आमचा रस्ता थेट जनतेच्या हृदयापर्यंत पोचतो
हर घर तिरंगा अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
भव्य मिरवणूकीद्वारे लोकनेते सुधीर मुनगंटीवार यांचे जोरदार स्वागत
मी मंत्रीपदाची शपथ घेवून चंद्रपुरात आलो ते जनतेची सेवा करण्याचा संकल्प करून, मवीआ सरकारच्या काळात रखड़लेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी. आमच्या मनात कोणाविषयी कपट नाही, असूया नाही. आमची भावना विशुद्ध आहे. आमचा रस्ता सरळ आहे व तो थेट जनतेच्या हृदया पर्यंत पोचतो. माझ्या अर्थमंत्री पदाच्या काळात टाटा ट्रस्ट च्या सहकार्याने जे कैंसर हॉस्पिटल मंजूर केले होते त्याचे उदघाटन येत्या २६ जानेवारीला करेन अशी घोषणा नवनियुक्त मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
मंत्री झाल्यावर चंद्रपुरात प्रथम आगमन झाल्यानंतर भव्य मिरवणूकी द्वारे श्री सुधीर मुनगंटीवार यांचे जोरदार स्वागत झाले. या मिरवणूकीची सांगता गांधी चौकात जाहिर सभेने झाली.या सभेत श्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपुरचे आराध्य दैवत माता महाकाली देवस्थान परिसराच्या विकासासाठी मी २०१९ मध्ये ६० कोटी रु निधी मंजूर करून जमा केला होता. त्या कामाची निविदा चारच दिवसाआधी प्रकाशित झाली आहे. लवकरच या पवित्र कार्याला सुरुवात होणार आहे.आवास योजनेचा हप्ता प्रलंबित होता. तो देखील तातडीने प्रदान केला जाईल .निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान नियमित मिळत नसल्याने हे दुर्बल घटक आर्थिक हाल अपेष्टा सोसत आहे. हे अनुदान नियमित मिळण्याची व्यवस्था तातडीने करण्यात येईल असेही श्री मुनगंटीवार म्हणाले.
विश्वगौरव पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतुन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. उद्या १३ ऑगस्ट ला सकाळी ९ वा आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवायचा आहे. हजारो लाखो शाहीदांच्या बलीदानातुन हा तिरंगा ध्वज आपल्याला लाभला आहे.हा केवळ कापडाचा चौकोनी तुकडा नसून आमचा स्वाभिमान आहे.या ध्वजात आम्ही महात्मा गांधी , हुतात्मा भगतसिंह, सुखदेव, राजगुरु, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सह असंख्य शुरवीरांना बघतो. या तिरंग्याचा सन्मान करण्यासाठी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वागतार्थ जाम पुढील नंदोरी पासुन चंद्रपुर महानगरातील प्रत्येक चौकात जागोजागी भव्य स्वागत करण्यात आले. मुख्य मार्गाने भव्य रैली काढण्यात आली. त्यांच्या स्वागतार्थ सम्पूर्ण चंद्रपुर शहर सजले होते. रैली दरम्यान त्यांनी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या पुतळयाला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले . त्यानंतर गांधी चौकात जाहिर सभेला त्यांनी संबोधित केले.
यावेळी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री हंसराज अहीर, भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाड़े, राजेन्द्र गांधी, राखी कंचरलावर, राहुल पावड़े, संदीप आवारी, अंजली घोटेकर, विशाल निम्बाळकर, रामपाल सिंह, सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती. शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाड़े, श्री भास्करवार, श्री कुंभे आदी अधिकाऱ्यांनी श्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत केले.
Cancer hospital to be inaugurated on January 26: Minister Sudhir Mungantiwar announced.