संपर्क तुटणा-या चार गावात धान्यसाठा उपलब्ध
चंद्रपूर, दि. 18 : चंद्रपूर जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पूराचा इतिहास आहे. जिल्ह्यातून वैनगंगा, वर्धा, पैनगंगा, ईरई, झटपट, उमा व अंधारी या नद्या वाहतात. वर्धा नदीच्या पुरामुळे वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा तालुक्यातील नदी काठावरील गावे बाधित होतात. वैनगंगा नदीच्या पुरामुळे ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली व गोंडपिपरी तालुक्यातील गावे, उमा आणि अंधारी नदीच्या पुरामुळे चिमूर व मुल तालुक्यातील गावे, तसेच इरई व झटपट नदीच्या पुरामुळे चंद्रपूर शहरातील काही भाग व नदी काठावरील गावे बाधित होतात. नद्यांच्या पुरामुळे जिल्ह्यातील 86 गावे पूरप्रवण क्षेत्रात येत असली तरी संपर्क तुटणा-या गावांची संख्या जिल्ह्यात चार आहे. या चारही गावात चार महिने पुरेल ऐवढे धान्य जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिले आहे.
▪️संपर्क तुटणारी गावे : राजुरा तालुक्यातील कोलगाव येथे शिधापत्रिकाधारकांची संख्या 186 असून या गावासाठी 58.72 क्विंटल गहू आणि 93.28 क्विंटल तांदूळ पोहचविण्यात आला आहे. पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथे शिधापत्रिकाधारकांची संख्या 336 असून या गावासाठी 111.28 क्विंटल गहू आणि 224.12 क्विंटल तांदूळ, ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज येथे शिधापत्रिकाधारकांची संख्या 410 असून या गावासाठी 104.24 क्विंटल गहू आणि 187.16 क्विंटल तांदूळ तर मूल तालुक्यातील कोरंबी येथे शिधापत्रिकाधारकांची संख्या 126 असून या गावासाठी 23.10 क्विंटल गहू आणि 33.60 क्विंटल तांदूळ चार महिन्याकरीता उपलब्ध करून देण्यात आला आहे.
▪️चंद्रपूर जिल्ह्याचा पूरप्रवण इतिहास : चंद्रपुर जिल्ह्यात वर्ष 2005 व 2006 मध्ये अतिवृष्टी तसेच धरणाचे पाणी विसर्गामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. चंद्रपुर जिल्ह्यात वर्ष 2013 मध्ये 16 ते 26 जुलै व 1 ते 2 ऑगस्ट या कालावधीमध्ये अतिवृष्टी व धरणाच्या पाणी विसर्गामुळे तीनवेळा पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सदर पूर परिस्थितीमध्ये चंद्रपूर शहरातील तीन हजार नागरिकांना बोटीद्वारे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. तसेच जिल्ह्यात 29 व 30 ऑगस्ट 2020 रोजी वैनगंगा नदीच्या धरणक्षेत्रात झालेली अतिवृष्टी आणि धरणाचे पाणी विसर्गामुळे व 2022 मध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यात वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे वरोरा, भद्रावती व चंद्रपूर तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.
▪️नद्यांना येणारे पूर व बाधित होणारी गावे : नद्यांना येणारे पूर व बाधित होणारी एकूण 86 पूरप्रवण गावे निश्चित करण्यात आली असून यामध्ये चंद्रपूर तालुक्यातील इरई व झटपट नदीमुळे चंद्रपूर शहरातील 17 वार्ड व 13 गावे. वर्धा नदीमुळे बल्लारपूर तालुक्यातील बल्लारपूर शहर आणि 7 गावे, वैनगंगा नदीमुळे पोंभुर्णा तालुक्यातील 2 गावे बाधित होतात. वैनगंगा नदीमुळे गोंडपिपरी तालुक्यातील 6 गावे, वर्धा नदीमुळे वरोरा तालुक्यातील 10 गावे, वर्धा व इरई नदीमुळे भद्रावती तालुक्यातील 9 गावे, वैनगंगा नदीमुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील 13 गावे, सिंदेवाही तालुक्यातील 2 गावे, वर्धा नदीमुळे राजुरा तालुक्यातील राजुरा शहर आणि 4 गावे, तसेच पैनगंगा नदीमुळे कोरपना तालुक्यातील 17 गावे बाधित होतात.
▪️चंद्रपुर जिल्ह्यात उपलब्ध असलेले शोध व बचाव साहित्य : रोप आणि रेस्क्यू किट 1, बॉब रोप 12 एमएम 500 मिटर, एचडीपीई बोट विथ ओबीएम 3, (1 बोट पोलीस हेडकॉटर, 1 बोट ब्रह्मपुरी तहसील ऑफिस व 1 बोट जिल्हाधिकारी कार्यालय), एफआरपी बोट 1, रबर बोट विथ ओबीएम 30 एचपी- 7, लाईफ जॅकेट 64, लाईफ बॉय 26, फ्लोटिंग स्ट्रेचर 1, ॲल्युमिनियम लॅडर 5, रेस्क्यू चेन सॉ लाईट वेट 1, टेन्ट कॅनवास 2, इमर्जन्सी ब्रेसलेट 4, गमबूट 6, सेफ्टी हेल्मेट 18, बिनॉक्युलर स्टॅंडर्ड 2, हॅमर 9, एक्स इम्पोर्टेड 2, पोर्टेबल स्टोरेज टॅंक 5000 लीटर, सेफ्टीनेट 4, मॅन्युअल सायरन 1, रेनकोट 8, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट फॉर रेस्क्यू वर्कर 20, बॅरिकेट टेप 10 बंडल, हेवीड्युटी ग्लोज 30, हेड लाईट टॉर्च (हेडलॅम्प) 10 नग, मेगा फोन 11, ब्रीथिंग अपार्टस सेट 1, इमर्जन्सी लाईटनिंग पोर्टेबल टॉवर सिस्टीम 9 या प्रमाणात शोध व बचाव साहित्य उपलब्ध आहे.
महत्वाच्या यंत्रणांनी करावयाची कामे व जबाबदारीचे वाटप
▪️तालुका प्रशासन : मान्सून कालावधीत नियंत्रण कक्षाचे कामकाज दिवस-रात्र चालू राहील याकडे लक्ष देण्याच्या सुचना सर्व कार्यान्वयीन यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक तसेच नियंत्रण कक्षात कार्यरत असणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे नाव व दूरध्वनी क्रमांक जिल्हा नियंत्रण कक्षाला देणे, नियंत्रण कक्षातील संगणक, प्रिंटर, झेरॉक्स मशीन, फॅक्स व इतर उपकरणे तसेच शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करणे, पूरग्रस्त गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार, तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांच्या दूरध्वनी क्रमांकाची अद्ययावत यादी जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्षाला उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
तालुकानिहाय साहित्यांचा आढावा घेण्यात यावा. उपलब्ध साहित्यांची तपासणी करुन योग्य दुरुस्त्या करणे, पुरप्रवण भागात सदर साहित्य, आपत्ती उद्भवण्याची शक्यता असलेल्या भागात तैनात ठेवणे, पाण्याखाली जाणा-या पुलाच्या दोन्ही बाजूला पुराच्या वेळी वाहतूक होणार नाही तसेच या पुलावर साईन बोर्ड, बॅरीकेटींग लावण्यात यावे. पूरप्रवण गावातील पुराच्या वेळी नागरिकांना सुरक्षित ठेवण्याकरीता गावातील शाळा, समाज मंदिर, आश्रयस्थान निश्चित करून याबाबतची जबाबदारीकरीता कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.
▪️महानगर पालिका व नगर पालिका / पंचायत प्रशासन : पालिकेच्या हद्दीतील सर्व जुन्या इमारतींचे/ वाड्यांची बांधकाम तपासणी पावसाळ्यापूर्वी करून घ्यावी. तसेच घरे पडल्यास जेसीबी व शोध बचाव साहित्य उपलब्ध ठेवावे, अशाही सुचना देण्यात आल्या आहेत. पूरप्रवण भागातील नैसर्गिक जलाशयाची साफसफाई करणे आणि गरज असल्यास त्यांचे बळकटीकरण करणे. तसेच नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या मुख्याधिका-यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गटारे तात्काळ साफ करण्याबाबत कार्यवाही करावी. धोकादायक ठिकाणी संबंधित विभागाशी समन्वय करून( पोलीस/ सार्वजनिक बांधकाम विभाग/ वन विभाग/ पुरातत्त्व विभाग) प्रवेश निषेध करावा. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळी व मार्गावर याबाबत बोर्ड लावावेत.
▪️पाटबंधारे विभाग : पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील तलावांची तपासणी करावी व सर्व्हे करून फुटलेल्या तलावाची दुरुस्ती तात्काळ करण्यासंदर्भात कार्यवाही करावी. पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे गावाचे नुकसान टाळण्यासाठी लाल व निळी पूररेषा निश्चित करण्यासंदर्भात कार्यवाही करावी. धरण सुरक्षिततेसंबंधी धरणाचे गेट ऑपरेशनकरीता धरणाच्या स्थळी डीजल, पेट्रोलसाठी तसेच जनरेटर सुस्थितीत आहे किंवा नाही, याबाबत विभागाच्या संबंधित अभियंत्याने खात्री करावी.
▪️जिल्हा क्रीडा अधिकारी : क्रीडा विभागाने बचाव साहित्य, यांत्रिकी बोट, लाईफजॉकेट, जलतरणामध्ये तरबेज असलेली टीम, टॉर्च आदी साहित्याची तपासणी करावी. जिल्हा मुख्यालयातील यांत्रिकी बोट व इतर बचाव साहित्याची तपासणी करून साहित्य सुस्थितीत असल्याबाबतची खात्री करावी. शोध व बचाव पथक प्रमुख म्हणून जिल्हा नियंत्रण कक्षाशी समन्वय ठेवावा.
▪️महाऔष्णिक विद्युत केंद्र : चंद्रपूर येथील सीटीपीएसच्या व्यवस्थापकांनी इरई धरणातील पाण्याची क्षमता व पुराच्या प्रवाहाबाबत आणि धरणात साठणाऱ्या पाण्याच्या स्त्रोताबाबत माहिती एकत्रित करावी. धरणातील पाण्यासंबंधी सुक्ष्म नियोजन तयार करून धरणाचे किती गेट सोडल्यास पाण्याची किती पातळी वाढू शकते यासंबंधीचा डेटा तयार करावा. इरई धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी जिल्हाधिका-यांची परवानगी घ्यावी. धरणाचे किती गेट उघडण्यात येत आहे. तसेच धरणाचे गेट उघडतेवेळी पाण्याचा किती विसर्ग सोडला आहे, याबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावी.
▪️सा.बा. व जिल्हा परिषद बांधकाम विभाग : सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने संपर्क तुटणाऱ्या पूरग्रस्त गावातील रस्त्यांची माहिती संकलित करावी. कार्यकारी अभियंता सिंचन आणि जिल्हा परिषद बांधकाम यांनीसुद्धा क्षतिग्रस्त रस्त्याचे व तलावाचे काम तात्काळ पूर्ण करावे. कार्यकारी अभियंता सिंचाई/ जिल्हा परिषद बांधकाम यांनी सुद्धा क्षतिग्रस्त रस्त्याचे तलावाचे काम तात्काळ पूर्ण करण्याची कार्यवाही करावी.
▪️आरोग्य विभाग : आरोग्य विभागाने संपर्क तुटणाऱ्या पूरग्रस्त गावामध्ये औषधीचा साठा पुरेशा प्रमाणात ठेवण्याबाबत तसेच गावकऱ्यांना स्वच्छ पाणीपुरवठा होईल या दृष्टीने कार्यवाही करावी. पूरप्रवण गावातील गरोदर स्त्रियांबाबतची माहिती मान्सूनपूर्व कालावधीमध्ये निश्चित करावी. अतिवृष्टीच्या वेळी अथवा गावाचा संपर्क तुटण्यापूर्वी सदर महिलांना जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात स्थानांतरित करावे. जिल्ह्यातील संभाव्य पूरग्रस्त, पावसाळ्यात संपर्क तुटणारी गावे, मागील 3 वर्षात जलजन्य साथरोगाचा उद्रेक झालेली गावे, नदीकाठची गावे, पाणीटंचाईग्रस्त गावे, इत्यादी जोखीमग्रस्त गावांची यादी तयार करावी. जोखीमग्रस्त गावातील, गरोदर मातांची प्रसूतीची संभाव्य तारीख व प्रसूतीचे ठिकाणाची माहिती अद्यावत ठेवावी. पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या व पूरग्रस्त गावातील गरोदर मातांचे सुरक्षित प्रसूती होण्याच्या अनुषंगाने सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत सूचना देण्यात याव्या. पूरनियंत्रण व आपत्ती व्यवस्थापनासाठी आरोग्य विषयक स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. आपत्तीच्या काळामध्ये ॲम्बुलन्स आराखडा तयार करणे, आपत्कालीन ॲम्बुलन्सचा टोल-फ्री क्रमांक सर्व विभागांना देण्यात यावा.
▪️वनविभाग : वनविभागाने आणीबाणीच्या वेळी उपयोगात येणारी, जसे जनावरांना ठेवण्याचे स्टॅन्ड, धारदार उपकरणे, बुलडोझर, कीटकनाशके, ट्रॅक्टर्स, डंपर्स, अर्थमूव्हर्स, एक्सकॅव्हेटर, जनरेटर्स, कटर्स, ट्रि कटर्स, रोप्स, फ्लड लाईट, शॉवेल्स, हॅक्सेस, हॅमर्स आदी उपकरणे, वाहने चालू स्थितीत असल्याची खात्री करावी. हानीप्रवण क्षेत्रात वायरलेस, टेलिफोन, मनुष्यबळ, बीटगार्ड, फॉरेस्टगार्ड आदींना सतर्क ठेवावे. तसेच क्षतीग्रस्त क्षेत्रात प्राधान्याने जळाऊ लाकूड आणि बांबू यांची उपलब्धता करून द्यावी.
▪️पोलिस विभाग : पुलावरून पाणी वाहत असताना वाहतूक होणार नाही तसेच आपत्तीच्या वेळी धरणांमधून पाणी सोडल्यानंतर पुरामध्ये कोणीही जाऊ नये, याकरीता अशा पुलाजवळ आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा. जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यात येऊ नये तसेच मान्सूनच्या काळात सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी पूर्वपरवानगी घेऊनच मुख्यालय सोडावे.
▪️जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी/ जिल्हा कृषी विकास अधिकारी : गारपीट अवकाळी पाऊस झाल्यास पिकांचे, फळपिकांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. कृषी विभागाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात यावा. जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत जनावरांचे पोस्टमार्टम रिपोर्ट तात्काळ सादर करावे तसेच मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही तत्काळ करावी. तसेच इतर विभागांनी दिलेल्या सूचनांनुसार वेळोवेळी कार्यवाही पार पाडावी, अशा सुचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने दिल्या आहेत.
- राजेश येसनकर
जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर
Chandrapur Special Article: Grain storage available in four villages that are not connected to disaster management