अवैध प्लास्टीकची वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई
चंद्रपूर १८ ऑक्टोबर - चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास रामाळा तलावाजवळ ४०७ या वाहनाद्वारे अवैध प्लास्टीकची वाहतुक करणाऱ्या प्रवीण काशिनाथ कांबळे यांच्यावर कारवाई करून ३७४ किलो प्लास्टीक जप्त केले आहे.
आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार प्लास्टीक निर्मुलन कारवाईसाठी ८ पथक तयार करण्यात आले होते. यातील सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणातील पथकास ४०७ या गाडीतुन मोठ्या प्रमाणात प्लास्टीकची वाहतुक केली जात असल्याची गुप्त माहीती मिळाली. माहितीच्या आधारे पाहणी केली असता २२ किलो वजनाचे १७ पोते या गाडीत आढळुन आले. बंदी असलेल्या प्लास्टीकचा साठा केल्याने सदर माल जप्त करण्यात आला असुन साठा मालकास ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.
सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रवींद्र भेलावे व उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, डॉ. अमोल शेळके, राहुल पंचबुद्धे, स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, जगदीश शेंद्रे,मनीष शुक्ला, अनिल खोटे, भरत बिरिया, बंडू चहरे, विक्रम महातव, डोमा विजयकर, अमरदीप साखरकर यांनी केली.
374 kg of plastic seized
Action against vehicle carrying illegal plastic
#plastic seized
#Actionagainstvehicle
#illegalplastic
#cmc
#chandrapurcmc