24 तासात आणखी 276 बाधित; दोन बाधितांचा मृत्यू
2364 बाधित कोरोनातून झाले बरे;
उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 2245
चंद्रपूर, दि. 9 सप्टेंबर : जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 276 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 4 हजार 662 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 2 हजार 245 असून आतापर्यंत 2 हजार 364 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत.
जिल्ह्यात 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगांव येथील 60 वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 7 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 8 सप्टेंबरला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
तर दुसरा मृत्यु आझाद वार्ड वरोरा येथील 72 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. 2 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 8 सप्टेंबरला रात्री बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता. जिल्ह्यात आतापर्यंत 53 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर 49, तेलंगाणा एक, बुलडाणा एक आणि गडचिरोली 2 बाधितांचा समावेश आहे.
आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 136, राजुरा तालुक्यातील 6, वरोरा तालुक्यातील 9, बल्लारपूर तालुक्यातील 9, भद्रावती तालुक्यातील 12, गोंडपिपरी तालुक्यातील 7, पोंभूर्णा तालुक्यातील 21, कोरपना तालुक्यातील 7, सावली तालुक्यातील 17 , मूल तालुक्यातील 21, नागभीड तालुक्यातील 2, चिमूर तालुक्यातील 9, ब्रह्मपुरी तालुक्यातील 14, सिंदेवाही तालुक्यातील 4 तर वणी-यवतमाळ येथून आलेले 2 बाधित असे एकूण 276 बाधित पुढे आले आहेत.
मास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुकंणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई :
चंद्रपूर शहर महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत कार्यालय व गट विकास अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत कारवाई करत दिनांक 8 सप्टेंबर पर्यंत मास्क न वापरणाऱ्या 14 हजार 666 व्यक्तींकडून 29 लक्ष 23 हजार 140 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 304 नागरिकांकडून 44 हजार 600 व इतर दंड 4 लक्ष 77 हजार 770 रुपयांचा असा एकूण 34 लक्ष 45 हजार 510 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.