अमली पदार्थांचा विळखा तोडा, 26 जून ‘अमली पदार्थ विरोधी दिन’ या दिनानिमित्त या संदर्भातील प्रयत्नांचा आढावा घेणारा हा विशेष लेख, विशेष लेख- प्रवीण कृ. टाके जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर Break the cycle of drugs

अमली पदार्थांचा विळखा तोडा

26 जून  ‘अमली पदार्थ विरोधी दिन’ 

या दिनानिमित्त या संदर्भातील प्रयत्नांचा आढावा घेणारा हा विशेष लेख

विशेष लेख- प्रवीण कृ. टाके
जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर

भारताचे हृदय स्थान असणाऱ्या नागपूर शहरातील तरुणाई अमली पदार्थाच्या जाळ्यात अडकू नये, यासाठी गुन्हे शाखा विभागामार्फत विशेष मोहीम शहरात राबविली जात आहे. 'जनजागृती आणि दोष सिद्धी 'या द्विस्तरीय सूत्रावर ही कारवाई सध्या सुरू आहे. 26 जून  ‘अमली पदार्थ विरोधी दिन’ या दिनानिमित्त या संदर्भातील प्रयत्नांचा आढावा घेणारा हा विशेष लेख.

जगात अमली पदार्थांचे सेवन अनेक देशात वाढते आहे. नव्या अघोरी आनंदाच्या शोधात असणारे गर्भश्रीमंत तसेच, निराशा व वैफल्यग्रस्तता विसरण्याचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात असलेले, मध्यमवर्गीय-गरीब युवक अमली पदार्थांच्या सेवनाच्या जाळ्यात ओढले जातात. अशा युवकांना पुन्हा योग्य मार्गावर आणणारा नातेवाईक व मित्र मिळाला नाही तर त्यांचे जीवन वाया जाते. त्यामुळे नागपूर सारख्या महानगरांमध्ये गुन्हे शाखेच्यामार्फत अमली पदार्थ विरोधी विशेष कारवाई सध्या सुरू असून त्यासाठी आयपीएस दर्जाचे अधिकारी विशेष मोहीम राबवीत आहेत. गुन्हे शाखेच्या उपायुक्तांकडे ही जबाबदारी देण्यात आली असून प्रचार-प्रसार आणि दोष सिद्धता याकडे प्रत्येक पोलीस ठाणे निहाय आढावा घेतला जात आहे. त्यामुळे नागपूर व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून या संदर्भात कारवाई केली जात आहे. एकट्या नागपूर शहरात आतापर्यंत जानेवारी महिन्यापासून 98 केसेस करण्यात आलेल्या आहेत.
काही घटनांमध्ये तर घरचा आधार गेल्याने कुटुंब उद्धवस्त होतात. म्हणून अमली पदार्थांचा विळखा तोडण्यासाठी सर्व पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत.       
विस्कळीत कुटुंब व्यवस्थाही घरातील मुलांना अमली पदार्थांच्या आहारी जाण्यास कारणीभूत ठरतात. पती-पत्नीतील वितंडवादात मुले एकटी पडतात, त्यांचा कोंडमारा होतो. अनेक ठिकाणी अशा मानसिक तणावातून बाहेर पडण्याच्या धडपडीत असलेली मुले अमली पदार्थांच्या आहारी जातात. यामुळे कुटुंबात सर्व जण मोकळेपणाने एकमेकांशी बोलू शकतील, असे वातावरण घरात राहील याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. 
अमली पदार्थात गांजा, हशीश, हेरॉइन किंवा ब्राऊन शुगर याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. श्रीमंत वर्गातले लोक मात्र महाग अशा कोकेन, सिंथेटिक आणि डिझाइनर ड्रग्ज घेतात. असे ड्रग्ज रेव्ह पार्टीजमध्ये वापरले जातात. 

अमली पदार्थांच्या अति सेवनाने मेंदूच्या पेशींच्या क्रियात बिघाड होते. व्यसनी व्यक्ती इतरात मिसळणे टाळतो. कारण, अमली पदार्थांच्या गुंगीत शुद्ध राहत नाही. वेगवेगळे भास होतात. त्यामुळे शारीरिक हालचालींवरचे नियंत्रण सुटते. सामाजिक- आर्थिक व्यवहारांचे भान राहत नाही. 
अशा शोकांतिका टाळण्यासाठी 26 जून हा दिवस ‘अमली पदार्थ विरोधी दिन’ म्हणून जगभर पाळला जातो. विविध कार्यक्रमातून अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत समाजात जनजागृती करण्यात येते. 
अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तीला ठरल्यावेळी ‘खुराक’ मिळाली नाही तर त्याचे शारीरिक आणि मानसिक संतुलन बिघडते. सारासार विचार करण्याची क्षमता नष्ट होते. तीव्र अमली पदार्थ अतिशय महाग असतात. त्यासाठी खूप जास्त खर्च करावा लागतो. अशा स्थितीत व्यसनी व्यक्तीजवळ पैसे नसले तर तो चोरीही करतो. यामुळे ज्या घरात व्यसनी व्यक्ती असतो त्या घरात चोऱ्या होतात. पण, अशा चोऱ्या कोण करतो आणि का होतात, हे त्या कुटुंबाच्या लक्षात आले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका असतो. अशा चोऱ्या व्यसनी व्यक्तीकडून दुसऱ्यांच्या घरात होऊ लागल्या तर तो सामाजिक गुन्हेगारीचा विषय होतो. 
हा सर्व विषय गुन्हेगारीशी संबंधित असल्याने स्वाभाविकच याचा संबंध पोलिसांशी येतो. अमली पदार्थांच्या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसात एक वेगळी शाखाच उघडण्यात आली आहे. जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचे गठन करण्यात आले आहे. या माध्यमातून नियमित आढावा घेणे, नागपूर शहरात खसखस किंवा गांजा पिकांची अवैध लागवड होणार नाही याची दक्षता घेणे, डार्क नेट, कुरियर यामाध्यमातून अंमली पदार्थाची मागणी व पुरवठा होणार नाही याबाबत लक्ष ठेवणे, नागपूर शहरातील व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल व्यक्तींची संख्या व त्यांच्या व्यसनाची नोंद घेणे, ड्रग्स डिटेक्शन कीट व टेस्टिंग केमिकल्स यांची उपलब्धता सुनिश्चित करणे, दुष्परिणामांबाबत जनजागृती अभियान राबविणे, गुन्ह्यांच्या नोंदीचा डाटाबेस तयार करणे, अन्न व औषधी कामगार विभागाची संपर्क साधने, अशा आघाड्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे. 
अमली पदार्थांच्या तस्करीसाठी वेगवेगळे मार्ग वापरले जातात. सध्याच्या ‘ऑनलाइन’च्या काळातला नवीन मार्ग म्हणजे 'ऑनलाइन फार्मसीज' किंवा 'इंटरनेट फार्मसीज'. यात कोणीही कुठनही दुकानांमध्ये ड्रग्जची ऑनलाइन मागणी नोंदवू शकतो. ग्राहकाला घरबसल्या 'माल' मिळतो. त्यामुळे आता नागपूर पोलिसांनी पार्सल व्यवसायात असणाऱ्या व्यावसायिकांवर ही नजर ठेवणे सुरू केले आहे. स्पीड पोस्ट, कुरीअर सेन्टर याठिकाणी काही संशयास्पद असल्यास लगेच पोलिसांना कळविण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. नागपूर शहरात मुख्यता अमलीपदार्थ येण्याचे ठिकाण हे ओडिसा आणि विशाखापट्टणम या भागातून अधिक आहे. आतापर्यंतच्या गुन्ह्यांमध्ये या भागातून गांजा आल्याचे दिसून येते. एमडी या मादक पदार्थांची वाहतूक मुंबईतून झाल्याचे दिसून येते. त्यामुळे रेल्वेमार्गे होणारी तस्करी, ट्रकने होणारी तस्करी, याशिवाय चोरीची वाहने यासाठी वापरण्यात येत असल्याचे पुढे आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून 324 किलो गांजा पकडण्यात आला आहे.
अशावेळी सामान्य नागरिकांनी पोलिसांचे नाक, डोळे, कान व्हावे असे आवाहन पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी केले आहे. आपल्या घरातील तरुणाई कोणत्याही व्यसनाला बळी पडणार नाही, याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याचे दिवस आहेत. मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना विश्वासात घेण्याचे आवाहन केले जात आहे. कुठल्याही संशयास्पद हालचालींची माहितीही पोलिसांना देण्याबाबतही आवाहन करण्यात आले आहे.

 ✍🏻  प्रवीण कृ. टाके
जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर

Break the cycle of drugs.

This is a special article reviewing the efforts made in this regard on the occasion of 26th June, ‘Anti-Drug Day’.
       
Special article- Praveen Take
District Information Officer, Nagpur.