चंद्रपुर जिल्हा परिषद तर्फे 16 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान, या शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले Chandrapur Zilla Parishad awarded District Teacher Award to 16 teachers These teachers were honored with district teacher awards

चंद्रपुर जिल्हा परिषद तर्फे 16 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान

या शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले
 
चंद्रपूर, दि. 5 सप्टेंबर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेतर्फे 15 प्राथमिक तर एक माध्यमिक अशा एकूण 16 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मा.सा. कन्नमवार सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर तर प्रमख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, कपिलनाथ कलोडे (पंचायत), राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त ना.ग. थूटे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे, डायटचे प्राचार्य श्री. चाफले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. मातकर, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हिरुडकर, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता रायपुरे, उपमुख्य लेखा अधिकारी श्री. पेंदाम, विश्वजीत शहा, विलास वनकर, अमोर रोडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आमदार श्री. जोरगेवार म्हणाले, गावातील सर्वात विश्वसनीय व्यक्तिमत्व म्हणून शिक्षकाकडे पाहिले जाते. शिक्षक चांगला तर तो समाज चांगला असे समीकरणच आहे. कोणताही पाल्य हा पालकांसोबत कमी तर शिक्षकांसोबत जास्त वेळ असतो. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे. शिक्षकांना ज्ञानार्जनाव्यतिरिक्त शासनाची जवळपास 150 कामे अधीकची करावी लागतात. ही अतिशयोक्ती आहे. शैक्षणिक बाबतीत चंद्रपूर जिल्हा हा राज्यात अव्वल ठेवण्यासाठी शिक्षकांनी तसेच अधिका-यांनी प्रयत्न करावे. तसेच संस्कारी विद्यार्थी शिक्षकांच्या हातून घडावे, असे त्यांनी सांगितले.

श्रीमती गौरकार म्हणाल्या, जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे जवळपास पाच हजार शिक्षक आहेत. प्रत्येक शिक्षकाने दरवर्षी किमान एक विद्यार्थी घडविला तरी जिल्ह्यात पाच हजार विद्यार्थी दरवर्षी  घडू शकतात. ग्रामीण भागातील शिक्षकांची पालक म्हणूनही जबाबदारी असते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी सुरू केलेल्या मिशन गरुडझेपमध्ये सर्व शिक्षकांचे चांगले सहकार्य मिळत आहे, असे त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकातून शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे म्हणाले, जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हाभरातून 31 अर्ज प्राप्त झाले. शासन निर्णयानुसार एका तालुक्यातून एक असे एकूण 15 प्राथमिक तर माध्यमिक विभागातून 1 अशा एकूण 16 शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. शासन निर्णयात असलेल्या निकषांची अतिशय काटेकोरपणे तपासणी करून जिल्हा शिक्षक पुरस्कार निवड समितीद्वारे 16 नावे निश्चित केली गेली. तसेच या यादीला विभागीय आयुक्तांची मान्यता मिळाली, असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्याम वाखर्डे, प्राचार्य चाफले यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त 16 शिक्षकांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन कुटुंबासह सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. यावेळी जि.प. ज्युबली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन एकता पितुरकर यांनी केले. कार्यक्रमाला सर्व गटशिक्षणाधिकारी, विविध अधिकारी उपस्थित होते.

■ चंद्रपुर जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षक:
संजय कान्हुजी (सोनेगाव वन, ता. चिमूर), राहुल कळंबे (कोटगाव, ता.नागभिड), विनोद लांडगे (पेंढरी (कोके) ता. सिंदेवाही), वामन चौधरी (साखरी, ता.सावली), काकासाहेब नागरे (वडगाव, ता.कोरपना), मेघा शेंडे (देऊळवाडा, ता.भद्रावती), प्रितिबाला जगताप (बामणी (दु.) ता.बल्लारपूर), करुणा गावंडे (आर्वी, ता.राजुरा), नामदेव अस्वले (चिंचाळा, ता.चंद्रपूर), सुशीला पुरेड्डीवार (आक्सापूर, ता.गोंडपिपरी), सुचिता जिरकुंटवार (चेकखापरी, ता.पोंभूर्णा), उमाजी कोडापे (पल्लेझरी, ता.जिवती), दिलीप बावनकर (एकारा, ता.ब्रह्मपुरी), सुंदर मंगर (कवडपेठ, ता.मुल), संजू जांभुळे (खेमजई, ता.वरोरा) व विनोद कोवे (गुंजेवाही, ता.सिंदेवाही) या शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

Chandrapur Zilla Parishad awarded District Teacher Award to 16 teachers

These teachers were honored with district teacher awards.