मोरवा येथे फ्लाईंग क्लबचे उद्घाटन
चंद्रपूर, दि. 20 फेब्रु. : वैमानिक आणि फ्लाईंग हा माझा आवडीचा विषय आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळामध्ये केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री असताना देशात अनेक ठिकाणी वैमानिक प्रशिक्षण केंद्र उघडले. आज (मोरवा) चंद्रपूर मध्ये वैमानिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. हे प्रशिक्षण केंद्र उत्कृष्टच होईल, अशी अपेक्षा खासदार तथा एरो क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजीव प्रताप रुडी यांनी व्यक्त केली.
मोरवा येथे फ्लाईंग क्लबचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., कॅप्टन ऐजिल, उपविभागीय अधिकारी संजय पवार आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार राजीव प्रताप रुढी म्हणाले, चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लबच्या निर्मितीमध्ये मी योगदान देऊ शकलो, याचा मला आनंद आहे. भारतातील अनेक तरुण-तरुणी वैमानिक प्रशिक्षणासाठी बाहेर जातात. आपल्या जिल्ह्यातच कमीत कमी खर्चात हे प्रशिक्षण मिळावे, हेच आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी येथील आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय दूरदृष्टी ठेवून हा उपक्रम मार्गी लावला. चंद्रपूरचा आदर्श महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा जाईल. भविष्यात येथे पर्यटकांसाठी एअरस्पोर्ट, पॅराग्लायडिंग, हॉट एअर बलून आदी बाबी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. येथील कॅप्टनने सर्व परवानग्या त्वरित पूर्ण कराव्यात. दोन वर्षात हे उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर हे वैमानिकांचे चॅम्पियन केंद्र व्हावे – आमदार सुधीर मुनगंटीवार
जिल्ह्यात एस.एन.डी.टी. विद्यापीठ, वन अकादमी, सैनिक स्कूल, बॉटनिकल गार्डन अशी अनेक विकासकामे करण्यात आली आहे. येथील तरुण-तरुणी वैमानिक व्हावे, यासाठी आम्ही एक स्वप्न पाहिले. ही स्वप्नपूर्ती आज वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनातून पुर्णत्वास येत आहे. या प्रशिक्षण केंद्रात कारपेट, संरक्षण भिंत, हँगर बनवण्यात आले आहे. मोरवा येथील वैमानिक प्रशिक्षण केंद्राला भविष्यात आणखी विमाने देण्याचे राजीव प्रताप रुडी यांनी कबूल केले आहे. त्यामुळे चंद्रपूर हे वैमानिकांचे चॅम्पियन केंद्र होईल, असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची संख्या 50 पर्यंत वाढवावी - आमदार किशोर जोरगेवार
चंद्रपूर येथील फ्लाईंग क्लबसाठी खासदार राजीव प्रताप रुडी यांनी मान्यता दिली, याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. जगात वैमानिकांची मागणी वाढत आहे. चंद्रपूर हे देशाच्या मध्यस्थानी आहे. तसेच हा उद्योगांचा जिल्हा आहे. उद्योगांना चालना मिळण्यासाठी चंद्रपुरात कमर्शियल वैमानिक प्रशिक्षण केंद्रसुद्धा व्हावे. तसेच विद्यार्थी संख्या 10 वरून 50 करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, नागपूर फ्लाईंग क्लबची स्थापना 1947 मध्ये झाली. सहा दशकात अनेक वैमानिक तयार झाले. नागपूर फ्लाईंग क्लबमध्ये विमानांची आवागमन जास्त असल्यामुळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना कमी वेळ मिळतो. त्यामुळे चंद्रपूरमध्ये नागपूर फ्लाईंग क्लबचा अतिरिक्त बेस तयार करण्यात येत आहे. जगात आज वैमानिकांची मागणी वाढली आहे. चंद्रपूर येथून वैमानिक तयार होतील व हे प्रशिक्षण केंद्र एक नवी उंची गाठेल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते 172 आर. या प्रशिक्षण विमानाला हिरवी झेंडी दाखवून उड्डाण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन तहसीलदार विजय पवार यांनी केले.
An excellent pilot training center will be established in Chandrapur - MP Rajeev Pratap Rudy
Inauguration of Flying Club at Morwa
#pilottrainingcenterwillbeestablishedinChandrapur
#MPRajeevPratapRudy
#FlyingClubatMorwa
#FlyingClubChandrapur