🎓 ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 1 ऑगस्ट 2025 पर्यंत
#Loktantra Ki Awaaz
चंद्रपूर, दि. 19 : अल्पसंख्यांक विकास विभागाच्या वतीने, अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी सन 2025-26 करिता शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदर अर्ज https://fs.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने 1 ऑगस्ट 2025 च्या सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. अर्जाची छायाप्रत आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रत्यक्ष किंवा टपालाने समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे - 411001 येथे पाठवावी.
*पात्रता व निकष :* अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा व अल्पसंख्यांक समुदायात येणारा असावा, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे, तर पीएचडीसाठी 40 वर्षे ही वयोमर्यादा राहील. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे, शैक्षणिक पात्रतेत किमान 55 टक्के गुण आवश्यक आहेत. शिष्यवृत्ती QS World University Ranking मध्ये 200 च्या आतील विद्यापीठांमध्ये प्रवेश असलेल्या अभ्यासक्रमांसाठीच देण्यात येईल. (UNSW, ऑस्ट्रेलिया वगळलेले आहे.) विद्यार्थ्यांस शिक्षण शुल्क, प्रवास खर्च, निवास भत्ता, आरोग्य विमा, आकस्मिक खर्च इत्यादी प्रतिपूर्ती स्वरूपात देण्यात येईल.
USD 15,400 (USA व इतर देशांसाठी) व GBP 9,900 (UK साठी) या मर्यादेत निर्वाह भत्ता देण्यात येईल. आकस्मिक खर्चासाठी अनुक्रमे USD 1,500 (USA) व GBP 1,100 (UK) इतकी रक्कम मंजूर असेल. प्रत्येक सत्रात नियमित प्रगती, गुणपत्रिका आणि शैक्षणिक अहवाल सादर करणे बंधनकारक राहील.
या शिष्यवृत्ती योजनेचा जास्तीत जास्त अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील 'ताज्या घडामोडी' या लिंकला भेट द्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.
