#Loktantrakiawaaz
चंद्रपूर : नागपूर शिक्षक मतदार संघाच्या (Nagpur Teachers Constituency) निवडणुकीत सुधाकर आडबाले (Sudhakar Adbale) हे विजयी झाले. त्यांनी विद्यमान आमदार नागो गाणार (Nago Ganar) यांना पराभूत केले. सुधाकर आडबाले यांना महाविकास आघाडीने आपला उमेदवार म्हणून घोषित केले होते. आडबाले यांच्या विजयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. नागपूर विभागातील उमेदवार नागो यांच्यापेक्षा सुधाकर आडबाले यांनी दुप्पट मतं घेतली. जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी सुधाकर आडबाले यांनी लढा उभारला होता. सुधाकर आडबाले यांना १४ हजार ६१ मतं मिळाली, तर नागो गाणार यांना ६ हजार ३०९ मतं मिळाली.
महाविकास आघाडी आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी खूप उशीर लावला होता. आडबाले आधीपासूनच सर्व तयारी करून होते. त्याचा अंदाज घेऊनच काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने त्यांना अखेरच्या क्षणी पाठिंबा जाहीर केला.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची गेल्या अनेक वर्षांची तयारी, जुनी पेन्शनचा भावनिक विषय आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा याशिवाय गाणारांबद्दलची अँटी इन्कमबन्सी हे आडबाले यांच्या विजयात महत्वाचे मुद्दे ठरले.
नागो गाणार हे गेली दोन टर्म नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातून आमदार होते. ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खास विश्वासू मानले जातात. एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख असली तरी त्यांच्यात शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक आक्रमकता नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवला जातो. याचा फटका नागो गाणार यांना बसला.
सुधाकर आडबाले हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते आहेत. ते मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातले आहेत. गणिताचे शिक्षक असलेले आडबाले सुरुवातीपासूनच काँग्रेस विचाराच्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाशी जुळलेले आहेत.
Sudhakar Adbale of Chandrapur who defeated Nago Ganar of Nagpur by double the votes