चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये लाचखोरीचा पर्दाफाश: जल जीवन मिशनच्या कामांबाबत ४.२० लाखांची लाच घेताना कार्यकारी अभियंता सहतीन जण अटकेत Bribery exposed in Chandrapur Zilla Parishad: Executive Engineer and three others arrested while accepting a bribe of Rs 4.20 lakhs for Jal Jeevan Mission works

चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये लाचखोरीचा पर्दाफाश: जल जीवन मिशनच्या कामांबाबत ४.२० लाखांची लाच घेताना कार्यकारी अभियंता सहतीन जण अटकेत

चंद्रपूर: चंद्रपुर जिल्हा परिषद तर्फे जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा कामांच्या बिलांना मंजुरी मिळवून देण्यासाठी तब्बल ४.२० लाख रुपयांची लाच घेताना चंद्रपूर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता सहतीन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे.

अटकेतील आरोपींमध्ये कार्यकारी अभियंता हर्ष यशोराम बोहरे, वरिष्ठ सहायक सुशील मारोती गुंडावार, आणि कंत्राटी परीचर मतीन फारूख शेख यांचा समावेश आहे.

तक्रारदार हे जिवती तालुक्यातील ठेकेदार असून, त्यांनी जल जीवन मिशनअंतर्गत २३ गावांमध्ये पाणीपुरवठा संबंधित कामे केली होती. त्यांनी त्यापैकी १० गावांच्या कामांची बिले सादर केली होती. त्यापैकी ५ गावांची एकूण ४३ लाख रुपयांची बिले मंजूर झाली, परंतु उर्वरित बिलांसाठी हर्ष बोहरे यांनी ४ लाख रुपयांची आणि सुशील गुंडावार यांनी २० हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने लाच न देता ACB कार्यालयात तक्रार दाखल केली. पडताळणी दरम्यान आरोपींनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यावर १० एप्रिल २०२५ रोजी सापळा रचण्यात आला. यावेळी गुंडावार यांनी स्वतः ४.२० लाख रुपये स्वीकारले, त्यातील २० हजार स्वतःसाठी घेतले आणि उर्वरित ४ लाख रुपये मतीन शेख यांच्यामार्फत हर्ष बोहरे यांना पोहोचवले.

ACB ने तिघांनाही रंगेहात अटक केली असून, रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.उप. अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, शासकीय कामासाठी कोणतीही बेकायदेशीर मागणी झाल्यास त्वरित ACB कार्यालयाशी संपर्क साधावा.

संपर्क:

टोल फ्री क्रमांक: १०६४

चंद्रपूर ACB कार्यालय: ०७१७२-२५०२५१

वेबसाइट: www.acbmaharashtra.gov.in

Bribery exposed in Chandrapur Zilla Parishad: Executive Engineer and three others arrested while accepting a bribe of Rs 4.20 lakhs for Jal Jeevan Mission works

#Acb
#Chandrapurjillaparishad
#Acbchandrapur
#chandrapuracbjillaparishad
#jaljivanmissio
#water