चंद्रपूर दि. 31 मार्च : चंद्रपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 करीता जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून आगामी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘बुथ लेव्हल मॅनेजमेंट’ चे नियोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.
नियोजन सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते.
2019 च्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण 64.84 टक्के मतदान झाले होते, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, चंद्रपूर शहरात मतदानाची टक्केवारी कमी होती. शहरातील काही मतदान केंद्रावर तर 50 टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झाले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर प्रशासनाचा भर आहे. ज्या मतदान केंद्रावर 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले, अशा भागात विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच ‘बुथ लेव्हल मॅनेजमेंट’ अंतर्गत मतदारांना केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यात उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून मंडप उभारणे, जेणेकरून मतदारांना सावली मिळेल, पिण्याचे पाणी, प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे.
तसेच 85 वर्षांवरील मतदार, गर्भवती माता, स्तनदा माता यांना मतदानासाठी प्राधान्य देण्यात येईल. या मतदारांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. यासोबतच चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व्यवस्थापित मतदान केंद्र, महिला व्यवस्थापित मतदान केंद्र, युवा मतदान केंद्र, आणि आदर्श मतदान केंद्राचे नियोजन करण्यात येणार आहे. निवडणूक संदर्भात काही संशयास्पद बातमी किंवा व्हीडीओ क्लिप आढळली तर त्याची खात्री करावी व प्रशासनाशी संपर्क करावा. चुकीची बातमी आपल्याकडून जाणार नाही, याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी. निवडणुकीसंदर्भात सर्व परवानग्या मिळण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच विधानसभा मतदारसंघ स्तरावर ‘एक खिडकी’ कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन परवानगी सुध्दा घेता येणार आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी सांगितले.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक विषयक तपशील : 27 मार्च 2024 अखेर *चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण 18 लक्ष 37 हजार 907 मतदार* असून यापैकी 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री आणि 48 इतर मतदार आहेत. मतदान केंद्रांची एकूण संख्या 2118 आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 18 ते 19 वयोगटातील युवा मतदारांची संख्या 24443 आहे. तसेच 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले मतदार 16442 असून दिव्यांग मतदारांची संख्या 9694 आहे.
19 मार्च 2024 रोजी झालेल्या प्रथमस्तरीय तपासणी अंती 2118 मतदान केंद्रावर 2610 बॅलेट युनीट, 2610 कंट्राल युनीट आणि 2818 व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले आहे.
'Booth Level Management' to increase voting percentage - Collector Vinay Gowda
#Booth-Level-Management #voting-Percentage #Collector-Vinay-Gowda #Chandrapur #Loksabha #Chunav #Election