चंद्रपुर शहरात लवकरच धावणार ३० 'पीएम ई-बसेस', बल्लारपूर, भद्रावती, घुग्गुसकरांना मोठा दिलासा 30 'PM E-Buses' to run in Chandrapur city soon, Big relief for Ballarpur, Bhadravati, Ghugguskars

🚍 चंद्रपुर शहरात लवकरच धावणार ३० 'पीएम ई-बसेस'

📍बल्लारपूर, भद्रावती, घुग्गुसकरांना मोठा दिलासा

#Loktantra Ki Awaaz 
चंद्रपूर, 09 जुलै : चंद्रपूर महानगरपालिकेच्या
सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश आले असून, केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'पीएम ई-बस सेवा' (PM-eBus Sewa) योजनेअंतर्गत शहरासाठी एकूण ५० पर्यावरणपूरक व वातानुकूलित (AC) ई-बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. यातील पहिल्या टप्प्यात ३० बसेस लवकरच चंद्रपूरकरांच्या सेवेत दाखल होत असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे. या सुविधेमुळे अनेक वर्षांनंतर चंद्रपूरकरांना हक्काची, आधुनिक आणि प्रदूषणमुक्त 'सिटी बस सेवा' मिळणार आहे.

👉🏻 प्रदूषणावर मात करण्यासाठी चंद्रपुर मनपाचा मोठा पुढाकार

चंद्रपूर शहर आणि औद्योगिक परिसरात वाढणाऱ्या वायू प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन, मनपाने केंद्र सरकारकडे प्रदूषणमुक्त ई-बसेस चालवण्याचा प्रस्ताव पाठवला होता. ऑगस्ट २०२३ मध्ये राज्य सरकारने या केंद्र-प्रायोजित योजनेला मंजुरी दिली होती. ३ लाख व त्यावरील लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत चंद्रपूरचा समावेश करून, केंद्र सरकारने अखेर या ५० बसेसच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली आहे.
२५ किलोमीटर परिसरातील गावे जोडली जाणार
या ई-बस सेवेचा फायदा केवळ शहरालाच नाही, तर आजूबाजूच्या २५ किलोमीटर परिसरातील नागरिकांना आणि ग्रामीण भागाला होणार आहे.

👉🏻 या बसेस प्रामुख्याने खालील प्रमुख मार्गांवर धावणार आहेत:
चंद्रपूर ते बल्लारपूर
चंद्रपूर ते भद्रावती
चंद्रपूर ते घुग्गुस
बामणी, आरवट-चरवर आणि मूल मार्गावरील चिचपल्ली.

👉🏻 कृषी भवन परिसरात अत्याधुनिक बसस्थानक आणि चार्जिंग स्टेशन

या प्रकल्पाचा एक भाग म्हणून शहरात नवीन पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. चंद्रपुर मनपा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपुर शहरातील कृषी भवन परिसरातील मोकळ्या भूखंडावर 'पीएम ई-बस'साठी मुख्य बसस्थानक व अत्याधुनिक चार्जिंग डेपो (Charging Station) निर्माण केला जाईल. हे नवीन स्थानक शहराच्या मुख्य बसस्थानकाशी थेट जोडले जाणार असल्याने, प्रवाशांना वाहतुकीची उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

👉🏻 टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी; प्रवास होणार स्वस्त
👉🏻 चंद्रपुर मनपाने या संपूर्ण प्रकल्पाचे नियोजन दोन टप्प्यांत केले आहे:
१. पहिला टप्पा: तातडीने वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर उपाय म्हणून ३० बसेस रस्त्यावर उतरवल्या जातील.
२. दुसरा टप्पा: पुढील काळात उर्वरित २० बसेस ताफ्यात सामील केल्या जातील.
विशेष म्हणजे, या बसेस चालवण्यासाठी सरकार प्रति किलोमीटर २५ रुपये अनुदान देणार आहे. यामुळे चंद्रपूरकरांना अतिशय परवडणाऱ्या आणि स्वस्त दरात वातानुकूलित व सुरक्षित प्रवास करता येणार आहे.
चंद्रपूर शहराचा कायापालट करणाऱ्या आणि दळणवळणाला नवी गती देणाऱ्या या हक्काच्या बस सेवेमुळे नागरिकांमधून अत्यंत समाधान आणि आनंदाचे वातावरण व्यक्त होत आहे.