आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे -जिल्हाधिकारी विनय गौडा Model code of conduct should be strictly followed by all - Chandrapur District Magistrate Vinay Gowda


आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे -जिल्हाधिकारी विनय गौडा

जिल्हाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती

चंद्रपूर, दि. 30 :भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघ नाशिक व अमरावती विभाग आणि शिक्षक मतदार संघ औरंगाबाद, नागपूर व कोकण विभागामध्ये द्विवार्षिक निवडणुका घेण्याचे घोषित केले आहे. 
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शिक्षक मतदार संघ नागपूर विभागामध्ये तात्काळ प्रभावाने निवडणूक आचारसंहिता दि. 29 डिसेंबर 2022 पासून लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले.

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ, महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक कार्यक्रम व आचारसंहिता अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात राजकीय पक्षासोबत सभा व पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) पल्लवी घाडगे, नायब तहसीलदार श्री. गभने, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, तसेच सर्व पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ, महाराष्ट्र विधान परिषदेचे सध्याचे आमदार नागो पुंडलिक गाणार असून त्यांचा निवृत्ती दि. 7 फेब्रुवारी 2023 आहे, त्या अनुषंगाने निवडणुकीसाठी नामनिर्देशन स्वीकारण्याचा दि. 5 जानेवारी ते 12 जानेवारी 2023 पर्यंत राहील. छाननी दि. 13 जानेवारी रोजी तर नामनिर्देशन माघार घेण्याचा अंतिम दि. 16 जानेवारी 2023 रोजी राहील. मतदानाचा दि. 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच्या कालावधीत राहील तर मतमोजणी 2 फेब्रुवारी 2023 रोजी होईल.

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर हे राहतील. तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी चंद्रपूर असतील. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातील मागील 2017 मधील एकूण मतदार संख्या ही 5,638 तर सन 2022 मध्ये नोंदणी झालेल्या एकूण मतदाराची संख्या 7,460 आहेत. त्यापैकी पुरुष मतदार 4,854 तर स्त्री मतदार 2,606 आहेत. मागील मतदाराच्या संख्येत एकूण 1822 ने वाढ झाली आहे. एकूण मतदान केंद्र संख्या 27 असून मतदान केंद्र क्रमांक 80 ते 106 असेल. आदर्श आचारसंहिता दि. 29 डिसेंबर 2022 पासून लागू करण्यात आली असून त्याचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी कळविले आहे.

Model code of conduct should be strictly followed by all - Chandrapur District Magistrate Vinay Gowda