गेल्या पाच वर्षात वापरण्यात न आलेल्या एमआयडीसीतील जागा परत घेण्याची मोहीम राबवा - जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचे आवाहन


चंद्रपूर दि.26 जून (जिमाका) : चंद्रपूर सारख्या औद्योगिक वसाहतींमधील एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात पूरक उद्योग बहरणे आवश्यक आहे. मात्र पाच वर्षांपासून केवळ जमिनी घेऊन ठेवणाऱ्यांना उद्योगाची संधी भेटणार नाही. त्यामुळे तात्काळ उद्योग उभारण्याची क्षमता ठेवणाऱ्या नव्या लोकांना संधी देण्यात यावी, यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने व एमआयडीसीने तातडीने पाऊले उचलावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.
         राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी एमआयडीसी व उद्योग केंद्रामार्फत चंद्रपूर जिल्ह्यात पूरक व्यवसायासाठी वातावरण निर्माण करण्याबाबतचे निर्देश नुकत्याच झालेल्या एका बैठकीत केले होते. त्यानंतर एमआयडीसी व जिल्हा उद्योग भवनाच्या विद्यमाने 25 जून रोजी 12 वाजता जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा पार पडली. या सभेला मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीने या संदर्भातील यादी जाहीर करत केवळ जागा घेऊन ठेवणाऱ्या संस्था व प्रतिष्ठानाना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.
        ज्यांना उद्योग सुरू करायचा नाही. केवळ जागा घेऊन ठेवायचे आहेत. त्यांच्यासाठी ही संधी नाही. त्याऐवजी नव्याने उद्योग व्यवसायात आपले करियर करणाऱ्या तरुणांना ही जागा देण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.
         या बैठकीला विविध औद्योगिक आस्थापनाचे प्रतिनिधी तसेच व्यापारी व उद्योग जगताच्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे प्रास्ताविक करताना जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड यांनी पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी लोकल टू व्होकल हे अभियान राबविण्यासाठी पुढाकार घेतला असून जिल्ह्यातील नवे उद्योग हे सध्या सुरू असणाऱ्या उद्योगांना पूरक साहित्य पुरविणारे असावे, तसेच कोरोना आजारानंतर आलेल्या बदलामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची संधी स्थानिक कामगारांना मिळू शकते. याबाबत देखील वेगवेगळ्या व्यापारी व उद्योग व्यवस्थापनांनी पुढे यावेत. स्थानिकांना संधी द्यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम बाबतही त्यांनी यावेळी आढावा घेतला. या योजनेतून नव्या रोजगाराच्या संधी व नव्या उद्योजक निर्मितीला वाव असून बँकांनी या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करणाऱ्या तरुण व्यवसायिकांना कर्ज मंजूर करण्याचे देखील त्यांनी आवाहन केले.
          या बैठकीमध्ये बांबू औद्योगिक समूह व चंद्रपूर यांना एमआयडीसी येथे भूखंड देण्याबाबत, फ्लाय ॲश क्लस्टर सुरू करण्याबाबत, घुग्घुस हायवे कडून महाकाली पॉलिटेक्निकडे जाण्याचा रोडवर दुभाजक काढणे, मोठ्या उद्योगांनी सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग उद्योगांना पाठबळ देणे, उद्योगांना मुबलक वीज मिळण्याबाबत औद्योगिक घटकांना नियमित विद्युत पुरवठा, मोठे उद्योगांमध्ये स्थानिक दिव्यांगांना व त्यांच्या पात्रतेप्रमाणे उद्योगांमध्ये रोजगार देणे, आदी विषयांवर चर्चा झाली.