Ø नागपूर फ्लाईंग क्लबचे विमान मोरवा विमानतळावर दाखल
चंद्रपूर, दि. 6 ऑक्टोबर : नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. याअनुषंगाने नागपूर फ्लाईंग क्लबच्या सेस्ना – 172 आर. या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी सदर विमानाने टेकऑफ, लँडींग व हवाई मार्गात येणा-या अडथळ्यांचे तसेच प्रशिक्षणासाठी इतर आवश्यक बाबींचे निरीक्षण केले.
एखाद्या विद्यार्थ्याला वैमानिक होण्यासाठी 200 तास फ्लाईंग अवर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मोठ्या संख्येने होत असलेल्या विमानांच्या आवागमनामुळे वैमानिक प्रशिक्षणासाठी फ्लाईंग अवर्स पूर्ण होण्यास विलंब होतो. त्यामुळे नागपूर येथील फ्लाईंग क्लबसाठी पर्यायी ऑपरेशनल बेस म्हणून वेगळ्या धावपट्टीची गरज आहे. याबाबत चंद्रपूरातील मोरवा विमानतळाचा पर्याय शोधण्यात आला असून विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक बाबींची मोरवा येथे पूर्तता करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. याच अनुषंगाने आज (दि.6) मोरवा विमानतळ येथे विमानाची प्राथमिक चाचणी करण्यात आली.
सदर विमानाचे वैमानिक कॅप्टन इझिलारसन व त्यांचे दोन सहकारी अभियंते सादत बेग आणि हरीष कश्यप हे विमानानेच नागपूरवरून मोरवा विमानतळावर दाखल झाले. काही वेळ उड्डाण करून निरीक्षण केल्यानंतर सदर विमान नागपूरकडे रवाना झाले.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा नोडल अधिकारी अजय चंद्रपट्टण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता विष्णू ओडपल्लीवार, अमित पावडे आदी उपस्थित होते.
In connection with pilot training, the preliminary test was conducted in Chandrapur, the aircraft of Nagpur Flying Club arrived at Morwa Airport