◆ समोरचे दोन-तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
चंद्रपूर, दि. 10 जुलै : भारतीय हवामान खाते यांनी चंद्रपूर जिल्ह्याकरिता 10, 11 व 12 जुलै 2022 या दिवसांसाठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात एक दोन ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसासह व विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनांचा इशारा दिला आहे. तसेच जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी देखील वाढत असल्यामुळे नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
धरण क्षेत्रात पडणारा पाऊस व आजूबाजूच्या क्षेत्रातून धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवाकामुळे पूर परिस्थिती लक्षात घेता दारे असणारे मोठ्या धरणाचे वक्रद्वार (गेट) केव्हाही उघडण्यात येऊ शकतात व दारे नसणारे धरणातील पाणीसाठा शंभर टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यावर नदी नाल्यातून पुराचे पाहणी वाहणार असल्याकारणाने नदीकाठावरील सर्व नागरिकांनी / शेतकऱ्यांनी शेतात लागणारे यंत्र (अवजारे) तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी करून ठेवावी. तसेच नदीच्या काठावरील गावातील नागरिकांना नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वतःची काळजी बाळगावी.
खालीलप्रमाणे नागरिकांनी काळजी घ्यावी
भारतीय हवामान खाते, जिल्हा प्रशासन तसेच विविध माध्यमातून प्राप्त होणाऱ्या हवामान अंदाज व धरणाबाबत स्थिती व पाण्याचा विसर्ग यावर कटाक्ष ठेवून सतर्क रहावे. कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नये. नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात / इमारतीत आश्रय घेऊ नका. पुलावरून नदी नाल्याचे पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका, तसेच अफवा पसरू नका. धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नका. घडलेल्या घटनेची आपत्तीची माहिती तात्काळ जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षाला द्यावी. यासाठी चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या 07172 - 251597 या क्रमांकावर नियंत्रण कक्षात संपर्क करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव विशालकुमार मेश्राम यांनी केले आहे.
Administration appeals to the citizens of Chandrapur district to take care against the backdrop of heavy rains, Warning of torrential rain for the next two-three days.