सीमेवरील पथकांना जिल्हाधिका-यांचे निर्देश
पाटाळा आणि वणी येथील चेकपोस्टला भेट
चंद्रपूर दि. 24 मार्च : संपूर्ण चंद्रपुर जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि नि:पक्षपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबध्द आहे. आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात विविध पथकांचे गठन करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्याच्या सीमेवर तैनात स्थायी निगराणी पथकांनी (एसएसटी) जिल्ह्यात प्रवेश करणा-या वाहनांची कडक तपासणी करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले आहे.
भद्रावती तालुक्यातील पाटाळा आणि वणी मतदारसंघातील सीमेवर असलेल्या चेकपोस्टला जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी भेट दिली. यावेळी वरोराच्या उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम, तहसीलदार योगेश कौटकर (वरोरा), अनिकेत सोनवणे (भद्रावती) आदी उपस्थित होते.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्याच्या सीमेवर स्थायी निगराणी पथक (एसएसटी) तैनात करण्यात आले आहे. पाटाळा (ता. भद्रावती) येथील पथकांची पाहणी करतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यात प्रवेश करणा-या प्रत्येक वाहनांची कडक तपासणी झाली पाहिजे. यात कोणताही निष्काळजीपणा करू नये. चारचाकी वाहनाच्या डीक्कीसह वाहनाच्या सीटजवळील भागसुध्दा तपासावा. यात असणा-या बॅग्ज व इतर बाबींची तपासणी करावी. काही आक्षेपार्ह आढळल्यास त्याबाबत संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी. पूर्णपणे खात्री झाल्यावरच संबंधित वाहनाला प्रवेश द्यावा. तसेच तालुक्यातील वरीष्ठ अधिका-यांनी रात्री – बेरात्री चेकपोस्टवर अकस्मिकपणे भेट द्यावी, असे निर्देश दिले.
यावेळी जिल्हाधिका-यांनी वरोरा – वणी मार्गावरील पाटाळा आणि वणी येथील चेकपोस्टला भेट दिली. किती जणांची टीम लावण्यात आली आहे, प्रत्येक टीममध्ये किती लोकांचा सहभाग असतो, प्रत्येक शिफ्टमध्ये काम करणा-यांच्या वेळापत्रक कसे आहे, आदी बाबींची माहिती जाणून घेतली. तसेच दोन्ही चेकपोस्टवरील अधिकारी व कर्मचा-यांनी ऐकमेकांना मोबाईल क्रमांक देऊन ठेवावे, जेणेकरून एखादे वाहन न थांबता सुसाट गेले आणि संशयास्पद वाटले तर त्याची माहिती लगेच दुस-याला देणे शक्य होईल.
वरोरा येथे स्ट्राँग रुमची पाहणी: तत्पुर्वी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी वरोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या स्ट्राँग रुमची पाहणी करून या परिसराला बॅरिकेटींग करावे, तसेच स्ट्राँग रुम सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस विभागाने विशेष दक्ष राहावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.
असे आहेत प्रत्येक मतदारसंघनिहाय तैनात असलेले एसएसटी पथक: 13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 62 स्थायी निगराणी पथकांचे (एसएसटी) गठन करण्यात आले आहे. यात
राजुरा विधानसभा मतदार संघात 15,
चंद्रपूर – 4,
बल्लारपूर – 6,
वरोरा – 12,
वणी – 13 तर
आर्णी विधानसभा मतदारसंघात 12
पथकांचा समावेश आहे.
याशिवाय गडचिरोली लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या
ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात 8 तर
चिमूर मतदारसंघात 4 एसएसटीचे गठण करण्यात आले आहे.
Strict checking of vehicles entering Chandrapur district, Collector's instructions to border teams, visit to checkposts at Patala and Wani
#Strict-Checking-Of-Vehicles-Entering-Chandrapur-District #Collector's-Instructions #border-teams, visit to checkposts at #Patala #Wani #Loksabha-Chunav #Election