Ø भाविकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 7 सप्टेंबर : गणपतीचे विसर्जन दोन दिवसांवर आले आहे. या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी शहरातील विसर्जन स्थळाची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, तहसीलदार नीलेश गौंड, मनपा उपायुक्त अशोक गराटे, वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील आदी उपस्थित होते.
शहरातून निघणा-या मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी करून जिल्हाधिका-यांनी दाताळा रोड येथील इरई नदी काठावरील विसर्जन स्थळाची पाहणी केली. मुर्तीचे विसर्जन करतांना एकाच वेळी गर्दी होऊ देऊ नका, त्यासाठी योग्य नियोजन करावे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील याची काळजी घ्यावी. नागरिकांनी घरगुती छोट्या गणपतीचे विसर्जन मनपातर्फे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात करावे. इरई नदीच्या पाण्याचा प्रवाह असल्यामुळे कुणीही नदीच्या पात्रात उतरू नये. सणांचे महत्व कायम राखून भाविकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तत्पूर्वी जिल्हाधिका-यांनी जेटपुरा गेट, गिरनार चौक, गांधी चौक येथे वाहतूक व्यवस्था कशी राहील, याची माहिती जाणून घेतली.
District Collector inspects Ganpati immersion sites in Chandrapur City, appeals to devotees to cooperate with administration