अतिरिक्त शिक्षक असताना केलेल्या पदभरतीची चौकशी करा, आमदार सुधाकर अडबाले यांची मंत्री सावे यांच्याकडे अधिवेशनात मागणी Investigate the recruitment of additional teachers, MLA Sudhakar Adbale demands to Minister Save in the session

अतिरिक्त शिक्षक असताना केलेल्या पदभरतीची चौकशी करा

आमदार सुधाकर अडबाले यांची मंत्री सावे यांच्याकडे अधिवेशनात मागणी

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, 25 जुलै :  महाराष्ट्र राज्‍यात इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत ९७७ शाळा आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ३२ शाळा कार्यरत आहेत. या शाळांत मोठ्या प्रमाणावर अतिरिक्‍त शिक्षक असताना विभागातील सहाय्यक आयुक्त चंद्रपूर व प्रादेशिक उपायुक्त नागपूर यांच्या संगनमताने संस्थाचालकांनी अनेक पदभरतीची कार्यवाही केलेली आहे. याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे अधिवेशनात केली.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या नागपूर विभागातील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांच्या संचमान्यता सन २०१८-१९ पासून झालेल्या नाहीत. मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शिक्षक समायोजनाने काम करत असून समायोजन न झालेले अनेक अतिरिक्त शिक्षक/कर्मचारी मूळ आस्थापनेतून वेतन घेत आहेत. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर फार मोठा आर्थिक भार पडत असतांना विभागातील सहाय्यक आयुक्त चंद्रपूर व प्रादेशिक उपायुक्त नागपूर यांच्या संगनमताने संस्थाचालकांनी सन २०२२-२३ मध्ये पदभरतीच्या मान्यता घेऊन पदे भरली. त्यामुळे अतिरिक्त शिक्षक समायोजनापासून वंचित राहिले असून यामध्ये संस्थाचालकांनी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून गैरव्यवहार केल्याचे लक्षात येते. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी व या विभागातील शाळांवर कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेला करण्याचा शासन आदेश असताना सुद्धा वेतन वेळेवर होत नाही. त्‍यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. शासनाकडून निधी आल्‍यानंतर सुद्धा अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे वेतन वेळेवर होत नाही. वेतन अनियमित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कार्यवाही करावी, अशी मागणी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेवर बोलताना आमदार सुधाकर अडबाले यांनी केली.

चंद्रपूरमध्ये अतिरिक्‍त शिक्षक असताना पदभरती झाली असल्‍यास त्‍याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करू व नियमित वेतनासाठी मंत्रालयातून निधी वेळेत पाठवितो. मात्र, जिल्‍हास्‍तरावर पेपर वर्क वेळेवर होत नसेल तर त्‍या अधिकाऱ्यांवर देखील कार्यवाही करू, असे इतर मागास बहुजन कल्‍याण मंत्री अतुल सावे उत्तर देताना म्‍हणाले.

तसेच नागपूर विभागात सहा जिल्हे आहेत. सहा जिल्ह्यापैकी चंद्रपूर व गडचिरोली येथे सहाय्यक आयुक्‍त व प्रादेशिक उपायुक्‍त नागपूर येथे पद रिक्‍त आहेत. ही पदे कधी भरणार अशी आमदार सुधाकर अडबाले यांनी मागणी केली. त्‍यावर ही पदे लवकरच भरू, अशी माहिती मंत्री सावे यांनी दिली.

Investigate the recruitment of additional teachers, MLA Sudhakar Adbale demands to Minister Save in the session

#Investigate-the-Recruitment-Of-additional-teachers         #Maharashtra               #MLA-Sudhakar-Adbale   #Minister