स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया -पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम, विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सन्मान Let us resolve to awaken the patriots in ourselves -Palak Minister Sudhir Mungantiwar, Chief Government Flag Hoisting Program on the occasion of Republic Day, Honoring those who have done excellent work in various fields

स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया -पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

 प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम

 विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सन्मान

चंद्रपूर, दि. 26 जानेवारी : भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आजपासून सुरू झाले आहे. संविधानाने आपल्याचा जसे अधिकार दिले, तसेच कर्तव्य आणि दायित्वाचीसुध्दा जाणीव करून दिली आहे. या देशासाठी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगलकलश ज्यांनी आपल्या हाती दिला आहे, त्या शहिदांचे स्मरण करून देशाला व लोकशाहीला पुढे नेण्यासाठी स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पोलिस मुख्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार सुधाकर अडबाले, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम. यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
भयमुक्त, भूकमुक्त, विषमतामुक्त भारत हा भाव संविधानात आहे, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सर्व व्यसनांपासून मुक्त होऊन अमृत कलश हातात घेण्याचा संकल्प करणे, हाच खरा प्रजासत्ताक दिन आहे. आपल्याकडे नुकत्याच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन केले. त्यासाठी जिल्हाधिकारी व संपूर्ण प्रशासन अभिनंदनास पात्र आहे. अयोध्या येथे झालेल्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला चंद्रपूरकरांनी ‘सियावर रामचंद्र की जय’ हा मंत्र लिहून एक आगळावेगळा विश्वविक्रम केला. त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडमध्ये नोंद झाली आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता वाघांच्या संरक्षणासोबतच जटायूचे संवर्धन करण्यात येणार आहे.  
चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असून 1 लक्ष 84 हजार हेक्टरवर धानाची शेती केली जाते. राज्य सरकारने आता धानाचा बोनस वाढवून 20 हजार रुपये हेक्टरप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत 40 हजार रुपये मंजूर केले आहे. ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपयांत भाजीपाला संशोधन केंद्र उभे राहणार आहे. अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेने 15 कोटी रुपये शेतीपयोगी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. सोमनाथ (ता. मूल) येथे कृषी महाविद्यालयासाठी 135 कोटींची मान्यता प्राप्त झाली आहे. येत्या दोन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात 5001 कि.मी. चे बळीराजा समृध्दी मार्ग शेतपाणंद रस्ते पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी मोरवा (ता. चंद्रपूर) येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून त्याचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. केंद्रशासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या 542.05 कोटीच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 
यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र संग्राम सैनिक कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. ध्वजदिन निधी संकलनात चंद्रपूर जिल्ह्याने (172 टक्के) उत्कृष्ट कार्य केल्यामुळे यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांचा तसेच रमाई आवास योजनेंतर्गत 100 टक्के घरकूल पूर्ण केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष सन्मान केला. तत्पुर्वी कार्यक्रमाच्या सुरवातीला तंबाखु मुक्त शपथ देण्यात आली. 
विविध मिशनच्या माध्यमातून जिल्ह्याचा कायापालट: ‘मिशन फिट’ अंतर्गत जिल्ह्यात आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देण्यात आली आहे. 140 खाटांचे कॅन्सर हॉस्पीटल तसेच बल्लारपूर येथे कामगारांसाठी 100 खाटांचे ई.एस.आय.सी. हॉस्पीटल उभे राहात आहे. ‘मिशन स्वावलंबन’ अंतर्गत पी.एम. विश्वकर्मा योजना, कौशल्य विकासासाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे. तसेच एम.आय.डी.सी.च्या धर्तीवर आता एफ. आय.डी.सी. ची निर्मिती होणार असून 48 कोटी रुपये मंजूर झाले आहे. ‘मिशन कल्पवृक्ष’ अंतर्गत बांबु पॅलेटचा उपयोग करण्यासाठी वनशेती, बांबु शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. 
जिल्ह्यात विकासाची 225 कामे: चंद्रपूर जिल्ह्यात अपूर्ण राहिलेल्या पायाभुत सुविधांचा विकास वेगाने पूर्ण करून आरोग्य संस्थांचे बळकटीकरण, शिक्षण, सिंचन, जैव विविधता उद्यान, दळणवळणाची उपलब्धता आदींची कामे त्वरीत पूर्ण करण्यात येत आहे. तसेच सैनिकी शाळा, वन अकादमी, देखनी बसस्थानके, अनेक ठिकाणी ई- लायबरी,  बॉटनिकल गार्डन, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, नियोजन भवन, कोषागार भवन, अभ्यासिका,  वसतीगृहे,  प्राथमिक आरोग्य केंद्र,  जिल्हा क्रीडा संकुल,  वन विभागाची आकर्षक विश्रामगृहे,  इको पार्क,  मेडिकल कॉलेज,  कॅन्सर हॉस्पिटल,  प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील काँक्रीट रोड असे जवळपास 225 कामे सुरू आहेत. यापैकी काही पूर्ण झाली असून काही प्रगतीपथावर आहे. 
महानाट्य व महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाची नव्या पिढीला जाणीव करून देण्यासाठी चंद्रपूर येथे 2, 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी ‘जाणता राजा’ हे महानाट्य आणि 17, 18 व 19 फेब्रुवारी रोजी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. 
पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित मान्यवर : विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आश्विनी लोनगाडगे, विष्णुवर्धन येरनी, राहुल पोहाणे, सुहास बनकर, 67 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा व्हॉलीबॉल स्पर्धेतील सखी दोरखंडे, सई घिवे, कौशल्य, रोजगार व नाविण्यता विभागातर्फे विवेक अटलकर, अमियो दास, प्रिती पर्वे, सुरज गौरकार, प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस महासंचालकांचे विशेष सेवापदक पोलिस उपअधिक्षक राधिका फडके, पोलिस निरीक्षक सर्वश्री राजेश मुळे, शिवाजी कदम, प्रवीणकुमार पाटील, महेश कोंडावार, भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे, पोक्सो कायद्याची प्रभावी जनजागृती केल्याबद्दल दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तसेच विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, उत्कृष्ट आशा स्वयंसेविका म्हणून ममता भिमटे, यशोदा राठोड, संदेश मामीडवार आदींचा समावेश होता. 
Let us resolve to awaken the patriots in ourselves -Palak Minister Sudhir Mungantiwar, Chief Government Flag Hoisting Program on the occasion of Republic Day, Honoring those who have done excellent work in various fields

#Minister #Sudhir-Mungantiwar #Government #Flag-Hoisting-Program  #Republic-Day #Honoring-those-who-have-done-excellent-work-in-various-fields #Chandrapur