्ती भविष्यातील येणाऱ्या आव्हानांचा सक्षमपणे सामना करु शकते, असा संदेशही यातील अनेक महिला स्पर्धकांनी विविध फलक हाती घेऊन दिला.
कस्तुरचंद पार्कपासून सुरु झालेल्या मॅरेथॉनच्या मार्गावरील विद्युतखांबांवर गुलाबी रंग असलेल्या फुग्यांच्या गुच्छांचे तोरण बांधण्यात आले होते. तसेच या मार्गावर जिपीओ चौकात कवयित्री बहिणाबाई चौधरी, दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या फलकांच्या माध्यमातून स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यात येत होता. नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’चे फलक हाती धरत सहभाग नोंदवत स्पर्धकांचा उत्साह वाढविला. महिला वाहतूक पोलिस, पोलिस कॉस्टेबल, रुग्णवाहिका, मार्गावर पडलेल्या पाण्याच्या, शीतपेयाच्या बाटल्या आदी कचरा वेळेत साफसफाई करणारे नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलिस विभाग आणि तसेच माध्यमप्रतिनिधी सहभागी झाले होते.
नऊवारी साडीतील काही महिला स्पर्धकांनी सहभागी होत आम्हीही यात पुढे असल्याचे दाखवून दिले. शालेय मुली, एनसीसी कॅडेट्सचा सहभागही उत्साहवर्धक होता. या मॅरेथॉनमध्ये ‘भेदभाव सोडा’च्या घोषवाक्यानुसार विविध धर्माच्या महिला स्पर्धक सहभागी झाल्या. काही ग्रुपने थकल्यानंतर सेल्फी काढली. ‘घे हात हाती’ म्हणत थकलेल्या मैत्रिणींच्या ग्रूपने रस्त्यातच एकमेकींना आधार दिला. ‘मिळून साऱ्या जणी’ म्हणत लढण्याची आणि धावण्याची एकमेकींमध्ये उमेद जागवली. स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर दरम्यान काहींच्या शुजची लेस सुटल्यानंतर एकमेकींना ती व्यवस्थित बांधून देत सोबत असल्याचे दाखवून दिले.
Nagpur Nari Shakti...We ran and won.
खबरों और अपडेट के लिए कृपया loktantrakiawaaz.co.in पर क्लिक करे