जिल्हाधिका-यांचा होणार सत्कार
#Loktantra Ki Awaaz
चंद्रपूर, दि. 7 मार्च : चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या उत्कृष्ट कार्याची दखल शासन स्तरावरून घेण्यात येत असून आता चंद्रपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विविध विकास निर्देशांकात चंद्रपूर जिल्ह्याने राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशीलाच्या आधारे पुणे येथील विख्यात ‘गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे’ विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्याने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनात विविध विकास निर्देशांकात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या निर्देशांकाचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असून यावेळी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल हेसुध्दा उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांना गौरविण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे बालकांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या विविध कायद्यांची चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी तसेच बाल संगोपन योजनेसाठी घेतलेला पुढाकार यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांना नुकतेच मुंबई येथे ‘बालस्नेही’ पुरस्काराने सन्मानित करण्यात होते.
या विकास निर्देशांकात चंद्रपूरची आघाडी : कार्यात्मक एफआरयु (प्रथम संदर्भ युनीट्स्) चे प्रमाण (आरोग्य विभाग), गर्भवती महिलांमधील ॲनिमिक महिलांची टक्केवारी (आरोग्य विभाग), सबसिडी वितरणातील साधलेल्या टक्केवारीची प्रगती (कृषी विभाग), लक्ष्याच्या तुलनेत ड्रीप सिंचनासाठी डीबीटीद्वारे निधी प्राप्त करणा-या लाभार्थ्यांची टक्केवारी (कृषी विभाग), स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वार्षिक लेखा अहवालाची वेळेत प्रसिध्दी (चंद्रपूर महानगरपालिका), प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांची टक्केवारी (ग्रामीण विकास), सुधारीत स्वच्छता सुविधा असलेल्या कुटुंबाची टक्केवारी (ग्रामीण विकास), विशाखा तक्रारींची निस्तारणाची टक्केवारी आणि सुधारीत दुर्घटना स्थळांची टक्केवारी व सुधारणा करणे बाकी असलेली स्थळे (परिवहन विभाग) या निर्देशांकात चंद्रपूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.
Chandrapur ranks first in various development indices
Collector will be felicitated
#Chandrapurranksfirstinvariousdevelopmentindices
#CollectorChandrapur
# Collector
#Chandrapur