माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करणा-यांची तक्रार करा- माहिती आयुक्त राहुल पांडे, सुनावणी दरम्यान चंद्रपुरातील 15 प्रकरणे निकाली Report abusers of RTI Act - Information Commissioner Rahul Pandey, 15 cases in Chandrapur disposed of during hearing

▪️माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करणा-यांची तक्रार करा- माहिती आयुक्त राहुल पांडे

▪️सुनावणीदरम्यान चंद्रपुरातील 15 प्रकरणे निकाली

चंद्रपूर, दि. 10 ऑक्टोबर : माहितीचा अधिकार कायदा हा प्रशासनाच्या उत्तरदायित्वासाठी आहे. कोणाच्या  उदरनिर्वाहाचे ते साधन होऊ शकत नाही. या कायद्याचा दुरुपयोग करून खंडणी वसूल करणे किंवा यंत्रणेस ब्लॅकमेलिंक करणे, असे प्रकार घडत असेल तर संबंधित व्यक्तिची तक्रार करा. प्रसंगी अशा लोकांवर गुन्हे दाखल करा, अशा सुचना राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी दिल्या. 

नियोजन सभागृह येथे सुनावणी घेतल्यानंतर विभाग प्रमुखांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम आदी उपस्थित होते.
शासन आणि प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता असावी, या उद्देशाने  माहिती अधिकार कायदा अंमलात आला आहे, असे सांगून आयुक्त श्री. पांडे म्हणाले, प्रशासनाच्या मदतीशिवाय हा कायदा यशस्वीरित्या राबविता येणार नाही. मात्र अलीकडच्या काळात विनाकारण त्रास देण्याच्या उद्देशाने अर्ज करणा-यांची संख्या वाढली असल्याचे निदर्शनास येते. माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून त्रास देणा-याची तक्रार करा. संबंधित यंत्रणा याची दखल घेत नसेल तर थेट आयोगाकडे तक्रार करू शकता.
चंद्रपूर जिल्ह्यातून आयोगाकडे येणा-या तक्रारी फार कमी आहे. याचाच अर्थ असा आहे की, स्थानिक स्तरावर प्रथम अपील, द्वितीय अपील याबाबत संबंधित यंत्रणेकडून सकारात्मक प्रतिसाद दिला जातो. ही जिल्हा प्रशासनाची कौतुकास्पद बाब आहे. नागपूर विभागात आयोगाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या 4788 असून यात चंद्रपूरातील 607 प्रकरणांचा समावेश आहे. यातील 2022 मधील 317 प्रकरणे आहेत. संबंधित विभागाच्या जनमाहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी यांनी नियमित आढावा घेतल्यास 607 प्रकरणे निकाली निघण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे माहिती अधिकार अर्जाच्या ‘झिरो पेंडन्सी’ची सुरवात चंद्रपुरातून होऊ शकते. 
माहिती अधिकारांतर्गत आलेल्या अर्जावर वेळेत माहिती देणे, ही संबंधित अधिका-याची जबाबदारी आहे. माहिती देतांना कायदा, कलम, उपकलम आदींचा समावेश करा. विहित मुदतीत माहिती न देणे, दिशाभुल करणारी किंवा अपूर्ण, असत्य माहिती देणे, अर्जच न स्वीकरणे या गोष्टी टाळाव्यात. विशेष म्हणजे आपल्या कार्यालयात आलेल्या माहिती अधिकार अर्जाबाबत कार्यालय प्रमुखांनी संबंधित क्लर्ककडून वारंवार आढावा घ्या, अशा सुचना श्री. पांडे यांनी केल्या. 

➡️ माहिती आयुक्तांनी घेतली चंद्रपूरात सुनावणी : महाराष्ट्र राज्य माहिती आयोग, नागपूर खंडपीठाकडे दाखल झालेल्या 15 प्रकरणांची माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी चंद्रपूरात येऊन सुनावणी घेतली. यात माहिती अधिकारासंदर्भातील सर्व 15 प्रकरणे निकाली काढण्यात आली. 
सुनावणी घेण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये इश्वर रागीट (रा. पेठ वॉर्ड, ता. राजुरा), सचिन पिपरे (रा. विरुर (स्टे) ता. राजुरा), प्रवीण ताकसांडे (रा. विरुर (स्टे) ता. राजुरा), वासुदेव खोब्रागडे (रा. मेंढा ता. नागभीड) यांची दोन प्रकरणे, बंडू बुरांडे (रा. प्रभाग क्रमांक 17, ता. पोंभुर्णा), संतोष कामडी (मु.पो. मोटेगाव, ता. चिमूर), दीपक दीक्षित (रा. सिव्हील लाईन, चंद्रपूर), सारंग दाभेकर (रा. टिळक वॉर्ड, ता. चिमूर), आर. के. हजारे (रा. समाधी वॉर्ड, ता. चंद्रपूर) यांची दोन प्रकरणे, राजकुमार गेडाम (रा. वडाळा (पैकू), ता. चिमूर) यांची दोन प्रकरणे, किशोर डुकरे (रा. आसाळा, पो. भटाळा, ता. वरोरा) आणि अरुण माद्देशवार (रा. गुंजेवाही, ता. सिंदेवाही) यांचा समावेश होता.

Report abusers of RTI Act - Information Commissioner Rahul Pandey, 

15 cases in Chandrapur disposed of during hearing