लर्न टू एज्युकेट फोरम व पुरोगामी साहित्य संसद च्या वतीने कार्यक्रम संपन्न, 'श्रमप्रतिष्ठा' पुरस्कार स्वीकारल्या नंतर अनेकांचे मन गहिवरले Learn to Educate Forum

लर्न टू एज्युकेट फोरम व पुरोगामी साहित्य संसद च्या वतीने कार्यक्रम संपन्न

'श्रमप्रतिष्ठा' पुरस्कार स्वीकारल्या नंतर अनेकांचे मन गहिवरले

चंद्रपूर-ऑटो चालक पतीला अचानक लकवा मारला,मी गोंधळली,बावरली रुग्णालयात दाखल करायलाही कुणाची मदत नाही...अखेर पतीला रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयाचा खर्च भागवायचा कसा?धुणीभांडी केली तर जास्तीत जास्त २ हजार मासिक पगार मिळेल.कुठला जॉब बघावा तर तेवढं शिक्षण नाही.रुग्णालयाचा खर्च,घर खर्च कसा भगवावा?हा मोठा प्रश्न उभा ठाकला असतांना पतीने ऑटोची चावी हातात दिली...आणि मी बल्लारपूर शहराची पहिली महिला ऑटो चालक झाली...खुप विरोध झाला,अडचणी जगणं शिकवतात.बळकट करतात...आज मी माझ्या पतीमुळेच स्वावलंबी होऊ शकले...हे उद्गार आहेत बल्लारपूर शहरातील पहिल्या महिला ऑटो चालक सपना पाटील यांचे...लर्न टू एज्युकेट फोरम आणि पुरोगामी साहित्य संसदेच्या संयुक्त विद्यमाने महामानवांच्या जयंती निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात 'श्रम प्रतिष्ठा सन्मान' पुरस्काराचे उत्तर देतांना डबडबलेल्या नयनांनी बोलत होत्या.

लर्न टू एज्युकेट फोरम आणि पुरोगामी साहित्य संसद च्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रियदर्शी सम्राट अशोक, सामाजिक सुधारणेचे अग्रणी महामानव ज्योतीबा फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्थानिक श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या हॉल मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ९ एप्रिल रोजी आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. मिलिंद वाघमारे आणि मा. निलेश ठाकरे, विदर्भ संघटक पुरोगामी पत्रकार संघ, मा नरेन सोनारकर, विदर्भ अध्यक्ष पुरोगामी साहीत्य संसद यांच्या प्रमुख उपस्थितीत व एड.योगिता रायपुरे यांच्या अध्यक्षतेत तथा संगीत घोडेस्वार यांच्या सूत्रसंचालनात दीप प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी "निमंत्रकांचे कवी संमेलन" संपन्न झाले. या कवी संमेलनात सरीता भोयर, सरोज हिवरे, (राजूरा) हर्षा झाडे (लक्कडकोट), विजय भसारकर, (वरोरा) सीमा भसारकर, नरेन्द्र सोनारकर खडसे ताई,सोनाली कवाडे, मोन्टो मानकर इत्यादि प्रसिद्ध कवी-कवियत्री यांनी सहभाग नोंदवला.
सायंकाळी  'आजच्या पिढीला विज्ञानवादी विचारांची गरज' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. परिसंवादाचे प्रास्थाविक उपाध्यक्ष डॉ.क्षमा गवई यांनी केले.  मार्गदर्शक डॉ.योगेश्वर दुधपचारे यांनी विषयाला सखोल हात घालून मोलाचे मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ज्योती वाघमारे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अखेरीस लर्न टू एज्यूकेट फोरम चंद्रपूर तर्फे "श्रम प्रतिष्ठा सन्मान" चे वितरण करण्यात आले. यात बल्लारपूर येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर भगत,पोष्ट वुमेन मा. मनिषा बुटले, चंद्रपूर, सामाजिक कार्यकर्त्या सुशीला तेलमोरे चिनोरा, प्रा. नागसेन शंभरकर चंद्रपूर, बल्लारपूर शहरातील पहिल्या महिला ऑटोचालक सपना पाटील यांचा शाल, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

एड.योगिता रायपुरे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी लर्न टू एज्युकेशन फोरम व पुरोगामी साहीत्य संसद चे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच सहसचिव सुरेखा साठे, संगिता वेल्हे, शंकर पुरडकर, स्वाती कंत्रोजवार, कोषाध्यक्ष विप्रा पाटील, वैशाली आवळे, योगिता‌ खोब्रागडे यांनी परिश्रम घेतले...