निप्पॉनच्या जागेवरील खाजगी कंपनीचे काम पाडले बंद
पुन्हा काम सुरु झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा शेतकऱ्यांचा इशारा
चंद्रपूर : निप्पॉन डेंड्रो प्रकल्पाकरीता संपादित करण्यात आलेल्या भद्रावती तालुक्यातील मौजा विजासन, रुयाड (रिठ), पिपरी (देश.), टोला, चारगांव, लोणार (रिठ), तेलवासा, कुनाडा, चिरादेवी व ढोरवासा या गावातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रशासनासोबत चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे आज, दि. १७ फेब्रुवारी २०२५ ला पोलिस बंदोबस्ताचा वापर करुन खाजगी कंपनीने काम सुरु केले होते. प्रकल्पग्रस्तांमार्फत विरोध होऊ नये, यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाने प्रमुख चार प्रकल्पग्रस्तांना स्थानबद्ध करून ठेवले होते. या घटनेची माहिती शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांना मिळाली असता त्यांनी लगेच पोलिस स्टेशन गाठून स्थानबद्ध केलेल्या प्रकल्पग्रस्तांना बाहेर काढले व घटनास्थळी जावून कंपनीचे काम बंद पाडले.
या घटनेतून प्रशासनाचे दुटप्पी धोरण प्रकल्पग्रस्तांच्या नजरेस आले. परिणामी प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष निर्माण झाला असून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी जिल्हा व तालुका महसूल तथा पोलिस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. सोबतच पुन्हा कंपनीचे काम सुरु झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.
उपअभियंता म.औ.वि.म. उपविभाग, चंद्रपुर यांचे कार्यालय, चंद्रपुर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ चंद्रपुर येथील भद्रावती औद्योगिक क्षेत्र विकसीत करण्यात आले आहे. सदर औद्योगिक क्षेत्राकरिता तालुक्यातील निप्पॉन डेंड्रो प्रकल्पाकरिता २८ वर्षे अगोदर संपादित करण्यात आलेली मौजा विजासन, रूयाळ, पिपरी, चारगाव, लोणार, तेलवासा, ढोरवासा, चिरादेवी, गवराळा येथिल जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ द्वारा संपादीत केले आहे. सदर भुखंड क. बी-०१ क्षेत्र ४३,०००० चौरस मिटर मेसर्स ग्रेटा एनर्जी लिमिटेड भुखंड क. बी-३ क्षेत्र ६३७४८०० चौ.मी मेसर्स न्यु इरा क्लीनटेक सोल्युशन प्रा. लि यांना वाटप करण्यात आली असुन सदर जमीनीचा रक्कमेचा भरणा कंपनीने केलेला आहे.
चारगाव येथील सर्वे न.४६ क्षेत्र ७२.५६ हे.आर, लोनार रिठ येथील सर्वे न. ११० क्षेत्र १७६.५४ हे.आर, ढोरवासा येथील सर्वे न. ९१ क्षेत्र १६३. १६, रूयाड रिठ येथील सर्वे न. ५५ क्षेत्र ११९.७६ हे. आर, विजासन येथील सर्वे न. ५० क्षेत्र ११२.८० हे.आर एकुण सर्वे न. ३५२ क्षेत्र ६४४.८२ हे.आर. तसेच मे. ग्रेटा एनर्जी लि. यांना क्षेत्र ५५.०२ हे.आर ही जमिनीवरील अतीक्रमण काढुन कंपनीच्या ताब्यात देण्याकरिता आज दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ ला पोलीस बंदोबस्तात काम सुरु करण्यात आले. यासाठी पोलिस प्रशासन लाठी व हेल्मेटसह बंदोबस्ताचे तयारीने पोहोचले. प्रकल्पग्रस्तांचा विरोध होऊ नये म्हणून चार प्रकल्पग्रस्त प्रमुख वासुदेव ठाकरे, प्रवीण सातपुते, संदीप खुटेमाटे, आकाश जुनघरे यांना आज सकाळपासूनच स्थानिक पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करुन ठेवले. आमदार सुधाकर अडबाले वेळेवर आले नसते तर प्रशासन व कंपनी डाव साधण्यात यशस्वी झाले असते. परंतु, आमदार अडबाले यांच्या दणक्याने कंपनीला काम बंद करावे लागले.
प्रकल्पग्रस्त एकरी दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान व प्रकल्पग्रस्त तथा प्रकल्पबाधित गावातील बेरोजगार यांना कौशल्यानुसार नोकरी देण्यात यावी, या मागणीसाठी चर्चा व बैठका करीत आहे. मात्र, प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता, मागण्यांची पूर्तता न करता, पोलिस बंदोबस्तात कंपनीचे काम सुरु करण्याची प्रक्रिया जिल्हा व तालुका प्रशासनाची दुटप्पी भूमिका दर्शवित असल्याचे यावेळी प्रकल्पग्रस्तांनी म्हटले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त व गावकरी उपस्थित होते.
दरम्यान आमदार सुधाकर अडबाले यांची कंपनीचे व्यवस्थापक व उपविभागीय अधिकारी यांचेशी चर्चा झाली असता शेतकऱ्यांसह पुढील बैठक व मागण्यांची पूर्तता होईपर्यंत काम सुरु करणार नाही, असे सांगण्यात आले.
Teacher MLA Sudhakar Adbale rushed to help the project victims
The private company's work on Nippon's site was closed
Farmers warn of collective self-immolation if work resumes
#MLASudhakarAdbale
#Nippon's