‘हर घर झेंडा’ अभियान करीता चंद्रपुर जिल्ह्यातील उद्योजकांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
चंद्रपूर, दि. 20 जुलै : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक यांचे तसेच स्वातंत्र संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची भावना जनसामान्यांत कायम राहावी, या उद्देशाने 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर झेंडा’ अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी नियोजन केले असून जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी अभियानाकरीता सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
चंद्रपुर जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योजकांशी दूरदृष्यप्रणालीने संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे, पालिका प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके, कौशल्य विकास विभागाचे भैयाजी येरमे आदी उपस्थित होते.
चंद्रपुर जिल्ह्यातील 4 लक्ष 94 हजार कुटुंबासाठी झेंड्यांची आवश्यकता आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले. या अभियानासाठी सर्व घटकांचे प्रशासनाला सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग असून उद्योजकांनी आपापल्या आस्थापनांमधील सर्व कर्मचा-यांच्या वसाहतींवर झेंडा लावण्याचे नियोजन करावे. एवढेच नाही तर उद्योगांच्या परिसरातील गावे दत्तक घेऊन प्रायोजकत्व स्वीकारावे. जेणेकरून नागरिकांना झेंड्याची उपलब्धता होईल, असे त्यांनी सांगितले.
बैठकीला चमन मेटॅलिक, लॉयड्स मेटल्स, वेकोलि, जीआयपीएल, गोपानी, दालमिया सिमेंट, अल्ट्राटेक आदी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
-घरोघरी लावण्यात येणा-या ध्वजा संदर्भात सर्वसाधारण अटी व शर्ती :
राष्ट्रध्वज आयाताकृती आकाराचा असेल व त्याची लांबी व रुंदी 3:2 इतके राहील. बोधचिन्ह व नावे अधिनियम 1950 चा भंग करून विणिज्यिक प्रयोजनासाठी ध्वजाचा वापर करता येणार नाही. खाजगी अंत्यसंस्कारासह जे कोणतेही असेल अशा कोणत्याही स्वरुपातील आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करता येणार नाही. ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिता येणार नाही. कोणतीही वस्तु घेण्याचे, देण्याचे, बांधण्याचे किंवा वाहून नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही. ध्वजाचा जमिनीची स्पर्श होऊ देऊ नये किंवा तो पाण्यावरून फरफटत नेऊ नये. ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येईल, अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून आणि स्पष्टपणे दिसेल अशा रितीने लावला पाहिजे. फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावू नये. राष्ट्रध्वज अन्य कोणत्याही ध्वजासोबत एकाच वेळी एकाच काठीवर फडकवू नये.
राष्ट्रध्वजाच्या वर किंवा त्याच्या बरोबरीने अन्य कोणताही ध्वज किंवा पताका लावू नये. तसेच ज्या काठीवर ध्वज फडकवत ठेवला असेल त्या काठीवर किंवा काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार यासह कोणतीही वस्तु ठेवू नये अथवा बोधचिन्ह लावू नये. ध्वजाचा तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये. जेव्हा ध्वज मोकळ्या जागेत लावायचा असेल तेव्हा हवामानाची स्थिती विचारात न घेता शक्यतोवर तो सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत लावण्यात यावा. ध्वज फाटेल अशा कोणत्याही रितीने लावू नये किंवा बांधू नये आणि जेव्हा ध्वज फाटला असेल किंवा मळल्यामुळे खराब झाला असेल तेव्हा विशेषत: जाळून किंवा त्याची प्रतिष्ठा राखली जाईल, अशा अन्य कोणत्याही पध्दतीने तो खाजगीरित्या संपूर्णपणे नष्ट करावा.
या व्यतिरिक्त इतर आवश्यक सूचना, अटी व शर्तीसाठी ध्वज संहिता 2006 चे अवलोकन करावे, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
Entrepreneurs of Chandrapur district should cooperate for 'Har Ghar Zenda' campaign - Collector Ajay Gulhane