मुल, पोंभुर्णा, बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याचे 18.76 कोटी रुपये मंजूर
शेतकऱ्यांनी मानले ना. मुनगंटीवार यांचे आभार
चंद्रपूर, दि.3 ऑक्टोबर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती संवेदनशील असलेले राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तीन तालुक्यांमधील 14020 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुल, पोंभुर्णा व बल्लारपूर तालुक्यातील या शेतकऱ्यांना पिकविम्याचे उर्वरित 18.76 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगाम 2023 ची उर्वरित रक्कम मिळण्यासाठी श्री. मुनगंटीवार सातत्याने पाठपुरावा करीत होते. राज्यशासनाने अर्थसंकल्पामध्ये पीक विमा योजनेसाठी तरतूद करूनसुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीच्या विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होती. याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन चंद्रपूर येथे दोन बैठका तर मुंबई येथे कृषीमंत्री आणि सचिवांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न निकाली निघाला होता.
त्यानंतर 143.81 कोटी रुपये पिक विमा रकमेचे वाटप झाले. पण 31 हजार 968 शेतकऱ्यांचे 58.94 कोटी रुपये प्रलंबित होते. यात मुल, पोंभुर्णा व बल्लारपूर तालुक्यातील 14020 शेतकऱ्यांचे 18.76 कोटी रुपये देखील प्रलंबित होते. मात्र मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळताच तीन तालुक्यांचा देखील प्रश्न सुटला. सोमवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात आवर्जून चर्चा झाली. मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी हा विषय पुन्हा एकदा लावून धरला.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे मुल तालुक्यातील 3150 शेतकऱ्यांना 5 कोटी 92 लक्ष, पोंभुर्णा तालुक्यातील 5964 शेतकऱ्यांना 8 कोटी 9 लक्ष व बल्लारपूर तालुक्यातील 4906 शेतकऱ्यांना 4 कोटी 75 लक्ष रुपये पिक विम्याचे मिळाले आहे. एकूण तिनही तालुक्यांतील 14020 शेतकऱ्यांना 18.76 कोटी रुपये मंजूर झाले.
पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.
Relief to 14020 farmers of three talukas due to Guardian Minister Sudhir Mungantiwar, Rs 18.76 crore crop insurance sanctioned to farmers in Mul, Pombhurna, Ballarpur talukas, farmers did not accept it. Thanks to Mungantiwar
#Farmer #Sudhir-Mungatiwar
#Chandrapur #Farmer-Mul-Pombhurna-Ballarpur