चंद्रपुर जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाचे नागरिकांना आवाहन
जिल्हा शांतता समितीची बैठक
चंद्रपूर, दि. 18 : आगामी काळात शिवजयंती, महाशिवरात्री, होळी व रमजान ईद असे सर्वधर्मीय 11 सण येत आहे. हे सण जिल्हयात मोठ्या प्रमाणात साजरे होणार असून चंद्रपूर हा जिल्हा शांततेसाठी प्रसिध्द आहे. जिल्ह्याचा हाच लौकिक कायम राखण्यासाठी तसेच सर्वधर्मीय सण शांततेत आणि उत्साहात साजरे करतांना प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी केले.
नियोजन सभागृह येथे पोलिस दलातर्फे आयोजित जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सुधाकर अडबाले, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, सहायक पोलिस अधिक्षक अनिकेत हेरडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश पुंड यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, पोलिस पाटील तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
सण आणि उत्सवासंदर्भात प्रशासनाकडून देण्यात येणा-या सूचनांचे सर्वांनी गांभिर्याने पालन करणे गरजेचे आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सांगून श्री. चौधरी म्हणाले, शहरात तसेच तालुका स्तरावर महसूल, नगर पालिका प्रशासन आाणि पोलिस विभागाच्या अधिका-यांनी मिरवणुक/रॅली, पदयात्रा मार्गाला त्वरीत भेट देऊन पाहणी करावी. मिरावणूका काढतांना वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अग्निशमन, रुग्णवाहिका तसेच दुचाकी-चारचाकी वाहने सुरळीत वाहतूक करू शकतील, याची दक्षता घ्यावी. लेजर लाईटवर बंदी आहे, त्यामुळे कुणीही त्याचा वापर करू नये. डीजेचा आवाज मर्यादेतच ठेवावा. राष्ट्रगीत आणि राज्यगीताचा एक ठराविक प्रोटोकॉल आहे, त्यामुळे डीजेवर राष्ट्रगीत व राज्यगीत वाजवू नये. तसेच मंडळांनी फायर ऑडीट करून घ्यावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.
नागरीकांनी सण साजरे करतांना आपली सामाजिक जबाबदारी ठरवावी : अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू
सण, उत्सव साजरे करणे ही आपली संस्कृती आहे. सर्व सण मिळून साजरे केल्याने सामाजिक सलोखा राखला जातो. त्यामुळे प्रत्येक नागरीकांनी सण साजरे करतांना आपली सामाजीक जबाबदारी ठरवावी, असे प्रतिपादन पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांनी केले. पुढे त्या म्हणाल्या, कोणतीही मिरवणूक काढण्याआधी प्रशासनाकडून रितसर परवानगी घ्यावी, जिल्हयात रॅली, मिरवणूक तसेच बॅनर लावण्यासाठी देण्यात येणारी परवानगी प्रकीया ऑनलाईन करण्यात आलेली आहे, या सूविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा.
मनपा आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले, कोणतेही सण, उत्सव साजरे करतांना शहारात बॅनर लावण्यात येतात. सदर बॅनर लावण्याबाबतची रितसर परवानगी घेणे आवश्यक असून याबाबत 24 तास ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सूविधा देण्यात आली आहे, त्यामुळे मा.उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार मनपा प्रशासन अवैध बॅनर संदर्भात गंभीर असून अवैध बॅनर धारकांवर गेल्या काही दिवसात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांच्या सुचना : यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनी विविध सुचना केल्या. यात सद्या परिक्षांचा काळ सुरु, त्यामुळे डिजेच्या आवाजावर बंधन असावे, सायबर सेलच्या माध्यमातून अफवांवर नियंत्रण ठेवावे. नागरिकांनीही अफवांवर विश्वास ठेवू नये, रस्त्यावरचे गड्डे त्वरीत बुजवावे, शांतता समितीची बैठक चार महिन्यातून एकदा घ्यावी, डीजे चा आवाज मर्यादेत असावा, सर्व सीसीटीव्ही कॅमेरे त्वरीत सुरू करावे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा आदींचा समावेश होता.
Chandrapur district administration and police department appeal to the citizens to follow the rules of the administration while celebrating festivals and celebrations
#Chandrapurdistrictadministrationandpolicedepartmentappealtothecitizens #followtherules
#administration
#celebratingfestivals
#celebrations