चंद्रपुर मध्ये एचआयव्ही/एड्स नियंत्रण विषयक कामाचा आढावा, जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली बैठक Review of HIV / AIDS control work in Chandrapur, meeting chaired by District Collector

चंद्रपुर मध्ये एचआयव्ही/एड्स नियंत्रण विषयक कामाचा आढावा

Ø जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

चंद्रपूर, दि. 20 जून :चंद्रपुर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी सन 2021-22 मध्ये व चालू वर्षांत, जिल्ह्यात झालेल्या कामाचा तालुकानिहाय व सर्व निर्देशांकानुसार अहवाल सादर केला. यामध्ये एचआयव्ही तपासणी, एआरटी नोंदणी केलेले, उपचार घेणारे व एचआयव्हीसह जगणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सामाजिक लाभ योजनांची माहिती सादर करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, एचआयव्हीसह जगणाऱ्यांना संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय योजना, बस पास योजना आदी योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच अशा व्यक्तिंची तालुकानिहाय आकडेवारी गोळा करून त्यांच्यापर्यंत योजना पोहचवाव्यात. एचआयव्हीसह जगणाऱ्या लहान मुलांना बाल संगोपन योजना देण्यासंदर्भात महिला व बालविकास विभागाला सांगण्यात आले. जिल्ह्यातील अतिजोखीम गटात असणाऱ्या देहविक्री करणाऱ्या स्त्रिया, हिजरा गटातील समुदाय यांना शोधून त्यांची शंभर टक्के एचआयव्ही तपासणी करणे, तसेच त्यांना सर्व शासकीय योजनांची पूर्तता करावी, अशा सुचना त्यांनी दिल्या. महाराष्ट्रामध्ये  एड्स नियंत्रणाच्या कामात चंद्रपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याबद्दल जिल्हाधिका-यांनी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या कामाचे अभिनंदन केले.

सादरीकरणातून पानगंटीवार यांनी सांगितले की, जिल्ह्यात ज्या भागात नव्याने एचआयव्ही बाधित आढळले आहेत, अशा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून त्यांची सिफिलीस तपासणी, आरपीआर तपासणी, क्षयरोगाची तपासणी, हिपेटायटीस ‘बी’ व ‘सी’ ची तपासणी करण्यात येते. त्याचप्रमाणे प्रत्येक गावात पोहचून कंडोम प्रमोशन वर भर देणे, जेल प्रशासनासोबत समन्वय साधून विशेष कार्यक्रमाची आखणी करणे, बंदीवाणाची एचआयव्ही, हिपेटायटीस बी/सी तसेच आरपीआर तपासणी करण्यात येत असल्याची माहिती दिली.

चंद्रपूर जिल्ह्यात एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षा अंतर्गत ग्रामीण व शहरी भागात संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था (लिंक वर्कर प्रकल्प) व संबोधन ट्रस्ट, नोबल शिक्षण संस्था, जनहिताय मंडळ या स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते.

बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे, डॉ. हेमचंद कन्नाके, एआरटी केंद्राचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप मडावी, बालरोगतज्ज्ञ डॉ. रफिक मावानी, जिल्हा महिला व बाल अधिकारी दीपक बानाईत, डॉ. नरेंद्र जनबंधु, तुरुंगाधिकारी विठ्ठल पवार, यांच्यासह एड्स नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Review of HIV / AIDS control work in Chandrapur, meeting chaired by District Collector.